agriculture news in marathi agrowon agralekh on psycho mentality | Page 2 ||| Agrowon

अविवेकाची काजळी

विजय सुकळकर
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

अविवेकाची काजळी समाजात वाढत असताना ती वेळीच पुसून तेथे विवेकरूपी दीप लावावा लागेल. यासाठी व्यापक अशा सामाजिक-आध्यात्मिक प्रबोधनाची गरज आहे.

एखाद्याच्या यशावर आनंद व्यक्त करण्यापेक्षा अपयशानंतर खूश 
 होणाऱ्यांची संख्या समाजात वाढत आहे. दुसऱ्याच्या अपयशात, दुःखात, अडचणीत, नुकसानीत आनंद व्यक्त करणारी ही विकृत मनोवृत्ती म्हणावी लागेल. अशा प्रकारच्या मनोवृत्तीतूनच एखाद्यास जाणीवपूर्वक अडचणीत आणणे, आर्थिक नुकसान पोचविणे, असे वाढत असलेले प्रकार तर फारच दुर्दैवीच म्हणावे लागतील. मागील काही दिवसांपासून मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी आपल्याकडील चाळीत साठविलेला कांदा विक्रीसाठी काढत आहेत. नाशिक जिल्ह्यातील विष्णू आहेर हे शेतकरी चाळीतील कांदा विक्रीसाठी काढण्याच्या तयारीत असतानाच कुण्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चाळीत युरिया टाकल्यामुळे त्यांचा जवळपास १२० क्विंटल कांदा खराब झाला आहे. कांद्याला मिळत असलेल्या चालू दरानुसार त्यांचे थेट पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी देवळा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे. 

मागील काही वर्षांपासून राज्यभरच शेतकऱ्यांचे नुकसान करण्यांच्या घटनांत वाढ झालेली दिसून येते. यातूनच शेतात अथवा बांधावर लावलेली झाडे तोडणे अथवा उपटून टाकणे, सोयाबीन असो की गहू, हरभरा यांची काढणी करून शेतात लावलेल्या गंजीला आग लावणे, साठवून ठेवलेला कापूस पेटवून देणे अथवा चाळीतील कांदा नासविणे, असे अनेक प्रकार पुढे येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे असे प्रकार करणारा दूरचा कोणी नसून, जवळपासचीच व्यक्ती असते आणि त्यांच्याकडून जाणीवपूर्वक अशा घटना घडविल्या जातात. खरे तर शेतकरी मुळातच प्रचंड अडचणीत आहे. अस्मानी कहराबरोबर त्यांच्यावरील सुलतानी संकटातही भर पडत आहे. कुठे पूर, अतिवृष्टी तर कुठे अनावृष्टी, दुष्काळ यामुळे नुकसान वाढत आहे म्हणण्यापेक्षा हाती काहीही लागत नाही, असे म्हणणे अतिशोयक्ती ठरणार नाही. यातूनही वाचलेल्या, वाचविलेल्या पिकांवर नवनवीन रोग-किडींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यांचे नियंत्रण कठीण होऊन बसले आहे. त्यातच बियाण्यांच्या खरेदीपासून ते शेतीमालाच्या विक्रीपर्यंत बाजारात जो नाही तो त्यास लुटायला, फसवायला बसले आहेत. यातूनच होणाऱ्या आर्थिक कुचंबणेतून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढत आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांचे जाणीवपूर्वक आर्थिक नुकसान त्याच्या जवळपासचेच कोणी करत असेल तर, ते फारच वेदनादायी आहे. 

गावात अनेक कारणांनी गट-तट पडतात. काही वेळा कुणासोबतच्या भांडणातून वैयक्तिक वितुष्टही येते. परंतु, अशा प्रकारचे वितुष्ट अथवा मतभेदाचे रूपांतर कोणत्याही परिस्थितीमध्ये थेट आर्थिक नुकसान पोचविण्यात होता कामा नये. आपापसांतील मतभेद समोरासमोर बसून मिटवायला हवेत. याकरिता गावातील सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी पुढाकार घ्यायला हवा. चांगले संस्कार, समंजसपणातून विकृत मनोवृत्तीला दूर सारता येऊ शकते.

चांगले संस्कार, समंजसपणातून विवेक वाढतो. विवेक म्हणजे एखाद्या बाबीचा सारासार विचार करणे. सारासार विचारामध्ये वाईट-विकृत मनोवृत्तीला थारा नसतो. त्यामुळेच वाईट-विकृत विचारसरणीला अविवेक म्हणतात. अशा प्रकारची अविवेकाची काजळी समाजात वाढत असताना ती वेळीच पुसून तेथे विवेकरूपी दीप लावावा लागेल. आणि यासाठी व्यापक सामाजिक- आध्यात्मिक प्रबोधनाची गरज आहे. हे सर्व भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी करायलाच पाहिजेत. परंतु, हे करीत असताना अशा विकृतीतून कोणी कुणाचे नुकसान केले असेल तर, त्यावर कडक कायदेशीर कारवाईदेखील व्हायला पाहिजे. काही जणांना चांगली अद्दल घडली म्हणजे पुढील प्रकार आपोआपच कमी होतील, हेही तेवढेच खरे आहे. 
                                                                              


इतर संपादकीय
ऊर्ध्व शेतीचे प्रयोग वाढले पाहिजेतएकविसाव्या शतकाच्या आरंभापासूनच शेती व्यवहार...
कापूस विकासाची खीळ काढावाढलेला उत्पादन खर्च आणि कमी दरामुळे मागील अनेक...
दिलासादायक नवनीत   दूध दर पडले, यावर आंदोलन भडकले की...
कोरोना नंतरचे शेळी-मेंढी-कुक्कुटपालन  फक्त कोरोना विषाणूलाच आपल्या स्वतःमध्ये बदल...
इथेनॉल उद्दिष्टपूर्तीसाठी...  पुढील वर्षातील संभाव्य साखर उत्पादन पाहता...
इंधनाच्या भडक्यात  होरपळतोय शेतकरी राज्यात डिझेलचे दर प्रतिलिटर ८० तर पेट्रोलचे दर...
कोरोना नंतरचा दुग्धव्यवसाय कोरोना विषाणूने जगाचे रूप पालटून टाकले आहे, अशा...
दरवाढाचा फायदा साठेबाजांनाच!  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या...
लॉकडाउनचा निर्णय विचारपूर्वकच हवा लॉकडाउन शिथील केल्यानंतर गेल्या काही दिवसांत वाढत...
विक्री साखळी सक्षमीकरणाची सुवर्णसंधी शेतमालाचे उत्पादन घेणे हे काम फारच खर्चिक आणि...
कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' संजीवनी  या पुढे वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
गरज सरो, वैद्य मरोअतिक्रमण निर्मूलनाचा मुद्दा उपस्थित करत पुणे...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
वाद-प्रतिवादांचा खेळ अन् हतबल शेतकरीनिकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या...