agriculture news in marathi agrowon agralekh on problems in grape export | Agrowon

तिढा द्राक्ष निर्यातीचा!

विजय सुकळकर
मंगळवार, 2 मार्च 2021

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात करणे हाच रास्त दर पदरात पाडून घेण्यासाठीचा उपाय सध्यातरी दिसतोय. 
 

गेल्या वर्षी ऐन द्राक्ष काढणीच्या हंगामात कोरोना लॉकडाउन सुरू झाले. 
 त्यामुळे द्राक्षाची स्थानिक, देशांतर्गत बाजारपेठेबरोबर निर्यातही चांगलीच प्रभावित झाली होती. लॉकडाउननंतर दूरच्या तसेच विदेशी बाजारात द्राक्ष पाठविणे शक्य झाले नाही. द्राक्षाची निर्यातही पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यामुळे स्थानिक बाजारात द्राक्ष पुरवठा वाढला, मागणी घटली आणि दर पडले. एकंदरीत गेल्यावर्षीच्या हंगामात ५० टक्के द्राक्षाला फटका बसून उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसासह द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीपासून सुरू झालेली नैसर्गिक आपत्तींची मालिका आता काढणीच्या हंगामातही संपायचे नाव घेत नाही. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक द्राक्ष उत्पादकांनी प्रचंड मेहनत आणि खर्च करून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. परंतु केंद्र सरकारने द्राक्ष निर्यात अनुदान योजनेत केलेल्या बदलाचा फटका उत्पादकांना बसतोय. त्यामुळे देशांतर्गत तसेच निर्यातीसाठीच्या द्राक्षाचे दर कमी झाले आहेत. अर्थात अस्मानी सुलतानी संकटांच्या कचाट्यात द्राक्ष उत्पादक सापडला आहे.

खरे तर शेतीमाल विक्री असो की निर्यात याबाबत कोणतीही योजना आणताना ती सुरळीतपणे मार्गी लागेपर्यंत त्यासंबंधीची पहिली योजना बंद करणे उचित नाही. अथवा पहिली योजना बंद केली तर त्यासंबंधात नव्या योजनेची अंमलबजावणी अगदी ‘फूल प्रुफ’ पद्धतीने त्याच दिवसापासून सुरू झाली पाहिजेत, असे शासन-प्रशासन पातळीवरचे नियोजन पाहिजेत. शेतीमाल निर्यात ही बाब तर फारच संवेदनशील आहे. अशावेळी निर्यातीबाबतच्या योजना अथवा व्यवस्थेत बदल करताना तर या प्रक्रियेतील सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजेत. निर्यात प्रक्रियेतील सर्व घटकांचे बदलाबाबत वेळीच योग्य प्रबोधन देखील झाले पाहिजेत. द्राक्ष निर्यात अनुदान योजनेत बदल करताना हे काहीच झालेले दिसत नाही. द्राक्ष निर्यात अनुदानाची ‘एमईआयएस’ (मर्चेंडाईस एक्स्पोर्टस् फ्रॉम इंडिया स्कीम) ही निर्यात प्रोत्साहन योजना ३१ डिसेंबर २०२० पासून बंद करण्यात आली असून त्याऐवजी ‘आरओडीटीइपी’ (रेमिशन ऑफ ड्यूटीज ॲन्ड टॅक्सेस ऑन एक्स्पोर्ट प्रॉडक्टस् ) ही नवीन कर परतावा योजना १ जानेवारी २०२१ पासून लागू करण्याची केवळ घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचे नेमके निकष काय आहेत, कोणत्या करात किती सूट देण्यात आली आहे, त्याचा परतावा कधी, कसा, कुणाला मिळणार याबाबत काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांपासून ते या प्रक्रियेतील सर्व घटकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. महत्त्वाचे म्हणजे निर्यातीसाठी सुरू असलेल्या द्राक्ष खरेदीत उत्पादकांना योग्य दर मिळताना दिसत नाही. केंद्र-राज्य शासनाने मिळून या नव्या योजनेबाबतचा संभ्रम दूर करून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू करायला हवी.

मागील वर्षीच्या कोरोना लॉकडाउननंतर शेतीमालाची निर्यात अजूनही सुरळीत झालेली नाही. अनेक देशांतील होलसेल मार्केट, सुपर मार्केट बंद आहेत. निर्यातीसाठी कंटेनर उपलब्ध होत नाहीत, त्यांचे भाडे वाढले, विमान वाहतुकीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे द्राक्ष असो की इतर शेतीमाल निर्यातीमध्ये फारशी जोखीम घ्यायला कोणी तयार नाही. वैयक्तिक पातळीवरची द्राक्ष निर्यात तर मागील काही वर्षांपासून घटली आहे. देशांतर्गत बाजार असो की निर्यात पट्टीवर माल पाठविण्यास देखील द्राक्ष उत्पादक आता धजावत नाहीत. बहुतांश द्राक्ष उत्पादक जागेवरच भाव ठरवून माल देताहेत. त्यात दर कमी मिळतोय. अशावेळी द्राक्ष निर्यात वाढवून त्यातील दराचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पादकांनी एकत्र येऊन निर्यात करायला पाहिजे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात करणे हाच रास्त दर पदरात पाडून घेण्यासाठीचा उपाय आहे. यावर द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा.


इतर संपादकीय
जैवइंधन निर्मिती-वापरासाठी  हवेत...देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी इंधन...
जैव उत्तेजक समिती हवी व्यापक शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना (...
बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा...
‘गोल्डनबीन’ला झळाळीविदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर...
सहकार्य अन् समन्वयातून सुरू ठेवा बाजार...कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात या विषाणूचा...
कांद्याचा रास्त भाव काय?केंद्र शासनाने नवीन कृषी कायदे लागू केले...
श्रीलंकेचा आदर्श आपण कधी घेणार?श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली...
महाराष्ट्रातील मधुक्रांतीची दिशामार्च महिन्यामध्ये ‘मन की बात’मध्ये...
बाजारपेठेचा सन्मान करूयागोरगरिबांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून...
सालगडी पाहिजेत!काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जाहिरात फिरत...
आर्थिक प्रश्नचिन्हे कायमचआर्थिक वर्ष २०२१-२२ सुरू झाले आहे. २०२०-२१ हे...
हंगाम गोड, पण साखर कडूचखरे तर २०२०-२१ च्या गळीत हंगामापुढे अनेक आव्हाने...
पुन्हा कोरोना, पुन्हा लॉकडाउनकोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रासह...
अस्तित्व टिकविण्यासाठीचा जागतिक संघर्षभारतातच नाही तर इतर अनेक देशांतही शेतकरी आपल्या...
आता पाया करा मजबूतराज्य-राष्ट्राचा कारभार असो की एखाद्या संस्थेचा,...
तंत्र शून्य मशागतीचे, अनंत फायद्याचेसन २०१० च्या दशकातील शेती व्यवसायात जमिनीतील...
दूरचे महासागर आणि आपले हवामानभारतीय शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे...
कारभारवाडीचा आदर्शलहानमोठ्या धरण लाभक्षेत्रातील तसेच नदी काठच्या...
मूळ प्रश्‍नाला सोईस्कर बगल !जागतिक भूक निर्देशांकातील आकडेवारीनुसार १०७...
संकट अस्मानी आणि सुलतानीहीयावर्षाच्या खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही...