हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
संपादकीय
शिस्त पाळा लॉकडाउन टाळा
मागील लॉकडाउनच्या धक्क्यातून आता कुठे आपण सर्वजाण सावरत असताना पुन्हा तेच लॉकडाउनचे संकट दाराशी येऊन ठेपले आहे.
राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ आढळून येत आहे. राज्यातील रुग्णवाढ ही कोरोनाची दुसरी लाट नसल्याचे आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले असले तरी वाढता संसर्ग हा लाटेप्रमाणेच आहे. राज्यात कोरोना विषाणूचा आढळलेला हा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याचा इशारा ‘एम्स’ रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदिप गुलेरिया यांनी दिला आहे.
खरे तर कोरोनाचे दुसऱ्या लाटेचे हे संकट आपणच आपल्या बेजबाबदार वर्तनातून ओढवून घेतले आहे. इटली, स्पेन, इंग्लंड , नेदरलॅंड या युरोपियन देशांसह अमेरिकेत मागील नोव्हेंबरमध्येच दुसरी लाट आली होती. या सर्वच देशांत दुसऱ्या लाटेतील विषाणूचा संसर्ग अधिक घातक ठरला. यातून आपण काही तरी धडा घेणे गरजेचे होते. परंतु ऑक्टोबरपासून आपल्याकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना बहुतांश जण देशात कोरोना कधी आलाच नाही, असेच वागू लागले आहेत. ग्रामीण भागातून मास्क तर जूननंतरच हद्दपार झाले आहेत. शहरांतही मास्क केवळ देखावा म्हणून वापरला जात आहे. बहुतांश लोकांचा मास्क हा गळ्यात लटकत नाही तर हनुवटीवर असतो. शहरी आणि ग्रामीण भागातही कोणी सामाजिक अंतर पाळताना दिसत नाही. कोरोना प्रतिबंधात्मक कोणतेही नियम न पाळता लग्न समारंभासह इतरही उत्सव धूमधडाक्यात साजरे होत आहेत. याचे परिणाम आता सर्वांना पुन्हा भोगावे लागतात की काय अशी भीती वाटू लागली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असताना स्थानिक पातळीवर शासन-प्रशासनाने दक्षता वाढविली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा पातळीवर विविध ठिकाणी उपाययोजना आखल्या जात आहेत. मोठ्या शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नुकत्याच सुरू होत असलेल्या शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद कराव्या लागत आहेत. कोरोनाबाधित ग्रामीण भागात गुरांचे बाजार बंद ठेवण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी बाजार समित्यांना तालुक्यातीलच शेतीमाल घेण्याची मुभा दिलेली असल्याने ऐन हंगामात शेतकऱ्यांसमोर शेतीमाल विक्रीचे संकट उभे राहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आठ दिवसांची मुदत दिली असून या काळात मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे. सामाजिक अंतर पाळणे अशा साध्या नियमांचे पालन न झाल्यास पुनश्च एकवार लॉकडाउन (ठाणबंदी) लागू करणे भाग पडेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
मागील लॉकडाउनची नुसती आठवण अंगावर काटा आणते. या काळात उद्योग-सेवा क्षेत्र बंद असल्याने अनेकांचे रोजगार गेले. असंघटित क्षेत्रातील हातावर पोट असणाऱ्यांवर तर उपासमारीचीच वेळ आली. शैक्षणिक वर्ष अभ्यासाविना बुडाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. लॉकडाउन काळात शेतीव्यवसाय चालू असला तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या हालअपेष्टांना पारावार नव्हता. त्यांना अधिक पैसे मोजून वेळेवर कुठल्या निविष्ठा उपलब्ध झाल्या नाही की घरातील शेतीमाल विकता आला नाही. आता कुठे आधीच्या लॉकडाउनच्या धक्क्यातून आपण सर्वजण सावरत असताना पुन्हा तेच लॉकडाउनचे संकट दाराशी येऊन ठेपले आहे. कोरोनावर प्रतिबंधात्मक लस आल्यापासून काहीजण बेशिस्तीत वागू लागले आहेत. मागील महिनाभरात १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ पाच ते सहा कोटींपर्यंत लस पोचली आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोचायला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्याबरोबरच लॉकडाउन टाळण्यासाठी शिस्त आणि नियमांचे सर्वांनीच काटेकोरपणे पालन करायला हवे.
- 1 of 84
- ››