दुबई वारी फलदायी ठरावी

युरोपीय देश, आखाती देश तसेच अमेरिका या देशांत संत्रा निर्यात वाढविण्यासाठी अपेडा, एनआरसीसी तसेच केंद्र-राज्य शासन यांच्याकडून प्रयत्न झाले पाहिजेत.
agrowon editorial
agrowon editorial

संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे. नागपूरच्या संत्र्याचा आकर्षक रंग आणि आंबट-गोड अशा अवीट चवीने जगाला भुरळ पाडली जाऊ शकते. मात्र, कधी श्रीलंका तर कधी बांगलादेश यापुढे नागपुरी संत्रा गेला नाही. यांस कारण म्हणजे आत्तापर्यंत केंद्र-राज्य शासन आणि प्रशासन पातळीवर या फळपिकाबाबत कमालीची उदासीनता हे आहे. आत्ताच्या हंगामात नागपुरी संत्र्याला दुबईला पाठविण्याची तयारी उत्पादकांकडून सुरू आहे. यांस कसा प्रतिसाद मिळतो, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. संत्रा हे विदर्भाच्या मातीत रुजलेलं एकमेव फळपीक आहे. खरे तर विदर्भाच्या जिरायती शेतीतील कापूस आणि सोयाबीन या कमी उत्पन्न देणाऱ्या पिकांना संत्रा सक्षम पर्याय ठरणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. संत्रा हे फळपीक संशोधन, प्रक्रिया आणि विक्री-निर्यात अशा सर्वच पातळ्यांवर पिछाडीवर आहे.

अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात पसरलेल्या अनेक संत्रा बागा मागील सततच्या दुष्काळात वाळल्या. तसेच मागील अतिवृष्टी अवकाळी पाऊस, गारपीट यांनीही संत्र्याचे मोठे नुकसान केले आहे.  संत्राच्या नवीन बागा लावल्या जात असल्याचे बोलले जाते. परंतु त्या प्रमाणात अपेक्षित क्षेत्र वाढ दिसून येत नाही. लिंबूवर्गीय फळपिकांचे राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र (एनआरसीसी) नागपूर येथे आहे. परंतु, पुरातन काळापासून चालत आलेल्या ‘नागपुरी संत्रा’ या वाणाला सक्षम असा पर्याय (दुसरे वाण) अजूनही उत्पादकांना उपलब्ध होऊ शकला नाही. नागपुरी संत्र्याची चव चांगली असली, तरी साल पातळ आहे. त्यात बियांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या फळाची टिकाऊक्षमता कमी असून, प्रक्रियेसाठीसुद्धा हा वाण चांगला समजला जात नाही.  

विदर्भातून देशभरातील बाजारात संत्रा जातो. परंतु विक्री, साठवण, वाहतूक यांबाबत कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने उत्पादकांसह व्यापाऱ्यांनापण प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. आत्ताही ट्रकमध्ये संत्रा मोकळा भरून देशांतर्गत विक्रीसाठी पाठविला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा खराब होऊन त्यास दरही कमी मिळतो. संत्र्याची प्रतवारी, व्हॅक्स कोटिंग आणि बॉक्स पॅकिंगमध्ये विक्रीसाठी पाठविला, तर त्याची टिकाऊक्षमता वाढते, प्रत चांगली राहून दरही अधिक मिळतो. परंतु संत्रा ग्रेडिंग, पॅकिंगचे दोनच प्रकल्प विदर्भात असून, तेही बंदच असतात. 

संत्रा निर्यातीच्या बाबतीत तर फारच दयनीय अवस्था आहे. संत्रा निर्यात प्रामुख्याने शेजारील देशांत होते. त्यातही सातत्य दिसून येत नाही. बांगला देशने आयातशुल्क वाढविल्याने तेथील संत्रा निर्यात रोडावली आहे. युरोप, अमेरिकेला संत्रा पाठवायचा, तर त्यांना कीडनाशके अंशमुक्त (रेसिड्यूफ्री) संत्रा लागतो. आता तर हे देश कीड-रोगमुक्त क्षेत्रातून उत्पादित शेतीमाल स्वीकारणार आहेत. संत्र्याचे कीडनाशके अंशमुक्त उत्पादन घेण्यासाठी ‘सिट्रसनेट’ तयार नाही. सिट्रसनेटच्या प्रक्रियेस आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. चीन हा शेतीमालासाठी मोठा आयातदार देश मानला जातो. परंतु, त्यांच्या प्रोटोकॉल लिस्टमध्ये संत्र्याचे नावच नाही. केंद्रीय कृषी तसेच वाणिज्य मंत्रालयांच्या पातळीवर याबाबत प्रयत्न झाल्यास चीनशी संत्रा निर्यात सुरू होऊ शकते. याशिवाय युरोपीय देश, आखाती देश तसेच अमेरिका या देशांत संत्रा निर्यात वाढविण्यासाठी अपेडा, एनआरसीसी तसेच केंद्र-राज्य शासन यांच्याकडून प्रयत्न झाले पाहिजेत. दुबईसाठी होत असलेल्या निर्यातीतून अपेडासह शासन यासाठी पावले उचलत असल्याचे दिसून येते. त्यात आता कोणीही खंड पडू देणार नाही, एवढीच माफक अपेक्षा!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com