अफवांचे अमाप पीक

समाजातील एका मोठ्या वर्गाचे आर्थिक, नुकसान होणारी बातमी असेल तर त्याची सत्यता पुन्हा पुन्हा पडताळून पाहणे गरजेचे असते. हे करीत असताना त्या बातमीचे पुढे काय परिणाम होतील, याचेही भान माध्यमांनी ठेवणे आवश्यक आहे.
agrowon editorial
agrowon editorial

सत्य पायात खेटर घालेपर्यंत असत्य, अफवा गाव फिरुन आलेले असते, असे म्हटले जाते आणि ते अगदी खरे देखील आहे. चांगल्या बाबींचा प्रसार लवकर होत नाही, असत्य, अफवा, चुकीच्या गोष्टी मात्र वाऱ्यासारख्या पसरतात. कांदा तसेच डाळींचे किरकोळ बाजारातील दर वधारले की काही वृत्त वाहिन्या (टिव्ही चॅनेल्स) लगेच गृहीनी, ग्राहकांच्या डोळ्यातील अश्रू दाखवतात. या वाहिन्यांनी त्याच वेळी हा शेतमाल शेतकऱ्यांना पिकविताना किती खर्च होतो, किती त्रास होतो, हे देखील दाखवायला पाहिजे. शेतमालाशिवाय इतर उत्पादनांचे दर गगनाला भिडले तरी त्यावेळी ह्या वाहिन्या ‘ब्र’ देखील काढत नाहीत. महागाईच्या टिव्ही चॅनेल्सवरील बातम्या पाहून केंद्र सरकारलाही लगेच जागे होते. मग दर कमी करण्यासाठीच्या सर्व अस्त्रांचा वापर त्यांच्याकडून सुरु होतो. हीच माध्यमे दराअभावी शेतकऱ्यांना शेतमाल फेकून द्यावा लागतो, तेंव्हा कोठे जातात, माहीत नाही.

देशात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अगदी सुरवातीच्या काळात याची लागण चिकन मधून होते, अशा निराधार बातम्या काही चॅनेल्सने दाखविल्या. सोशल मीडियावर या बातम्यांच्या क्लिप्स अत्यंत झपाट्याने व्हायरल झाल्या. परिणामी कोरोनाने आधीच धास्तावलेल्या लोकांनी चिकन, अंडी खाणे बंद केले. त्यामुळे कोंबड्या, अंड्यांची मागणी घटली, दर कोसळले. याचा मोठा आर्थिक फटका कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला. पुढे चिकनमधून कोरोनाची लागण, प्रसार होत नसल्याचे स्पष्ट झाले, परंतू तोपर्यंत कोंबडीपालन व्यवसाय उध्वस्त करण्याचे काम या अफवेने केले.

कोरोना लॉकडाउनमुळे फळे-भाजीपाल्यास अत्यंत कमी दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतात नांगर फिरवावा लागत आहे. तर काही भाजीपाला उत्पादक मोठी जोखीम पत्करुन शहरांत भाजीपाल्याची स्वःत विक्री करीत आहेत. नेमक्या अशा परिस्थितीत टोमॅटोमधून कोरोनाची लागण होते अथवा टोमॅटोवर कोरोनापेक्षा भीषण विषाणूजन्य रोग आला असून असे टोमॅटो खाण्यात आल्यास मानवी आरोग्याला सुद्धा धोका पोचू शकतो अशी बातमी शास्त्रीय आधाराविना एका टिव्ही चॅनेलने चालविली. ही बातमी अतिरंजित करुन सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यात आली. परिणामी टोमॅटोची मागणी घटून दरात कमालीची घसरण झाली आहे. यात टोमॅटो उत्पादकांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.

खरं तर वनस्पती, पिके अथवा झाडांना अनेक प्रकारचे विषाणूजन्य रोग होतात. परंतू वनस्पती अथवा पिकांवरील एकाही विषाणूची बाधा माणसाला होत नाही, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. संबंधित बातमी देताना याची खातरजमा एखाद्या वनस्पतीरोग तज्ज्ञांना विचारुन केली असती अथवा याबाबत ‘गुगल’ जरी केले असते, तर पुढील सर्व हानी टळली असती. समाजातील एका मोठ्या वर्गाचे आर्थिक, नुकसान होणारी बातमी असेल तर त्याची सत्यता पुन्हा पुन्हा पडताळून पाहणे गरजेचे असते. हे करीत असताना त्या बातमीचे पुढे काय परिणाम होतील, याचेही भान माध्यमांनी ठेवणे आवश्यक आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी अतिरंजित बाजम्या दाखवून लोकांची झोप उडविण्याचे काम केले. अनेकांनी कोरोनाच्या टिव्ही चॅनेल्सवरील बातम्या पाहून भीती वाटत असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यानच्या काळात वर्तमानपत्रे काही दिवस बंद असल्याने खात्रीशीर तसेच विश्लेषणात्मक बातम्यासाठी वर्तमानपत्रे तत्काळ सुरु करण्याची विनंती देशभरातील वाचकांनी केली. यावरुन टिआरपीच्या नादात भडक ब्रेकींग न्यूज देणाऱ्यांनी काहीतरी बोध घ्यायला हवा. सोशल मीडियाद्वारे एखादी पोस्ट पुढे ढकलून देताना ती कितपत खरी आहे, याचाही प्रत्येकाने सारासार विचार केला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com