सडेवाडीचा आदर्श

सडेवाडी येथील शेती लहरी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. परंतु या गावातील शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या लहरीपणावर कल्पकतेने मात केली आहे.
agrowon editorial
agrowon editorial

या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अंदाजाप्रमाणे थोड्या अडथळ्यातच, परंतु राज्यात पावसाला वेळेवर सुरवात झाली. रोहिनी नक्षत्रातील पूर्वमोसमी पाऊस अन् मृग नक्षत्रातील मॉन्सूनच्या सरीवर खरीप पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपून घेतल्या. परंतु मागील जवळपास १० ते १५ दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात पाऊस दडी धरून बसला आहे. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, असे शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु अशी सोय नसलेले बहुतांश शेतकऱ्यांचे भात, कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद ही पिके वाया जातात की काय? अशी सध्याची परिस्थिती आहे. आधीच प्रचंड आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी एकदाची खरिपाच्या पेरणीची सोय कशीतरी लावली आहे. या शेतकऱ्यांवर पावसाचा खंड म्हणा की इतर कोणत्या कारणाने दुबार पेरणीचे संकट ओढवले तर बहुतांश शेतकरी दुबार पेरणी करूच शकणार नाहीत, हे वास्तव आहे. अशा वेळी खेड तालुक्यातील (जि. रत्नागिरी) सडेवाडी येथील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाण्याची एकत्र येऊन केलेली सोय आणि सामुदायिक शेतीचा आदर्श राज्यातील सर्वच गावांनी घ्यायला हवा. 

सडेवाडी येथील शेती लहरी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. परंतु या गावातील शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या लहरीपणावर कल्पकतेने मात केली आहे. गाव परिसरातील डोंगर उतारावरील नैसर्गिक झरे अडवून त्याचे पाणी भूमिगत बंधाऱ्याद्वारे मोठ्या हौदात घेतले. परिसरातील काही सेवाभावी संस्थांनी त्यांना हौद, टाक्या बांधण्यासाठी मदत केली. हौद, टाक्यांत साठविलेल्या पाण्यावर गावातील शेतकऱ्यांनी भाताची रोपं तयार करून आता पुनर्लागवड सुरूदेखील केली आहे. त्याचवेळी मागील काही दिवसांपासून या भागात पावसाने दडी मारल्याने या तालुक्यातील इतर गावांतील शेतकरी मात्र भात रोप निर्मिती आणि पुनर्लागवडीसाठी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.

दिवसेंदिवस पाऊस खूपच अनियमित होतोय. कमी पाऊसमान काळात दुष्काळ, तीव्र पाणीटंचाईने शेतीचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर चांगल्या पाऊसमान काळातही पेरणीच्या वेळी, पिके उगवून येताना, वाढीच्या अवस्थेत, फुले-पात्या-शेंगा लागताना ज्या वेळी पिकांना पाण्याची खूपच गरज असते, नेमक्या अशावेळी पावसाचा खंड पडून हंगाम हातचा जातो, हे आपण अनुभवतोय. अशावेळी राज्यातील ८२ टक्के जिरायती शेतीपैकी अधिकाधिक शेती क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आणावेच लागेल तरच या शेतीला भवितव्य आहे. जिरायती शेती व्‍यापक प्रमाणावर सिंचनाखाली आणायची म्हणजे हे काम एकट्या-दुकट्या शेतकऱ्याचे नाही. याकरिता गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांमधून पावसाळ्यात वाहणारे पाणी अडवून, साठवून ठेवावे लागेल.

राज्यात सडेवाडीसारखी अनेक गावे-वाड्या-वस्त्या दुर्गम डोंगराळ भागात आहेत. अशा गावांनी सडेवाडीप्रमाणे परिसरातील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी एकत्रित करून त्याचा सामुदायिक वापर करायला हवा. इतर गावांमध्येसुद्धा नैसर्गिक झरे उपलब्ध नसले तरी ओढे-नाले-ओहोळ-लहान नद्या वाहत असतात. अशा जलस्त्रोतांमधील पाणी पावसाळ्यात अडवून साठवून ठेवावे. तर काही गावांमध्ये जुन्या विहिरी, बारव, तलाव हे काडीकचरा, गाळाने भरलेले आहेत. त्यांचे पुनर्जीवित करून शेतीला संरक्षित सिंचनाची सोय करता येऊ शकते. या कामी शासनाला कुठे, कसा, हातभार लावता येईल ते पाहावे. अन्यथा गावातील शेतकरी एकत्र आले आणि त्यांना गावपरिसरातील काही सेवाभावी संस्थांची साथ मिळाली तरी सडेवाडीप्रमाणे शेतीला संरक्षित सिंचनाची सोय होऊन जिरायती शेती शाश्वत होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com