आश्वासक रब्बी हंगाम

रब्बी हंगामासाठीच्या निविष्ठा असो की वीज, पाणी हे योग्य वेळी, पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे, असे नियोजन शासन-प्रशासनाने करायला हवे.
agrowon editorial
agrowon editorial

खरे तर सप्टेंबर महिना लागला की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची रब्बीची लगबग सुरु होते. तसे पाहिले तर सप्टेंबर-ऑक्टोबर हे दोन महिने खरीप पिकांची काढणी, काढलेला शेतमाल विकणे तसेच रब्बीची मशागत, पिकांचे नियोजन, निविष्ठांची जुळवाजुळव आणि पेरणी असा शेतकऱ्यांसाठी अत्यंत धावपळीचा काळ असतो. यावर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट या पावसाळ्याच्या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. आता सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला तरी पाऊस थांबायचे नाव घेत नाही. सध्या अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य व आग्नेय भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आत्तापर्यंत झालेल्या पावसाने मूग. उडीद, सोयाबीनसह द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब आदी फळपिकांचे खूपच नुकसान झाले आहे. हा पाऊस अजून काही दिवस राहीला तर खरीपातील बहुतांश पिकांच्या नुकसानीचे प्रमाण वाढू शकते. अशा पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी ५ सप्टेंबरला खरीप-रब्बी हंगाम नियोजनाची बैठक घेतली. त्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबरोबर रब्बीतील क्षेत्र वाढ लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यावर्षीची शेतकऱ्यांची आर्थिक अडचण पाहता त्यांना झालेल्या नुकसानीबाबत तत्काळ मदत मिळायला हवी, त्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलायला हवीत.

आत्तापर्यंत झालेल्या पावसाने भूगर्भातील पाणी पातळी वाढली आहे. धरणे, बंधारेही पाण्याने भरून आहेत. पाणी उपलब्धतेमुळे रब्बीची चिंता मिटली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी आठ लाख हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामात वाढीची शक्यता आहे. खरीपाच्या तुलनेत रब्बीमध्ये लागवडीखालील क्षेत्र कमी असले तरी या काळातील चांगल्या हवामानामुळे उत्पादनाची शाश्वती मिळते. परंतू मागील चार-पाच वर्षांपासून जानेवारी-फेब्रुवारी अर्थात रब्बी पिके हाताशी आलेली असताना पडत असलेल्या अवकाळी पावसाने रब्बीचेही नुकसान वाढत आहे. हंगाम कोणताही असो कृषी विभाग मात्र बियाणे तसेच रासायनिक खते गरजेपेक्षा जास्तीचीच उपलब्ध असल्याचा दावा करते. परंतू ऐन हंगामात शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे तसेच रासायनिक खते देखील मिळत नाहीत. राज्यातील धरणे तुडुंब भरलेली असली तरी अनेक धरणांचे पाणी सोडण्याचे वेळापत्रक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार नाही. त्यामुळे खरीप तसेच रब्बी हंगामात योग्य वेळी पिकाला पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. विहीर, बोअरवेल सिंचनामध्ये पाणी असूनही विजेच्या अभावी पिकाला पाणी देता येत नाही. योग्यवेळी पिकाला पाणी न मिळाल्यास पीक वाया जाते, नाहीतर उत्पादनात घट येते. रब्बी हंगामासाठी निविष्ठा असो की वीज, पाणी हे योग्य वेळी, पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध झालेच पाहिजे, असे नियोजन शासन-प्रशासनाने करायला हवे.   

आपल्या राज्यातील खरीप तसेच रब्बी हंगामातील बहुतांश पिकांची उत्पादकता खूपच कमी आहे. पिकांच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी दर्जेदार निविष्ठांबरोबर प्रगत लागवड तंत्राचा वापर शेतकऱ्यांकडून व्हायला पाहिजे. हल्ली सोयाबीनमध्ये बीबीएफ लागवड तंत्राचा प्रसार राज्यात वाढत आहे. या तंत्राने कमीत कमी निविष्ठांच्या वापरातून उत्पादनात चांगली वाढ होते. रब्बी हंगामातील कोणत्या पिकांसाठी बीबीएफ तंत्राचा वापर करता येईल यासह इतरही उत्पादनवाढीची सुत्रे शेतकऱ्यांना सांगायला हवीत. कीड-रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने देखील उत्पादनात घट आढळून येते. घातक कीड-रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन व्हायला पाहिजे. पाणी बचतीबरोबर उत्पादनवाढीसाठी सूक्ष्म सिंचनानेच रब्बी पिकांना पाणी देण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून झाले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com