agriculture news in marathi agrowon agralekh on orange export by railway to bangla desh | Agrowon

संत्र्याची रेल्वेवारी, फलदायी ठरावी

विजय सुकळकर
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

संत्रा निर्यातीच्या बाबतीत काही चांगले घडत असताना लगेच काही ना काही संकट उभे राहते, हा नेहमीचाच अनुभव आहे.

नाशवंत शेतमालाची देशांतर्गत जलद आणि कमी खर्चात वाहतूक 
करण्यासाठी ‘किसान रेल्वे’चा उपक्रम केंद्रीय कृषी तसेच रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकारातून हाती घेण्यात आला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये देवळाली (नाशिक) ते दानापूर (बिहार) अशी पहिली किसान रेल्वे राज्यातून धावली. किसान रेल्वे सुरु झाल्यापासूनच संत्र्यासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबतची मागणी उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच निर्यातदार यांनी लावून धरली होती. त्यामुळे अमरावती-नागपूर भागातील संत्र्याची बांगलादेशला रेल्वेने निर्यात करण्याचा निर्णय झाला आहे. राज्यात संत्रा निर्यातीच्या चर्चेचे गुऱ्हाळ अनेकदा रंगते. श्रीलंकेपासून सिंगापूरपर्यंत तर कधी आखाती देशांपासून अमेरिकेपर्यंत संत्रा निर्यातीच्या गप्पा केल्या जातात. संत्रा निर्यातीसाठी वाहतूकीचेही जवळपास सर्वच पर्याय देखील पडताळून पाहण्यात आले आहेत. कधी संत्र्याची जलमार्गाने आखाती देशांत वाहतूक होते, तर कधी नागपुरी संत्रा हवाई मार्गे बहरीन कुवैतला पोचतो. आपल्या शेजारील राष्ट्रांत तर रस्ते मार्गानेच संत्रा जातो. मात्र, संत्रा निर्यातीबाबत कोणत्याही देशांशी सातत्य टिकून नाही. अशावेळी संत्र्याची बांगलादेश रेल्वे वारी किती फलदायी ठरेल, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

चव आणि रंगाच्या माध्यमातून वेगळेपण जपणाऱ्या नागपुरी संत्र्याला देशांतर्गत तसेच विदेशी बाजारपेठांतून चांगली मागणी आहे. परंतु विक्री, साठवण, वाहतूक यांबाबत कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने उत्पादकांसह व्यापाऱ्यांनापण प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. संत्र्यांची टिकवणक्षमता फारच कमी आहे. प्रतवारी, व्हॅक्स कोटिंग आणि बॉक्स पॅकिंगमध्ये संत्रा पाठविला, तर त्याची टिकाऊक्षमता वाढते, प्रत चांगली राहून दरही अधिक मिळतो. मात्र, संत्रा ग्रेडिंग, पॅकिंगचे जेमतेम दोन प्रकल्प विदर्भात असून, तेही बहुतांश वेळा बंद असतात. देशांतर्गत विक्रीसाठी अथवा शेजारील राष्‍ट्रांत निर्यात करण्यासाठी संत्र्या ट्रकमध्ये मोकळा भरून पाठविला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात फळे खराब होऊन त्यास दरही कमी मिळतो.

आता रेल्वे वाहतुकीने अवघ्या काही तासांत संत्रा बांगलादेशला पोचविता येणार आहे. हा संत्रा उत्पादकांसाठी सुखद धक्काच आहे. असे असले तरी तेथील वाढते आयातशुल्क ही आपल्यासाठी नेहमीचीच डोकेदुखी राहिली आहे. यावर्षीच्या सुरवातीलाच बांगलादेशने आयातशुल्क वाढविल्याने तेथे होत असलेली आपली संत्रा निर्यात रोडावली होती. आत्ताही कमी खर्चात, जलद गतीने रेल्वेद्वारा संत्रा बांगलादेशला पोचणार असला तरी तेथील वाढते आयातशुल्क अडचणीचे ठरु शकते. संत्रा निर्यातीच्या बाबतीत काही चांगले घडत असताना लगेच काही ना काही संकट उभे राहते, हा नेहमीचाच अनुभव आहे. आपल्‍या शेजारील चीन हा देश संत्र्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. मात्र, चीनच्या प्रोटोकॉल लिस्टमध्ये भारताचे नाव नसल्याने तेथे संत्रा निर्यात होत नाही. हे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी चीनला संत्रा निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. परंतू भारत-चीन दरम्यानच्या वाढत्या तणावाने यासही आता ब्रेक लागला आहे.

युरोप, अमेरिकेला संत्रा पाठवायचा, तर त्यांना कीडनाशके अंशमुक्त (रेसिड्यूफ्री) संत्रा लागतो. आता तर हे देश कीड-रोगमुक्त क्षेत्रातून उत्पादित शेतीमालच स्वीकारणार आहेत. संत्र्याचे कीडनाशके अंशमुक्त उत्पादन घेण्यासाठी ‘सिट्रसनेट’च तयार नाही. सिट्रसनेटच्या प्रक्रियेसही सहा महिन्यापूर्वीच सुरुवात झाली आहे. युरोपीय देश, आखाती देश याशिवाय जगभरातील नव्या बाजारपेठा शोधून तेथे संत्रा निर्यात वाढविण्यासाठी अपेडा, एनआरसीसी तसेच केंद्र-राज्य शासन यांच्याकडून प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच विदर्भातून संत्रा निर्यात वाढविण्यासाठी यासाठीच्या सर्व सेवासुविधा तेथे उपलब्ध करुन द्याव्या लागतील. संत्रा निर्यात वृद्धीसाठी या भागातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी देखील पुढाकार घ्यायला हवा.


इतर संपादकीय
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
भार व्यवस्थापनाचे बळीजालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे येथील तिघे...
सहकारी अंकेक्षण कालबाह्य ठरतेय काय? ‘हिशेबांच्या पुस्तकाचे बुद्धिकौशल्याने सखोल...
ऊस उत्पादकांनो, समजून घ्या ‘एफआरपी‘चे...राज्यातील साखर उद्योगातील सर्व घटक ‘एफआरपी‘भोवती...
देर आए दुरुस्त आएजीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) अर्थात ‘भौगोलिक...
शाश्‍वत सेंद्रिय शेतीविश्‍वजगभरातील १८६ देशांतून एकूण ७१.५ दशलक्ष हेक्टर...
‘विजे’खालचा अंधारकृषिदराने वीजपुरवठ्याची मागणी करणाऱ्या जालना...
विजेखालचा अंधारषिदराने वीजपुरवठ्याची मागणी करणाऱ्या जालना...
मेळघाटातील आदिवासी बांधवांची दिवाळीनुकताच १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजन या...
शेतीला आधार हवा सर्वंकष विम्याचाराज्यातील अनेक भागांत परतीच्या तुफान...
‘दान समृद्धीचे पडो कष्टाच्या पदरी’दिवाळी सणास सुरुवात होऊन दोन दिवस झाले आहेत. अजून...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
रब्बी पीकविमादेखील असतो ना भाऊ!रब्बी हंगामासाठी पीककर्ज असते, हे जसे राज्यातील...
शास्त्रशुद्ध अभ्यासातून वाढवूया देशी...देशी गाईंमध्ये दुष्काळी आणि टंचाईच्या काळात तग...
शेतकरी हित सर्वप्रथमराज्यात मागील दोन दशकांपासून कापसाचे संकरित बीटी...