रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रम

प्राप्त परिस्थितीमध्ये मर्यादित संसाधनांवर शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले असतात. एखाद्या नव तंत्रज्ञानाचा अवलंब करताना त्यात आपल्या सोयीनुसार बदल केलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रयोग हे अनुकरणीय असतात.
agrowon editorial
agrowon editorial

हवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर आपल्या   देशात हवामान बदलाची प्रक्रिया मागील तीन-चार दशकांपासून सुरु झाली असून २०१० पासून याचे चटके वाढलेले आहेत. बदलत्या हवामान काळात सर्वाधिक नुकसान हे शेती क्षेत्राचे झाले असून यांत शेतकरी होरपळून निघत आहे. चालू खरीपाचे भीषण वास्तव सर्वांसमोर आहे. मागची चार-पाच महिने जोपासलेली खरीप पिके अतिवृष्टीने क्षणार्धात नेस्तनाबूत झाली आहेत. चालू दशक तर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पावसाने चांगलेच गाजवले आहे. नैसर्गिक आपत्तीत कितीही नुकसान झाले तरी शेतकरी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो. आत्ताही तो यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू बदलत्या हवामानानुसार नेमकी कोणती पिके घ्यावीत? हंगामनिहाय पीक पेरणीच्या वेळात काही बदल करुन नुकसान कमी करता येईल का? अतिवृष्‍टी, अनावृष्टी, अतिथंडी, वाढते उष्णतामान अशा काळात पीकनिहाय विशिष्ट काळजी घेऊन नुकसान टाळता येईल का? याबाबतचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना आता हवे आहे. परंतू राज्यातील कृषी विद्यापीठे असोत का संशोधन संस्था (काही अपवाद) यांच्याकडून असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. अशावेळी महाराष्ट्र राज्यातील पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’ स्थापन करण्यात आली असून या शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगांतून हवामान बदलाच्या काळात इतर शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे.

रिसोर्स बॅंक हा उपक्रम आता राबविण्यात येत असला तरी याला बराच उशीर झाला असे म्हणावे लागेल. यापूर्वी शेतकऱ्यांच्या संशोधनाला बळ देण्यापासून त्यांचा राज्यभर इतरत्र प्रसार करण्याबाबतच्या गप्पा खूप झाल्या. परंतू त्यात पुढे काहीही काम झाले नाही, तसे रिसोर्स बॅंकेचे होणार नाही, हेही पाहावे लागेल. रिसोर्स बॅंकेमध्ये राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून एकूण पाच हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असला तरी या यादीत अजून खूप शेतकऱ्यांची भर पडू शकते. या बॅंकेत प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी ही बॅंक सक्षम होणार आहे. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांबरोबर इतरही अभिनव प्रयोग करणारे अनेक शेतकरी राज्यात आहेत. पीक उत्पादनवाढीबरोबर काही शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया, विक्रीची नवीन मॉडेल्स उभारली आहेत. एखाद्या पिकाचे वाण विकसित करण्याबरोबर नवीन यंत्रे, अवजारांची जुगाडातून निर्मिती केलेल्या शेतकऱ्यांची संख्याही राज्यात कमी नाही. शेतीपूरक व्यवसायातही अनेक शेतकऱ्यांनी चांगला ठसा उमटविला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना शोधून त्यांना रिसोर्स बॅंकेत स्थान मिळायला हवे.     

प्राप्त परिस्थितीमध्ये मर्यादित संसाधनांवर शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले असतात. एखाद्या नव तंत्रज्ञानाचा अवलंब करताना त्यात आपल्या सोयीनुसार बदल केलेला असतो. विविध नैसर्गिक आपत्तींवर मात करण्याचे कसब असते. विशेष म्हणजे आपल्याच भागातील शेतकऱ्यांनी केलेला यशस्वी प्रयोग परिसरातील इतर शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतोच. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रयोग हे अनुकरणीय असतात. असे असताना कृषी संशोधन संस्था तसेच शासनाकडून देखील शेतकऱ्यांचे हे प्रयोग दुर्लक्षित राहिले आहेत. ही उणीव रिसोर्स बॅंकेने भरुन काढायला हवी. महत्वाचे म्हणजे केवळ रिसोर्स बॅंकेत प्रयोगशील शेतकऱ्यांना समाविष्ट केले म्हणजे झाले, असे समजू नये. यात दाखल शेतकऱ्यांचे पीक, विभागनिहाय वर्गीकरण करून त्यांनी अवलंबलेल्या तंत्रावरुन मार्गदर्शक सल्ले तयार करावे लागतील. यशस्वी शेतकऱ्यांचे काही प्रयोग थेट मॉडेल म्हणूनही राबवता येतील. हे सर्व गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोचवून त्यांच्याकडून त्याचे अनुकरण होईल, हेही पाहावे लागेल. असे झाले तरच रिसोर्स बॅंकेचा उद्देश सार्थ ठरेल, हे लक्षात घ्यायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com