agriculture news in marathi agrowon agralekh on poisoning in animals | Agrowon

विषबाधेबाबत गांभीर्य कधी?

विजय सुकळकर
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

चाऱ्याद्वारे विषबाधा हा विषय अत्यंत किचकट होत चालला असताना याबाबत पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे सांगून कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाने यातून अंग काढून घेणे योग्य नाही.
 

घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण - सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी गाव - कोवळी ज्वारीची ताटे खाल्ल्याने विषबाधा होऊन १४ गायी आणि ४ म्हशी दगावल्या. 

घटना क्रमांक  २ ः ऑगस्ट २०१९, ठिकाण - नगर जिल्ह्यातील सात-आठ तालुक्यांतील अनेक गावे - हिरव्या वनस्पतीतील नायट्रेटच्या विषबाधेने तब्बल ४२ जनावरांचा मृत्यू.

मागील जेमतेम चार महिन्यांत चाऱ्यातून होणाऱ्या विषबाधेने दोन जिल्ह्यांत ६० जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत, म्हणण्यापेक्षा पुढे आल्या आहेत. मागील चार महिन्यांतच या दोन जिल्ह्यांतील उर्वरित गावे तसेच राज्यातील इतरही जिल्ह्यांत अशाप्रकारे विषबाधेने जनावरे मेल्याच्या घटना घडल्या नाहीत, असे म्हणता येणार नाही. यातील अनेक शेतकऱ्यांना नेमकी जनावरे कशाने दगावली, हे कळलेच नसेल; तर काहींना कळले असूनही यासाठी काही आर्थिक तरतूद नसल्याने त्यांनी तक्रार नोंदविण्याचे टाळले असणार आहे.

१५ ते २० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या भागात विषारी वनस्पतीने जनावरे दगावली होती. त्या वेळी या भागात तज्ज्ञांनी पाहणी केली असता तेथे एक विदेशी विषारी तण आढळून आले होते. हे तण जनावरांच्या खाण्यात गेल्याने ती मृत्युमुखी पडली होती. तसेच, दोन वर्षांपूर्वी पेठ वडगाव (जि. कोल्हापूर) भागातही विदेशी तण सापडले होते. त्याची वेळीच ओळख पटून बंदोबस्त केल्याने पुढील हानी टळली होती. परंतु, नगर जिल्ह्यात सध्या झालेल्या विषबाधेतील वनस्पती आपल्याकडीलच आहेत. विशेष म्हणजे त्यातील कुंजीर, माठ या रानभाज्या म्हणूनही खाण्यात वापरल्या जातात. मुळात विविध कारणांनी जनावरांतील विषबाधेने जनवारे दगावण्याचे प्रमाण वाढत असताना कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाबरोबर राज्य शासनही याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. 

शेती व पशुधन हे एकमेकांस पूरक आहेत. परंतु, मागील काही वर्षांपासून दुष्काळ आणि महापूर अशा नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांकडील पशुधन कमी होत चालले आहे. त्यात चाऱ्याद्वारे होणाऱ्या विषबाधेनेही जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असेल तर ही बाब फारच दुर्दैवी म्हणावी लागेल. चराऊ कुरणे, नदी-नाल्याचे काठ, शेतीचे बांध, पडीक रान यामध्ये काही विषारी वनस्पती, वेली असतात. कुरणातील चाऱ्यासोबत गाजर गवत, हुलहुल, घाणेरी, धोतरा, रानटी कांदा, रानटी लसूण अशी तणे जनावरांच्या पोटात गेली तर विषबाधा होते. ज्वारीची कोवळी पाने खाण्यात आल्याने सुद्धा जनावरांना विषबाधा होते. सुबाभळीचा वापर चारा म्हणून सर्रासपणे केला जातो. परंतु, त्यातीलही मायमोसिन नावाच्या घटकाने ते अधिक प्रमाणात खाण्यात आल्यास जनावरांना अपायकारक ठरते. चाऱ्याची गुणवत्ता वाढविताना युरियाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास ते जनावरांना घातक ठरते. अशाप्रकारे चाऱ्याद्वारे विषबाधा हा विषय अत्यंत किचकट होत चालला असताना याबाबत पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे सांगून कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाला अंग काढून घेता येणार नाही.

जनावरांमध्ये विविध प्रकारे होणाऱ्या विषबाधेबाबत कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाने व्यापक प्रबोधनाची मोहीम हाती घ्यायला हवी. गाव परिसरातील देशी-विदेशी विषारी तण, वनस्पती शेतकऱ्यांना थेट दाखवून त्यांची ओळख करून द्यायला हवी. तसेच हिरव्या चाऱ्यामध्ये त्याचा कोणता भाग, कधी, किती प्रमाणात जनावरांना खाण्‍यास द्यायला हवा, हेही सांगावे लागेल. याकरिता वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच गावातील अनुभवी शेतकऱ्यांची मदतही घ्यायला हवी. जनावरांना विषबाधा होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीबरोबर विषबाधा झाल्यास प्रथमोपचाराबाबतही शेतकऱ्यांना अवगत करावे लागेल. सध्या दुधाळ गायी-म्हशीसह बैलांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. अशावेळी विषबाधेने एखादे जनावर दगावले तर त्यास तत्काळ आर्थिक मदतीची तरतूद शासनाने करायला हवी.  



इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...