agriculture news in marathi agrowon agralekh on santra export | Agrowon

दुबई वारी फलदायी ठरावी

विजय सुकळकर
मंगळवार, 14 जानेवारी 2020

युरोपीय देश, आखाती देश तसेच अमेरिका या देशांत संत्रा निर्यात वाढविण्यासाठी अपेडा, एनआरसीसी तसेच केंद्र-राज्य शासन यांच्याकडून प्रयत्न झाले पाहिजेत.
 

संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे. नागपूरच्या संत्र्याचा आकर्षक रंग आणि आंबट-गोड अशा अवीट चवीने जगाला भुरळ पाडली जाऊ शकते. मात्र, कधी श्रीलंका तर कधी बांगलादेश यापुढे नागपुरी संत्रा गेला नाही. यांस कारण म्हणजे आत्तापर्यंत केंद्र-राज्य शासन आणि प्रशासन पातळीवर या फळपिकाबाबत कमालीची उदासीनता हे आहे. आत्ताच्या हंगामात नागपुरी संत्र्याला दुबईला पाठविण्याची तयारी उत्पादकांकडून सुरू आहे. यांस कसा प्रतिसाद मिळतो, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. संत्रा हे विदर्भाच्या मातीत रुजलेलं एकमेव फळपीक आहे. खरे तर विदर्भाच्या जिरायती शेतीतील कापूस आणि सोयाबीन या कमी उत्पन्न देणाऱ्या पिकांना संत्रा सक्षम पर्याय ठरणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. संत्रा हे फळपीक संशोधन, प्रक्रिया आणि विक्री-निर्यात अशा सर्वच पातळ्यांवर पिछाडीवर आहे.

अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात पसरलेल्या अनेक संत्रा बागा मागील सततच्या दुष्काळात वाळल्या. तसेच मागील अतिवृष्टी अवकाळी पाऊस, गारपीट यांनीही संत्र्याचे मोठे नुकसान केले आहे.  संत्राच्या नवीन बागा लावल्या जात असल्याचे बोलले जाते. परंतु त्या प्रमाणात अपेक्षित क्षेत्र वाढ दिसून येत नाही. लिंबूवर्गीय फळपिकांचे राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र (एनआरसीसी) नागपूर येथे आहे. परंतु, पुरातन काळापासून चालत आलेल्या ‘नागपुरी संत्रा’ या वाणाला सक्षम असा पर्याय (दुसरे वाण) अजूनही उत्पादकांना उपलब्ध होऊ शकला नाही. नागपुरी संत्र्याची चव चांगली असली, तरी साल पातळ आहे. त्यात बियांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या फळाची टिकाऊक्षमता कमी असून, प्रक्रियेसाठीसुद्धा हा वाण चांगला समजला जात नाही.  

विदर्भातून देशभरातील बाजारात संत्रा जातो. परंतु विक्री, साठवण, वाहतूक यांबाबत कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने उत्पादकांसह व्यापाऱ्यांनापण प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. आत्ताही ट्रकमध्ये संत्रा मोकळा भरून देशांतर्गत विक्रीसाठी पाठविला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा खराब होऊन त्यास दरही कमी मिळतो. संत्र्याची प्रतवारी, व्हॅक्स कोटिंग आणि बॉक्स पॅकिंगमध्ये विक्रीसाठी पाठविला, तर त्याची टिकाऊक्षमता वाढते, प्रत चांगली राहून दरही अधिक मिळतो. परंतु संत्रा ग्रेडिंग, पॅकिंगचे दोनच प्रकल्प विदर्भात असून, तेही बंदच असतात. 

संत्रा निर्यातीच्या बाबतीत तर फारच दयनीय अवस्था आहे. संत्रा निर्यात प्रामुख्याने शेजारील देशांत होते. त्यातही सातत्य दिसून येत नाही. बांगला देशने आयातशुल्क वाढविल्याने तेथील संत्रा निर्यात रोडावली आहे. युरोप, अमेरिकेला संत्रा पाठवायचा, तर त्यांना कीडनाशके अंशमुक्त (रेसिड्यूफ्री) संत्रा लागतो. आता तर हे देश कीड-रोगमुक्त क्षेत्रातून उत्पादित शेतीमाल स्वीकारणार आहेत. संत्र्याचे कीडनाशके अंशमुक्त उत्पादन घेण्यासाठी ‘सिट्रसनेट’ तयार नाही. सिट्रसनेटच्या प्रक्रियेस आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. चीन हा शेतीमालासाठी मोठा आयातदार देश मानला जातो. परंतु, त्यांच्या प्रोटोकॉल लिस्टमध्ये संत्र्याचे नावच नाही. केंद्रीय कृषी तसेच वाणिज्य मंत्रालयांच्या पातळीवर याबाबत प्रयत्न झाल्यास चीनशी संत्रा निर्यात सुरू होऊ शकते. याशिवाय युरोपीय देश, आखाती देश तसेच अमेरिका या देशांत संत्रा निर्यात वाढविण्यासाठी अपेडा, एनआरसीसी तसेच केंद्र-राज्य शासन यांच्याकडून प्रयत्न झाले पाहिजेत. दुबईसाठी होत असलेल्या निर्यातीतून अपेडासह शासन यासाठी पावले उचलत असल्याचे दिसून येते. त्यात आता कोणीही खंड पडू देणार नाही, एवढीच माफक अपेक्षा!


इतर संपादकीय
निर्यातवृद्धीचे शुभसंकेतपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि...
फळांचा राजा संकटाच्या फेऱ्यातमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...