करारी कर्तृत्व 

शेतीप्रती समर्पण भाव, कष्ट करण्याची तयारी, विविध प्रयोग राबविण्याचे धाडस आणि सातत्याने अभ्यास हेच पुष्पाताई नफ्याच्या गणिताचे सूत्र म्हणावे लागेल.
agrowon editorial
agrowon editorial

आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात स्त्रिया काम करीत आहेत. ‘आयटी’पासून शेतीपर्यंत कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा कामाचा दर्जा आणि उत्पादकता पुरुषांपेक्षा कमी तर नाही, उलट अनेक ठिकाणी या दोन्हींतही सरस दिसून येते. असे असताना देखील आजही स्त्री म्हणून त्यांना दुय्यमच लेखले जाते. देशाच्या ग्रामीण भागात तर स्त्रीची प्रतिमा अजूनही चूल आणि मूल सांभाळणारी अशीच आहे. त्याच दृष्टिकोनातून स्त्रीकडे पाहिले जाते. शहरी भागात उद्योग-व्यवसाय-सेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा कुठे ना कुठे झळकत असतात. परंतु घर-कुटुंब सांभाळून शेतीतही आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या महिला फारशा प्रकाशझोतात येताना दिसत नाहीत. यशस्वी शेतकरी महिलांकडे प्रसिद्धी माध्यमांचे दुर्लक्ष आणि स्वःत त्यांना प्रसिद्धीची काहीही हाव नसल्याने त्यांच्या यशोगाथा कुठे फारशा दिसत नाहीत. अॅग्रोवन’ मात्र प्रयोगशील, प्रगतशिल शेतकऱ्यांबरोबर महिला शेतकऱ्यांची दखल देखील सातत्याने घेत असते. अॅग्रोवनने नववर्षाच्या अंकात प्रसिद्ध झालेली विदर्भातील एका छोट्या खेड्यातील पुष्पाताई कव्हर यांची यशोगाथा शेतकरी महिलांनाच नाही, तर देशातील तमाम शेतकरी वर्गाला प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. 

विदर्भातील बहुतांश शेती ही जिरायती असून ती पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. त्यातल्या त्यात यवतमाळ, वाशीम हे जिल्हे तर शेतीसह उद्योग-व्यवसायातही फारच मागे आहेत. वाशीम जिल्ह्यातील पुष्पाताई कव्हर या ३५ वर्षांपासून शेतीत राबत आहेत. आज त्यांचे वय ६३ वर्षे असूनही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने त्या शेती करतात. विशेष म्हणजे पतीच्या निधनानंतर घर शेतीची सर्व जबाबदारी त्यांनी स्वःतच्या खांद्यावर घेतली. आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर सुद्धा त्यांच्या विधवा पत्नींनी खचून न जाता कुटुंब सावरण्याचे काम केले आहे. यावरून महिलांची परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द आणि लढाऊ बाणाच दिसून येतो. हल्ली शिक्षणाचा खर्च खूपच वाढला आहे. आपल्या मुला-मुलींना शिकवायचे म्हणजे राज्यातील बहुतांश अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस येतो. अशा परिस्थितीत पुष्पाताईंनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन नोकरीला लावले आहे. 

पारंपरिक शेतीत बदल करायचा म्हटले तर बहुतांश शेतकरी कचरत असतात. पुष्पाताई मात्र शेतीत नवनवीन प्रयोग धडाडीने राबवत असतात. विविध भाजीपाला पिकांची लागवड, बीजोत्पादन कार्यक्रम तसेच शेडनेटमधील शेती संरक्षित शेती असे प्रयोग त्या सातत्याने राबवितात. कोरडवाहू अशाश्‍वत शेती त्यांनी बागायती शाश्‍वत केली आहे. पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर अनेक शेतकरी कृषी केंद्रचालकांच्या सल्ल्याने फवारण्या घेतात. पुष्पाताई मात्र पिकावर एखादी कीड आली तर ती किती नुकसानकारक ठरू शकते, त्या किडीच्या नियंत्रणासाठीचे उपाय काय, हे अभ्यास आणि अनुभवातून सांगतात. त्यामुळेच त्यांना शेतीतले चालते बोलते विद्यापीठ म्हटले जाते.  शेतीमध्ये आज सर्वत्र नकारात्मतेचे वातावरण आहे. शेतीत कष्ट खूप आहेत, शेती परवडत नाही, असेच बोलले जाते. नैसर्गिक आपत्तींने होणारे नुकसान, विविध कारणांनी पिकांची घटती उत्पादकता आणि शेतीमालास मिळणाऱ्या कमी भावामुळे शेती तोट्याची ठरतेय. मात्र पुष्पाताईला शेतीत नफ्याचे गणित सापडले आहे. शेतीप्रती समर्पण भाव, कष्ट करण्याची तयारी, विविध प्रयोग राबविण्याचे धाडस आणि सातत्याने अभ्यास हेच पुष्पाताईंच्या नफ्याच्या गणिताचे सूत्र म्हणावे लागेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com