देवगड ‘राम्बुतान’

राम्बुतान हे मूळचे दक्षिण-पूर्व आशियाचे फळपीक असून, उष्ण आणि दमट हवामानात चांगले येते.
agrowon editorial
agrowon editorial

हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘राम्बुतान’ची बाग डौलात उभी आहे. एखाद्या प्रदेशात कोणतेही नवीन फळपीक घेतले, की सुरुवातीला त्याचे उत्पादन कसे असेल, फळांचा दर्जा कसा असेल, याबाबत शंका असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मणचे येथील (ता. देवगड) नासीर सोलकर यांच्या शेतातील पाच वर्षे वयाच्या राम्बुतानला या वर्षी चांगली फळे लागलेली आहेत. फळांचा दर्जा आणि चवही चांगली आहे. अर्थात, हे व्यावसायिक उत्पादनाचे पहिलेच वर्ष असल्याने उपादन थोडे कमी असून, झाडे जसजशी वाढतील, तसे उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे नवीन फळपीक राम्बुतानचे कोकणात उत्पादन आणि दर्जाबाबतच्या शंका सध्या तरी दूर झाल्या आहेत. राम्बुतान हे मूळचे दक्षिण-पूर्व (आग्नेय) आशियाचे फळपीक असून, उष्ण आणि दमट (ट्रॉपिकल) हवामानात चांगले येते. सागरी आग्नेय आशियातील मलेशिया, इंडोनेशिया या देशांत या फळपिकाचे उत्पादन घेतले जाते. आपल्या देशात केरळ, कर्नाटक किनारपट्टी भागांत उष्ण-दमट हवामान असल्याने तेथील काही शेतकऱ्यांनी राम्बुतानच्या बागा उभ्या केल्या आहेत. ते पाहूनच सोलकर यांनी कोकण किनारपट्टी भागात राम्बुतानची लागवड केली आहे. सध्या आपल्या देशातील मोठ्या बाजारपेठांत आग्नेय आशियाई देशांतूनच राम्बुतान फळे येतात. हे फळ खायला अत्यंत पौष्टिक असून, वजन कमी करण्यापासून ते पचनसंस्थेचे विकार आणि मुख्य म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे आहे. त्यामुळे यांस देशी-विदेशी बाजारात मागणी असून दरही चांगला मिळतो. सोलकर यांनी स्थानिक बाजारपेठेत तसेच गोव्यामध्ये फळांची विक्री केली आहे.

मागील पाच-दहा वर्षांत कोकणचे हवामान फारच बदलले आहे. कोकणमधून हिवाळा जवळपास गायब झाला आहे. कधी नव्हे ते कोकणच्या काही भागांत आता गारपीट होऊ लागली आहे. या भागात वर्षभर ढगाळ हवामान राहत असून प्रत्येक महिन्यांत पाऊस पडतोय. तापमानवाढही आढळून येतेय. अशा बदलत्या हवामानामुळे कोकणातील पारंपरिक आंबा, काजू आदी फळपिकांचे उत्पादन घेणे फारच जिकिरीचे ठरतेय. हवामान बदलाची ही समस्या राज्यभरच आढळून येतेय. त्यामुळे विभागनिहाय सर्वच फळपिके अडचणीत आहेत. विदर्भातील संत्रा, मराठवाड्यातील मोसंबी, खानदेशातील केळी, तर पश्‍चिम महाराष्ट्रातील द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. अशावेळी बाहेर देशांतील काही फळपिके आपल्या राज्यातील विविध विभागांतील बदलत्या हवामानात चांगली येतील का, याचा अभ्यास खरे तर कृषी विद्यापीठांनीच करायला हवा. यातून राम्बुतानसारखी नवनवी फळपिके राज्याला मिळतील, यात शंका नाही. नवनवीन फळपिकांचे प्रयोग शेतकरी करीत असताना यात कृषी विद्यापीठे मागे का, हा खरा प्रश्‍न आहे. राम्बुतानची लागवड प्रयोगशील शेतकऱ्यांकडून कोकणात वाढत गेली, तर त्याचे प्रगत लागवड तंत्र कृषी विद्यापीठाकडून मिळायला हवे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी कोणतेही नवीन पीक घेताना त्याची थोड्या क्षेत्रावरच लागवड करून उत्पादनाचा अनुभव घ्यावा. नवीन फळपिकांचे सुरुवातीला उत्पादन कमी असल्याने बाजारातून मागणी वाढून दर चांगले मिळतात. परंतु अनेक शेतकऱ्यांकडून लागवड वाढली की दर पडतात, असा अनुभव अनेक नव्या पिकांबद्दल शेतकऱ्यांनाच आलेला आहे. त्यामुळे बाजारपेठ आणि दराचा अंदाज घेऊनच कोकणातील इतर शेतकऱ्यांनी राम्बुतान लागवडीचा निर्णय घ्यायला हवा. तौक्ते चक्रीवादळात देवगड परिसरातील आंबा, काजूच्या बागा उन्मळून पडल्या असताना राम्बुतानच्या बागेला मात्र काहीही झाले नाही. विशेष म्हणजे राम्बुतानवर रोग-किडींचा प्रादुर्भाव जवळपास होतच नाही. अशावेळी भविष्यात देवगड हापूसबरोबर देवगड राम्बुताननेही देश-विदेशातील बाजार गाजविला तर नवल वाटू नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com