भार व्यवस्थापनाचे बळी

शासन-प्रशासनाने मनावर घेतले, प्रबळ इच्छाशक्ती दाखविली, तर शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरविली जाऊ शकते. तसे पर्याय उपलब्ध करता येतात.
agrowon editorial
agrowon editorial

जालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे येथील तिघे सख्ख्ये भाऊ  रात्रीच्या वेळी गव्हाला पाणी देण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागून तिघेही विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. घरातील तीन कर्ते युवक दगावल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. शेतीला कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीज द्या, अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देताना शेतकऱ्यांना असंख्य तांत्रिक अडचणी येतात, वन्यप्राण्यांचा हल्ला होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे, काहींना प्राणासही मुकावे लागले आहे. शिवाय अंधारात विजेचा धक्का लागून यापूर्वी देखील अनेक शेतकऱ्यांचे जीव गेले आहेत.

शेतकऱ्यांना कायम दिवसा, पूर्ण दाबाने वीज मिळावी, ही मागणी ‘अॅग्रोवनने देखील सातत्याने लावून धरली आहे. यावर आधीच गांभीर्याने विचार झाला असता, तर जाधव कुटुंबातील तिघा भावांसह अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. एखाद्याचा असा अपघाती जीव गेला, तर त्याची पैशात खरे तर भरपाईच होऊ शकत नाही. विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांचा जीव गेला, कायमस्वरूपी अपंगत्व आले, तर अनुक्रमे चार लाख आणि दोन लाख अशी नुकसानभरपाईची तरतूद आहे. जनावरे दगावली अथवा पिकांचेही नुकसान झाले तर भरपाईची सोय आहे. परंतु पुन्हा पाहणी, अहवाल, चौकशी या फेऱ्यात अनेकांना बाद केले जाते. काहींना भरपाई मिळाली, तरी ती फारच विलंबाने मिळते.

शासन-प्रशासनाने मनावर घेतले, प्रबळ इच्छाशक्ती दाखविली तर शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरविली जाऊ शकते. तसे पर्याय उपलब्ध करता येतात. परंतु ही इच्छाशक्ती आतापर्यंत कोणत्याही राज्यकर्त्याने दाखविली नाही. तिघा भावांच्या मृत्यूनंतरच्या दुसऱ्याच दिवशी नवीन कृषिपंप वीजजोडणीचे धोरण राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत लघू-उच्च दाब, सर्व्हिस कनेक्शन आणि सौर कृषिपंपाद्वारे दरवर्षी एक लाख वीज जोडण्या देण्यात येणार, तसेच तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने कृषी ग्राहकांना कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.  

औष्णिक वीज प्रकल्प २४ तास चालतात. अशावेळी सगळ्यांना दिवसा वीज दिली, तर रात्रीच्या विजेचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे भार व्यवस्थापनांतर्गत सध्या शेतीला आठवडाभर दिवसा, तर आठवडाभर रात्री वीज दिली जाते. आणि याच भार व्यवस्थापनाचे बळी राज्यातील शेतकरी ठरत आहेत. यावर पर्याय म्हणजे शासनाने शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याऐवजी सोलर प्लांट उभारायला हवेत. या प्लांटमधून सोलर फीडरला आणि सोलर फीडरवरून कृषिपंपाना वीज देता येईल. सोलर पंपाला पॅनेलसाठी जागा लागते, त्यास कुंपण करावे लागते, त्यात काही तूट-फूट झाल्यास त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चाचा भार शेतकऱ्यांवर पडतो. सोलर फीडरला हे सर्व काही लागणार नाही. सोलर फीडरवरील कृषी वाहिन्या प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झाल्या आहेत.

शेतीपंपाचा वीजभार ६००० ते ७००० मेगावॉट आहे. तीन वर्षांत शेतकऱ्यांना दिवसा कायम वीज द्यायची म्हटले, तर दरवर्षी १००० ते १२०० मेगावॉटची कामे करावी लागतील. तेवढे सोलर प्लांट बसवावे लागतील. असे हे साधे सोपे गणित असून ते करणे शक्य आहे. त्याही पुढे जाऊन ३५०० मेगावांटचे काम हाती घेतले, तर वर्षभरात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे यासाठी शासनाला पैसा गुंतवणूक करावा लागणार नाही. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सोलर प्लांट उभारणीची योजना आखता येऊ शकते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com