जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
अॅग्रो विशेष
हळद पिवळे करून जातेय
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने या वर्षी हळदीची मागणी वाढून हे ‘पिवळे सोने’ चांगलेच चमकत आहे.
चार वर्षांमध्ये एकदा तरी ‘हळद पिवळे करून जातेय’, अशी एक म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. अर्थात चार वर्षांत एकदा तरी हळदीला चांगला भाव मिळून जातो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. असे असताना मागील सहा-सात वर्षांपासून हळदीला चांगला दर मिळत नव्हता. त्यामुळे राज्यात क्षेत्र वाढत असताना दर कमी मिळत असल्याने हळद उत्पादकांमध्ये थोडेफार चिंतेचे वातावरण होते. ही चिंता या या वर्षी दूर झाली, असे सध्याचे तरी वातावरण आहे.
मागील १५ ते २० दिवसांपासून हळदीचे दर वाढल्याच्या बातम्या येत आहेत. अशा वातावरणातच वाई, जि. सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सेलम जातीच्या हळदीला प्रतिक्विंटल २९ हजार रुपये दर मिळाला आहे. आतापर्यंतचा हा हळदीचा उच्चांकी दर आहे. अर्थात, दर्जानुसार मिळणारा हा दर बाजार समितीतील एकूण आवकेपैकी कमी हळदीस मिळाला असला, तरी त्यात बाजार समितीत सरासरी दर हा ९ हजार ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिला आहे. हा सरासरी दरही चांगलाच म्हणावा लागेल. मागच्या सहा-सात वर्षांपासून हळदीला चार हजार ते सहा हजार असाच सरासरी दर मिळत होता. मागील वर्षी तर ऐन हळद काढणीच्या हंगामात कोरोना लॉकडाउन सुरू झाले अन् हळदीचा रंग चांगलाच फिका पडला होता. बहुतांश शेतकऱ्यांना पाच हजार पेक्षा कमीच दरात हळद विकावी लागली. त्याच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने यावर्षी मात्र हळदीची मागणी वाढून हे ‘पिवळे सोने’ चांगलेच चमकत आहे.
इतर हंगामी पिकांच्या तुलनेत हळदीचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान कमी होते. यावर कीड-रोगांचा प्रादुर्भावही कमीच आढळून येतो. हळदीची लागवड आणि काढणी या दोन्हीसाठी शेतकऱ्यांना खूप वेळ मिळतो. शेतकरी १५ मे ते ३० जूनपर्यंत हळदीची लागवड, तर फेब्रुवारी ते मेपर्यंत काढणी करू शकतात. असे इतर हंगामी पिकांच्या बाबतीत करता येत नाही. हळदीला कोणताही जंगली प्राणी नुकसान करीत नाही. अशा काही कारणांमुळे मागील दशकभरात मराठवाडा, विदर्भात हळदीची लागवड वाढली आहे. असे असले तरी सांगली-सातारा जिल्ह्यांपेक्षा या भागात हळदीचे एकरी उत्पादन खूप कमी मिळते. योग्य नियोजनातून हळदीच्या उत्पादनात एकरी १० क्विंटलपर्यंत वाढ होऊ शकते. मराठवाड्यात वसमत, हिंगोली, नांदेड या हळदीसाठी बऱ्यापैकी बाजारपेठा विकसित झाल्या आहेत. परंतु विदर्भात क्षेत्र वाढत असताना सुद्धा बाजारपेठा विकसित होताना दिसत नाही. त्यामुळे हळद उत्पादकांना दर कमीच मिळतो. सांगली-सातारा भागांत सध्या नऊ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असताना विदर्भात सात हजार ते आठ हजार, तर मराठवाड्यात नऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय. या वर्षी कोरोनामुळे हळदीला मागणी वाढत असताना दर स्थिर राहतील, असा विश्वास शेतकऱ्यांना वाटतोय.
मसाल्याचे पीक म्हणून हळदीचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर होतो. औषधी आणि सौंदर्य प्रसाधने उद्योगातही हळदीचा वापर होतो. कोरोना काळात तर घरगुती वापरासह अनेक प्रकारच्या औषधांमध्ये हळदीचा वापर वाढला आहे. काही औषधी कंपन्यांनी हळदीचे ड्रॉप्स तसेच पावडर स्वरूपातील औषधे नव्याने बाजारात आणली आहेत. त्यामुळे हळदीला देशांतर्गत तसेच विदेशी बाजारातूनही मागणी वाढतच जाणार आहे. हळदीवर योग्य प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थित मार्केटिंग झाल्यास उत्पादकांना चांगले दर मिळू शकतात. हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हळदीवर प्रक्रिया करून विक्री केल्यास, शिवाय उत्पादक कंपन्यांच्या मार्फत निर्यात वाढविल्यास दर चार वर्षांनी नाही तर दरवर्षी हळद शेतकऱ्यांना पिवळे करून जाईल, हे मात्र नक्की!
- 1 of 691
- ››