किमया ऑनलाइन मार्केटिंगची 

कोरोनाचा वाढता संसर्ग, सातत्याने लॉकडाउनचे घेतले जात असलेले निर्णय हे पाहता ऑनलाइन मार्केटिंग हेच भविष्यातील मार्केटिंगचा एकमेव आधार दिसतो.
agrowon editorial
agrowon editorial

अॅमेझॉनचे वस्तू विक्रीचे स्वतःचे एकही आउटलेट नाही, तरी जगातील सर्वांत मोठा वस्तू-उत्पादने विक्री व्यवसाय ते करतात. स्विगी, झोमॅटोचे एकही हॉटेल नाही, तरी जगभरातील सर्वांत मोठ्या हॉटेलिंग व्यवसायात ते आहेत. ओला-उबरचे स्वतःचे एकही वाहन नाही, परंतु जगभरातील सर्वांत मोठ्या वाहतूक व्यवसायाचे ते मालक आहेत. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउन काळात जगभरातील बाजारपेठा ठप्प असताना अॅमेझॉनवरील वस्तू-उत्पादनांची खरेदी-विक्री, स्विगी, झोमॅटोचे खाद्यपदार्थ पार्सल सेवा सुरू आहे. तर काही ठिकाणी ओला-उबरची वाहतूक सर्व्हिस चालू आहे.

आताच्या महाराष्ट्रातील लॉकडाउनमध्ये सुद्धा दुकाने, हॉटेल्स बंद असले तरी या सर्वांच्या ऑनलाइन सेवा सुरूच आहेत. अर्थात, त्यांचा व्यवसाय सुरू आहे. आणि हीच तर ऑनलाइन मार्केटिंगची किमया म्हणावी लागेल. उद्योग व्यवसाय कोणताही असो की शेती असो भविष्यात सर्वांना ऑनलाइन मार्केटिंगमध्ये उतरावेच लागणार आहे. जो यामध्ये उतरणार नाही तो मागे पडल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ म्हणावी लागेल. मागील वर्षभरापासूनच्या लॉकडाउनमध्ये शेती क्षेत्रातही ऑनलाइन मार्केटिंगचे काही चांगले अनुभव शेतकऱ्यांना आलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील मळद (ता. बारामती) येथील शेतकरी प्रल्हाद वरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ६५ टन कलिंगडे व खरबुजाची विक्री चांगल्या दरात केली आहे. उर्वरित १० ते १५ टन मालही ते असाच विकणार आहे. 

देशात मागील वर्षभरापासून कोरोना विषाणूचा थरार चालू आहे. यांस प्रतिबंधासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून वारंवार लॉकडाउनचे निर्णय घेतले जात आहेत. मागील वर्षी एप्रिल, मे, जून हे तीन महिने देशभर कडक लॉकडाउन होता. सध्या महाराष्ट्रासह काही राज्यांत लॉकडाउन चालू आहे.

लॉकडाउनमध्ये उद्योग-व्यवसाय बंद राहत असल्याने त्यांना चांगलाच फटका बसत आहे. लॉकडाउन काळात शेतीमालाची खरेदी-विक्री, बाजार समित्या ठरावीक कालावधीसाठी नियम-अर्टींचे पालन करीत सुरू राहत असल्या तरी वाहतूक बंद, बाजाराची अनिश्‍चितता, खरेदीदार नाही, ग्राहक नाही म्हणून चांगलीच प्रभावित होते. मागणी अभावी दर पडतात तर वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे मागच्या आणि आताच्याही लॉकडाउनमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना नाशिवंत फळे-भाजीपाला तोडून फेकून द्यावा लागला. आत्ताही राज्यात लॉकडाउन सुरू असल्याने नाशिवंत फळे-भाजीपाला विक्री-वाहतुकीत अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वरे या शेतकऱ्यांनी दाखविलेली दिशा सर्वांना मार्गदर्शक ठरते. 

वरे या शेतकऱ्याने व्हॉट्सॲप, फेसबुक, वैयक्तिक संपर्क अशा माध्यमातून ग्राहकांना थेट शेतात बोलाविले. ग्राहकांनीही त्यास चांगला प्रतिसाद दिला. ग्राहक कलिंगडे, खरबूज खरेदीसाठी थेट त्यांच्या शेतात गेले. विशेष म्हणजे कोरोनाच्या वाढत्या संसर्ग काळात त्यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग असे नियमांचे पालन करीत त्याची विक्री केली. लॉकडाउन असले तरी ग्राहकांना फळे-भाजीपाला असो की इतर खाद्य पदार्थ याची आवश्यकता असते. अशावेळी व्हॉट्सॲप, फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोचता येते. ऑनलाइन मार्केटिंगमध्ये तुम्ही ग्राहकांना आपण विक्री करीत असलेल्या शेतीमालाच्या जागी बोलावू शकता किंवा त्यांचे ऑनलाइनने पैसे आपल्या खात्यात जमा करून घेऊन त्यांना थेट अथवा पार्सलने माल पाठवू शकता.

फेसबुक, व्हॉट्सॲपवर काही व्यावसायिक ग्रुप आहेत. यावर निःशुल्क अथवा नाममात्र नोंदणी शुल्क भरून शेतकरी नोंदणी करू शकतात. काही शेतकऱ्यांचे गट-समूह शेतीमालाची तर महिला बचट गट, प्रक्रिया उद्योजक प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांची अशाप्रकारे विक्री करीत आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय. कोरोनाचा वाढता संसर्ग, सातत्याने लॉकडाउनचे घेतले जात असलेले निर्णय हे पाहता ऑनलाइन मार्केटिंग हेच भविष्यातील मार्केटिंगचा एकमेव आधार आहे, हे शेतकऱ्यांनी पण आता लक्षात घ्यायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com