अखेर फासे उलटलेच!

पहिल्यांदा सत्तेची संधी हुकल्यानंतर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जी काही धावाधाव केंद्र सरकारच्या आशीर्वादाने फडणवीस आणि त्यांच्या चमूने केली त्यातून हाती आली ती केवळ तोंडफोड.
agrowon editorial
agrowon editorial

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी नाट्यमयरीत्या आपल्या पदाची औटघटकेसाठी परिधान केलेली वस्त्रे आपल्याच हाताने उतरवली. ते तसे व्हायचेच होते. त्याचे संकेत सोमवारपर्यंत अजितदादा पवार वगळता सारे बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात परतले आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांची ज्या पद्धतीने सोमवारी ओळख परेड केली गेली तेव्हाच मिळू लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने विश्‍वासदर्शक ठरावाबाबत मंगळवारी निःसंदिग्ध आदेश दिल्यानंतर तर पुढे काय होणार याचा अंदाज येत गेला. तरीही विधिमंडळाला सामोरे जात तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत आणि त्यातून उद्‍भवणाऱ्या न्यायालयीन लढाया लढण्याची तयारी ठेवत सरकार स्थापन करणे भाजपला शक्‍य होते. पण झाली तेवढी शोभा पुरे झाली हे अप्रत्यक्षपणे मान्य करून या अल्पकालीन सरकारने राजीनाम्याचा पर्याय स्वीकारला हे बरेच झाले. पहिल्यांदा सत्तेची संधी हुकल्यानंतर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जी काही धावाधाव केंद्र सरकारच्या आशीर्वादाने फडणवीस आणि त्यांच्या चमूने केली त्यातून हाती आली ती केवळ तोंडफोड. त्याचबरोबर प्रबळ विरोधक म्हणून टेचात कारकीर्द गाजवता आली असती. पण नसत्या खटाटोपामुळे त्यातलाही रुबाब गमवावा लागला.

शिवसेना भाजपबरोबर सत्ता स्थापन करण्याच्या मूडमध्ये नाही, हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी देणाऱ्या सत्तानाट्याचा आरंभ केला. दरम्यान, राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी भाजपला पर्याय देणारे सरकार आपण स्थापन करू शकतो, याचा विश्‍वास फडणवीस यांच्या वयापेक्षा अधिक राजकीय कारकीर्द असणाऱ्या शरद पवार यांना निश्‍चितच होता. शिवसेनेचे हिंदुत्व आडवे येत असल्याने काँग्रेसची थोडी गोची झाली होती. सोनिया गांधी आणि पवार यांच्या चर्चेनंतर सारे अडसर दूर होऊ लागले. मात्र किमान समान कार्यक्रम, सत्तावाटप, मुख्यमंत्री कोण यासाठी चर्चेचा घोळ दीर्घकाळ सुरू राहिला.

शरद पवार यांना या साऱ्या गोष्टींमध्ये स्पष्टता हवी असावी. सरकार पूर्णकाळ चालवायचे असेल तर ते आवश्‍यक आहे, याची जाण पवारांसारख्या नेत्याला नक्कीच आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करण्यात आले. एरवी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना कह्यात ठेवणे तसे कठीणच. हे सारे घडत असताना ते स्वतःच्या पक्षातील संभाव्य फुटीबाबत मात्र गाफील राहिले असेच मानावे लागेल. अजितदादांच्या बंडामुळे पक्षाबरोबरच घरात फूट पडण्याची स्थिती उद्‍भवल्याने या मुरब्बी नेत्याने आपले सारे राजकीय कौशल्य पणाला लावत ज्या काही हालचाली केल्या त्याला शेवटी यशाची फळे लगडलीच. विशेषतः तिन्ही पक्षांची मोट बांधणे, बंडखोरांना चुचकारून माघारी आणणे, अजितदादांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न जारी ठेवणे आणि हे सारे सुरू असताना आपलेच सरकार येणार, हा विश्‍वास तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये सातत्याने पेरत राहणे हे वाटते तेवढे सोपे नाही. पवारांनी ते सारे यशस्वीपणे निभावताना महाराष्ट्राच्या राजकारणातून आपणाला कदापि वगळता येणार नाही हा संदेशही ठोसपणे दिला. निवडणुका जिंकून देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला वाटा मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे होतेच; पण त्यापलीकडे जाऊन ज्याची अपेक्षाही केली नव्हती त्या सत्तासोपानापर्यंत काँग्रेस, राष्ट्रावादी काँग्रेसला पोचवण्याचे त्यांचे कसब निश्‍चितच वाखाणण्याजोगे ठरावे. हे सारे करत असताना पवारांनी काय काय साधले? आपला पक्ष अभेद्य ठेवला. घरच्या भिंतीला पडलेली फट बुजवली. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून बेदखल केले. शिवाय शिवसेना आणि काँग्रेसच्या मदतीने सत्तेलाही गवसणी घातली की जिचा रिमोट त्यांच्या हाती असणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com