कोरोनाचा कहर अन् राजकारण

कोरोना देशात थैमान घालत असताना यासाठीची प्रतिबंधात्मक लस असो की उपचारासाठीचे औषधं त्याच्या पुरवठ्यात देशात प्रचंड राजकारण सुरू आहे.
agrowon editorial
agrowon editorial

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. देशात दररोज जवळपास तीन लाख लोकांना कोरोनाची बाधा होतेय. महाराष्ट्रात दररोज ५० ते ६० हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. शहरे असो की ग्रामीण भाग दवाखान्यांत रुग्णांना ठेवायला जागा नाही. कोरोना उपचारासाठीचे औषधे, इंजेक्शनचा (रेमडेसिव्हिर) सर्वत्र तुटवडा जाणवतोय. ऑक्सिजनचा पुरवठाही मागणीनुसार होत नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचेही तसेच आहे. त्यामुळे देशभर कोरोना रुग्ण मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. काही पॅथॉलॉजी लॅब कोरोना पॉझिटिव्हचे बनावट रिपोर्टही देत आहेत. काही रुग्णालये तसेच डॉक्टरांच्या संगनमताने हे सुरू आहे. कोरोनाची लस असो की औषधे, त्याच्या पुरवठ्याबाबत प्रचंड राजकारणही होत आहे. महामारीतही श्रेय लाटण्याचा खेळ काही जण खेळत आहेत. बनावट व्यवसाय करणारे व्यावसायिक असोत की श्रेय लाटण्याचे काम करणारे राजकारणी महामारीतही संधी शोधण्याचे हे प्रकार अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागतील.  कोरोना रुग्णवाढीत आघाडीवरच्या आपल्या राज्यात अंशतः लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउन करताना शेतीसंबंधात सर्व कामे सुरळीत चालतील, शेतीमाल विक्रीलाही काही अडचण येणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु त्याचवेळी शेतीच्या मशागतीपासून ते शेतीमालाची काढणी विक्री हे सर्व प्रभावित होणार, असे अॅग्रोवनने स्पष्ट केले होते. नेमके घडतही तसेच आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीतून वाचलेली फळे-भाजीपाला पिके काढणीला मजूर मिळत नाहीत. कांदा असो की टोमॅटो, द्राक्ष असो की आंबा यांच्या काढणीचा खर्च २५ ते ५० टक्क्यांनी वाढला आहे. काढलेल्या शेतीमालाच्या वाहतूक-विक्रीलाही प्रचंड अडचणी येत नाहीत. फळे-भाजीपाला बाजारात आला तर मागणीच नाही म्हणून दर पाडले जात आहेत. टोमॅटो तसेच इतर काही पालेभाज्या काढणी करण्यासही परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्याची काढणी थांबविली आहे. हा शेतीमाल आता शेतातच खराब होणार आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान आहे. लॉकडाउनने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानीही प्रचं़ड झाली. प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण नाही, बहुतांश परीक्षाही रद्द झाल्या आहेत. 

खरे तर लॉकडाउन हा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रभावी उपाय नाही, हे मागील वर्षी केलेल्या लॉकडाउनमध्येच सिद्ध झाले होते. तरी कोरोना रोखण्यासाठी दुसरा कोणता उपाय नाही म्हणून नागरिकांवर लॉकडाउनच लादले जात आहे. सध्याच्या लॉकडाउनमध्ये बहुतांश जण नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे देखील कोरोनाचा फैलाव वाढत आहे. चीन या देशात प्रथम कोरोनाचा उगम झाला. तेथून तो देशभर आणि पुढे जगभर पसरला. परंतु मागील वर्षभरात चीनने लॉकडाउन काळात कडक नियम, निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले.

कोरोना संसर्ग झालेल्यांवर प्रभावी उपचार केले. त्यासाठीचे औषधे, इंजेक्शनचा पुरवठा सर्व प्रांतात मागणीनुसार सुरळीत होईल, याची काळजी घेतली. एवढेच नव्हे तर तेथे लॉकडाउन काळात लोकांना घरी बसून कौशल्य विकासासह इतरही आर्थिक मिळकतीचे ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून दिलेत. आज चीन या देशातून कोरोना जवळपास संपलेला आहे. तिथे मॉल्स, बगीचे, थिएटर एवढेच नव्हे तर शाळाही नियमित सुरू झाल्या आहेत. इस्राईलने व्यापक लसीकरणाची मोहीम राबवून देशाला मास्कमुक्तीकडे नेले आहे. या देशातही शाळा सुरू झाल्या आहेत. चीन, इस्राईल या देशांपासून आपण काही धडा घेणार आहोत की नाही, हा खरा प्रश्‍न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com