कहर ‘कोरोना’चा

कोरोना विषाणूला चीन, भारतासह अन्य देशांनी सुद्धा गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आता सर्वांचीच दैना उडालेली आहे.
agrowon editorial
agrowon editorial

कोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे वातावरण  पसरले आहे. चीनमध्ये कोरोनाची लागण होऊन मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन हजार जवळ जाऊन पोचली आहे, तर चीनसह अन्य २४ देशांत या विषाणूने लाखो लोकांना आपल्या कवेत घेतले आहे. चीनमधील मृतांचा आकडा तेथील सरकारने जाहीर केलेला असून प्रत्यक्ष मृतांची संख्या त्यापेक्षा अधिक असलेल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांद्वारे केला जात आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे कोरोना विषाणूवर अजूनही कुणालाच नियंत्रणात्मक उपाय शोधण्यात यश आलेले नसल्यामुळे लागण झालेल्या रुग्णांना वेगळे ठेवून त्याचा फैलाव रोखणे तसेच प्रतिबंधात्मक उपायांवरच भर दिला जात आहे. इबोलावरील औषधचं कोरोना रोखणार, अशी आशा चीनच्या आरोग्य विभागाकडून अगोदर व्यक्त करण्यात आली होती. परंतु या विषाणूचा वाढता संसर्ग पाहता ती आशा फोल ठरल्याने चीनची दाणादाण उडाली आहे. चीनसह या विषाणूची लागण झालेल्या देशांतून भारतात आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात असून त्यातील बहुतांश रुग्णांना कोरोनाची लागण झालेली नाही, तर काही संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात देखरेखेखाली ठेवण्यात आले आहेत. ही आपल्यासाठी समाधानकारक बाब मानली जात असली, तरी चीन आणि अन्य देशांत झालेल्या या विषाणूच्या लागणीमुळे देशातील शेती-व्यापार-उद्योग क्षेत्राला मात्र चांगलाच फटका बसला आहे. 

आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या एकूण सुतापैकी ४० टक्के सुताचा खरेदीदार चीन आहे. परंतु कोरोनाच्या लागणीमुळे चीनला निर्यात होणाऱ्या सूत व कापूस गाठी तेथील बंदरावरच पडून आहेत. सूत, कापूस गाठींचे सौदे पूर्ण न झाल्याने देशातील निर्यातदारांचे सुमारे पाच हजार कोटी रुपये अडकून पडले आहेत. सूत, कापसासह मसाले, मिरची आणि इतर भाजीपाला निर्यातही ठप्प झाली आहे. भारतातून समुद्री उत्पादनेही (खासकरून कोळंबी) चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. परंतु ही निर्यातही थांबली आहे. अनेक कृषी उत्पादनांची निर्यात रखडल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत शेतमालाच्या दरावर होत आहे. चीनमधून भारतात होणाऱ्या आयातीबाबत बोलायचे झाले तर देशातील औषध निर्माण क्षेत्रात ७० टक्के कच्च्या मालाची आयात चीनमधून होते. ही आयात थांबल्याने या क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.  

चीनच्या आयातीवर अवलंबित्व असलेले देशातील वाहन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच हार्डवेअर क्षेत्रही चांगलेच प्रभावित झाले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव चिकनमधून होतो या अफवेने देशांतर्गत चिकनची मागणी घटली, दर कोसळले यातून पोल्ट्री उद्योगाचे १२० कोटी रुपयांचे नुकसान केले. चीनमधील कोरोना विषाणूचा देशातील उद्योग-व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, असा अंदाज जाणकारांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच व्यक्त केला होता. परंतु केंद्र सरकारच्या अर्थ, आरोग्य, वाणिज्य, कृषी आदी मंत्रालयांनी याकडे दुर्लक्षच केले. आता याच्या झळा वाढत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू केली आहे. कोरोनोबाबत सोशल मीडियाद्वारे अफवांवर वेळीच नियंत्रण आणले असते शिवाय केंद्र-राज्य शासनाने मिळून याबाबत प्रबोधनाची मोहीम देशभर राबविली असती तर पोल्ट्रीसह इतरही अनेक उद्योगांचे नुकसान टळले असते. कोरोना या घातक विषाणूवर प्रतिबंधात्मक लस गरजेचीच आहे. अशी लस शोधण्याचे प्रयत्न जगभरातून होत आहेत. आपल्या देशात हे आव्हान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने स्वीकारले आहे. कोरोनाचा वाढता कहर पाहता लस शोधण्यास गती देण्याचे काम या संस्थेसह केंद्र-राज्य शासनाने सुद्धा करायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com