निर्यातीसाठी संत्रा आंबटच! 

संत्र्याची लंकेवर स्वारी अथवा दुबईला वारी, अशा बातम्या अधूनमधून येत असतात. परंतु हे संत्रा निर्यातीसाठीचे केलेले प्रयोग असतात.
agrowon editorial
agrowon editorial

सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क जवळपास दुप्पट केल्यानंतर आता पुन्हा आयातशुल्क प्रतिकिलो नऊ रुपयांनी वाढविले आहे. आयात शुल्कात दुपटीने वाढ केली तेव्हा बांगलादेशच्या या निर्णयाला भारतातून तीव्र विरोध झाला. केंद्र सरकार पातळीवर आयात शुल्क कमी करण्याबाबत पाठपुरावा झाला. बांगलादेशमधून आपण आयात करीत असलेल्या वस्तू-उत्पादनांवर आयात शुल्क आकारायचे, वाढवायचे अशाही गप्पा झाल्या. परंतु तसा निर्णय घेण्याचे धाडस मात्र तत्कालीन केंद्र सरकारने दाखविले नाही. उलट आता पुन्हा बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क वाढवून भारतातील म्हणण्यापेक्षा विदर्भातील संत्रा उत्पादकांची चांगलीच कोंडी केली आहे. सध्याची आयात शुल्कातील वाढ तर थेट केंद्र सरकारला आव्हानच म्हणावे लागेल. संत्र्याची लंकेवर स्वारी अथवा दुबईला वारी, अशा बातम्या अधूनमधून येत असतात. परंतु हे संत्रा निर्यातीसाठीचे केलेले प्रयोग असतात. दीर्घकाळासाठी असे प्रयोग यशस्वी कधीच झाले नाहीत. संत्र्याची मोठ्या प्रमाणात आणि शाश्‍वत निर्यात ही बांगलादेशलाच होत असते. दीड लाख टन संत्रा बांगलादेशला निर्यात होते. परंतु या निर्यातीच्या मार्गातही सातत्याने अडथळे वाढतच आहेत. 

भारत - बांगलादेश यांचा द्विपक्षीय व्यापार मोठा आहे. भारत बांगलादेशकडून सूत, खनिज इंधन, सिमेंट, मासे आणि तयार कपड्यांची मोठ्या प्रमाणात आयात करतो. तर भारतातून बांगलादेशला भात, साखर, कडधान्ये, कांदा संत्रा, केळी अशा शेतीमालासह रसायने, औषधे आदींची निर्यात होते. दोन वर्षांपूर्वी भारत-बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय व्यापार ६.६ अब्ज डॉलरचा होता. हा आकडा आता निश्‍चितच वाढलेला असणार आहे. आयात-निर्यात ही परस्पर दोन्ही देशांची एकमेकांची गरज असते. अशावेळी आपण बांगलादेशकडून आयात करीत असलेल्या वस्तू-उत्पादनांवर आयात शुल्क वाढवून त्यांच्या नाड्या आवळू शकतो. बांगलादेशचे नाक दाबून तोंड उघडण्यासाठी त्यांना होत असलेल्या निर्यातीवर तात्पुरते निर्बंध लादण्याबाबतही विचार व्हायला हवा. हे करीत असताना देशांतर्गत शेतीमालाचे दर पडणार नाहीत, ही काळजी मात्र घ्यायला हवी. 

संत्रा म्हटले की ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखले जाणारे नागपूर डोळ्यापुढे येते. अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हा भाग तर विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. हे सारे कवित्व सोडले तर बाकीचे वास्तव खुपणारे, बोचणारेच आहे. विदर्भातील शेतकरी संत्र्याचे तीन बहर घेतात. मात्र कुठल्याही बहराचा संत्रा बाजारात आला की दर कोसळतात. उत्पादकांना तो मातीमोल भावानेच विकावा लागतो. अनेक वेळा तर फेकूनही द्यावा लागतो. विदर्भातून देशभरातील बाजारपेठेत संत्रा जातो; परंतु विक्री, साठवण, वाहतूक यांबाबत पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने यात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही अनेक अडचणी येतात. लिंबूवर्गीय फळपिकांचे राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. परंतु पुरातन काळापासून चालत आलेल्या ‘नागपुरी संत्रा’ या वाणाला सक्षम असा पर्याय आजतागायत उत्पादकांना उपलब्ध होऊ शकला नाही. नागपुरी संत्र्याची चव चांगली असली, तरी साल पातळ आहे. त्यात बियांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या फळाची टिकाऊक्षमता कमी असून, प्रक्रियेसाठीसुद्धा हा वाण चांगला समजला जात नाही. संत्र्यावर प्रक्रिया करून ज्यूस, वाइनसह इतरही अनेक पदार्थ बनविता येतात. परंतु प्रतवारी, वॅक्स कोटिंग पलीकडे संत्रा मूल्यवर्धनाचे काम गेले नाही. याचे प्रकल्पही अनेक वेळा बंदच असतात. नागपुरी संत्र्याला जगभरातून मागणी आहे. परंतु जगभरातील अशा बाजारपेठा ओळखून तेथपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही, हे संत्रा उत्पादकांचे दुर्दैव म्हणावे लागेल. संत्र्यांची निर्यात वाढल्याशिवाय तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया झाल्याशिवाय उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com