आता मदार रब्बीवर

राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकऱ्यांना जी काही पदरमोड करायची होती, ती खरीप हंगामाच्या वेळीच करून झाली. परंतु, त्यातून हाती काहीही लागले नाही. त्यामुळे रब्बीसाठी पीककर्ज देण्याकरिता बॅंकांनी पुढे यायला हवे.
संपादकीय.
संपादकीय.

बऱ्याच दिवसांनंतर हवामान विभागाकडून एक सुखद अंदाज वर्तविण्यात आला आहे. ‘महा’ चक्रीवादळ विरून गेल्यानंतर पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. पाऊस थांबताच राज्यात हळूहळू थंडी सुरू होईल, असा हा अंदाज आहे. खरे तर अशा अंदाजाची प्रतीक्षा राज्यातील सर्वांनाच, खासकरून शेतकऱ्यांना होती. ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने खरीप पिके, फळे-भाजीपाला शेतकऱ्यांच्या हाती लागू दिली नाहीत.

राज्यातील शेतीवरील हे महासंकटच म्हणावे लागेल. आता शेतशिवारात नुकसानीची पाहणी व पंचनामे सुरू आहेत. यातून लवकर अन् भरीव मदत मिळायला हवी, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. दुसरीकडे, राज्यातील शेतकऱ्यांनी रब्बीसाठी कंबर कसली आहे. अवकाळी पावसाने केलेले नुकसान, वाढलेले गवत, काडीकचरा यांच्या स्वच्छतेत शेतकरी गुंतला आहे. या वर्षीच्या अतिपावसाने धरणे, तलाव, बंधारे, शेततळी भरलेली आहेत. नदी-नाले अजून बरेच दिवस वाहत राहतील. भूगर्भातील पाणीपातळी वाढल्याने विहिरी, कूपनलिकांना चांगले पाणी आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे जमिनीत चांगला ओलावा असल्याने सिंचनाची सोय नसलेले (जिरायती) शेतकरीसुद्धा कमी पाण्यावर येणारी रब्बी पिके या वर्षी घेऊ शकतात. त्यामुळे राज्यात रब्बीचे क्षेत्र वाढू शकते.

रब्बी हंगामात आकाश निरभ्र असते. स्वच्छ, थंड, कोरडी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश असतो. अशा हवामानात पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो. पिकांची कायिक तसेच उत्पादक वाढ चांगली होते. या सर्व नैसर्गिक अनुकूल परिस्थितीचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा, वाटाणा, राजमा, करडई, सूर्यफूल, भुईमूग, कारळ, मोहरी या पिकांसह अनेक हिवाळी भाजीपाला पिके शेतकऱ्यांना घेता येतील. विभाग, हंगाम, जमीन प्रकार यानुसार पीक आणि वाणनिवडीसाठी परिसरातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विभागाच्या विस्तार यंत्रणेने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे.

महत्त्वाचे म्हणजे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती खरीप पिके लागली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकऱ्यांना जी काही पदरमोड करायची होती, ती खरीप हंगामाच्या वेळीच करून झाली. त्यामुळे रब्बीसाठी पीककर्ज देण्याकरिता बॅंकांनी पुढे यायला हवे. वसुली, नियम-निकष थोडे बाजूला ठेवून या वेळी पीककर्ज देण्याबाबत बॅंका आणि शासनाकडून विचार व्हायला हवा. कृषी विभागाकडून शक्य तेवढे बी-बियाणे, खते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अनुदानात वाटप करायला हवेत.

सध्याच्या कठीण काळात रब्बीसाठीची पूर्वमशागत, पेरणी, आंतरमशागत अशी वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून व्हायला हवीत. खरे तर अशा घोषणा केंद्र-राज्य शासनाकडून मागील दोन-तीन वर्षांपासून सुरू आहेत. या घोषणेवर राज्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची हीच योग्य वेळ आहे. शेतकऱ्यांची वैयक्तिक कामे रोजगार हमी योजनेतून झाल्यास सध्याच्या बिकट परिस्थितीत मोठा आधार त्यांना होऊ शकतो. रब्बी हंगामाकरिता राज्यात मुबलक पाण्याची उपलब्धता असल्यामुळे सिंचनासाठी विजेचा पुरवठा सुरळीत राहील. प्रामुख्याने तो दिवसा होईल, ही काळजीदेखील घ्यायला हवी. रब्बी पिकांचे हमीभाव केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केले असून, त्यातील वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. आता त्यात बदल होणार नसला, तरी केंद्र-राज्य शासनाने मिळून रब्बी शेतीमालासाठी हमीभावावर बोनस जाहीर करावा. तसेच, खरेदीची सक्षम यंत्रणा उभी करून तो खरेदी केल्यास शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com