agriculture news in marathi agrowon agralekh on poisoning in animals | Agrowon

विषबाधेबाबत गांभीर्य कधी?

विजय सुकळकर
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

चाऱ्याद्वारे विषबाधा हा विषय अत्यंत किचकट होत चालला असताना याबाबत पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे सांगून कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाने यातून अंग काढून घेणे योग्य नाही.
 

घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण - सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी गाव - कोवळी ज्वारीची ताटे खाल्ल्याने विषबाधा होऊन १४ गायी आणि ४ म्हशी दगावल्या. 

घटना क्रमांक  २ ः ऑगस्ट २०१९, ठिकाण - नगर जिल्ह्यातील सात-आठ तालुक्यांतील अनेक गावे - हिरव्या वनस्पतीतील नायट्रेटच्या विषबाधेने तब्बल ४२ जनावरांचा मृत्यू.

मागील जेमतेम चार महिन्यांत चाऱ्यातून होणाऱ्या विषबाधेने दोन जिल्ह्यांत ६० जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत, म्हणण्यापेक्षा पुढे आल्या आहेत. मागील चार महिन्यांतच या दोन जिल्ह्यांतील उर्वरित गावे तसेच राज्यातील इतरही जिल्ह्यांत अशाप्रकारे विषबाधेने जनावरे मेल्याच्या घटना घडल्या नाहीत, असे म्हणता येणार नाही. यातील अनेक शेतकऱ्यांना नेमकी जनावरे कशाने दगावली, हे कळलेच नसेल; तर काहींना कळले असूनही यासाठी काही आर्थिक तरतूद नसल्याने त्यांनी तक्रार नोंदविण्याचे टाळले असणार आहे.

१५ ते २० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या भागात विषारी वनस्पतीने जनावरे दगावली होती. त्या वेळी या भागात तज्ज्ञांनी पाहणी केली असता तेथे एक विदेशी विषारी तण आढळून आले होते. हे तण जनावरांच्या खाण्यात गेल्याने ती मृत्युमुखी पडली होती. तसेच, दोन वर्षांपूर्वी पेठ वडगाव (जि. कोल्हापूर) भागातही विदेशी तण सापडले होते. त्याची वेळीच ओळख पटून बंदोबस्त केल्याने पुढील हानी टळली होती. परंतु, नगर जिल्ह्यात सध्या झालेल्या विषबाधेतील वनस्पती आपल्याकडीलच आहेत. विशेष म्हणजे त्यातील कुंजीर, माठ या रानभाज्या म्हणूनही खाण्यात वापरल्या जातात. मुळात विविध कारणांनी जनावरांतील विषबाधेने जनवारे दगावण्याचे प्रमाण वाढत असताना कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाबरोबर राज्य शासनही याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. 

शेती व पशुधन हे एकमेकांस पूरक आहेत. परंतु, मागील काही वर्षांपासून दुष्काळ आणि महापूर अशा नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांकडील पशुधन कमी होत चालले आहे. त्यात चाऱ्याद्वारे होणाऱ्या विषबाधेनेही जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असेल तर ही बाब फारच दुर्दैवी म्हणावी लागेल. चराऊ कुरणे, नदी-नाल्याचे काठ, शेतीचे बांध, पडीक रान यामध्ये काही विषारी वनस्पती, वेली असतात. कुरणातील चाऱ्यासोबत गाजर गवत, हुलहुल, घाणेरी, धोतरा, रानटी कांदा, रानटी लसूण अशी तणे जनावरांच्या पोटात गेली तर विषबाधा होते. ज्वारीची कोवळी पाने खाण्यात आल्याने सुद्धा जनावरांना विषबाधा होते. सुबाभळीचा वापर चारा म्हणून सर्रासपणे केला जातो. परंतु, त्यातीलही मायमोसिन नावाच्या घटकाने ते अधिक प्रमाणात खाण्यात आल्यास जनावरांना अपायकारक ठरते. चाऱ्याची गुणवत्ता वाढविताना युरियाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास ते जनावरांना घातक ठरते. अशाप्रकारे चाऱ्याद्वारे विषबाधा हा विषय अत्यंत किचकट होत चालला असताना याबाबत पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे सांगून कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाला अंग काढून घेता येणार नाही.

जनावरांमध्ये विविध प्रकारे होणाऱ्या विषबाधेबाबत कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाने व्यापक प्रबोधनाची मोहीम हाती घ्यायला हवी. गाव परिसरातील देशी-विदेशी विषारी तण, वनस्पती शेतकऱ्यांना थेट दाखवून त्यांची ओळख करून द्यायला हवी. तसेच हिरव्या चाऱ्यामध्ये त्याचा कोणता भाग, कधी, किती प्रमाणात जनावरांना खाण्‍यास द्यायला हवा, हेही सांगावे लागेल. याकरिता वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच गावातील अनुभवी शेतकऱ्यांची मदतही घ्यायला हवी. जनावरांना विषबाधा होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीबरोबर विषबाधा झाल्यास प्रथमोपचाराबाबतही शेतकऱ्यांना अवगत करावे लागेल. सध्या दुधाळ गायी-म्हशीसह बैलांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. अशावेळी विषबाधेने एखादे जनावर दगावले तर त्यास तत्काळ आर्थिक मदतीची तरतूद शासनाने करायला हवी.  



इतर संपादकीय
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
वणवा पेटतोयअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे...
कार्यक्षम खत व्यवस्थापनेतून साधूया...हरितक्रांतीच्या यशात अधिक उत्पादनक्षम गहू बियाणे...
घरात असावे एकमत‘शेतात खत, गावात पत अन् घरात एकमत असावे’ अशी एक...
काटेरी राजमुकुटमहाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या...
गोसमृद्धीची अग्निपरीक्षा तीन दिवस पुणे ‘गो'' रंगात सजणार आहे. गाय आणि...
योजना माझ्या हातीकृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत...
दारिद्र्यनिर्मूलनासाठी हवा ठोस कार्यक्रमआज रोजी देशातील कोट्यधीशांची संख्या वाढत असताना...
आमदार बंधूभगिनींनो पत्रास कारण की...आमदार बंधूभगिनींनो नमस्कार,  आजघडीला...
अखेर फासे उलटलेच!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी...
गोवंशहत्याबंदी अव्यवहार्यच!महाराष्ट्र या (तथाकथित) पुरोगामी राज्यात...
फसवणूक थांबणार कधी?नाशिक जिल्ह्यात दोन व्यापाऱ्यांनी ४० टोमॅटो...
पाहणी-पंचनाम्यांचा फार्सराज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी...
दुतोंडीपणाचा कळस?राज्यसभेच्या २५०व्या सत्र किंवा अधिवेशनानिमित्त...
‘कोरडवाहू’चे वैचारिक सिंचनकोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे...