पुन्हा कोरोना, पुन्हा लॉकडाउन

राज्यात परत कोरोनाचा कहर चालू झाल्यामुळे लॉकडाउन घोषणेच्या वर्षपूर्तीलाच काही भागांत पुन्हा लॉकडाउन सुरू झाले आहे.
agrowon editorial
agrowon editorial

कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभर प्रथमच घेतलेल्या लॉकडाउन निर्णयाची नुकतीच वर्षपूर्ती झाली. या काळात कोरोनाने सर्वसामान्य व्यक्ती, समाज आणि शासनाला सुद्धा बरेच धडे दिले आहे. परंतु यापासून कोणीही काहीही बोध घेतलेला दिसत नाही. राज्यात परत कोरोनाचा कहर चालू झाल्यामुळे लॉकडाउन घोषणेच्या वर्षपूर्तीलाच काही भागांत पुन्हा लॉकडाउन सुरू झाले आहे. गेल्या वर्षी आढळून आलेल्या विषाणूपेक्षा अधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा (नवीन स्ट्रेन) उद्रेक सध्या सुरू आहे. राज्यात दररोज २५ ते ३० हजार नवे रुग्ण सध्या आढळून येत आहेत. कोरोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनची संसर्ग क्षमता अधिक असल्याने योग्य ती काळजी न घेतल्यास कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. हा नवा स्ट्रेन सामाजिक संसर्गातही अधिक घातक ठरू शकतो. देशात कोरोना संसर्गाची ही दुसरी लाट १०० दिवसांपर्यंत टिकेल आणि या कालावधीत २५ लाख जण कोरोनाग्रस्त होतील, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  

राज्यात मराठवाडा, विदर्भापासून ते मुंबई, पुणे या शहरांसह इतरही भागांत कोरोना झपाट्याने वाढतोय. त्याचमुळे नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुन्हा मागच्यासारखे कडक लॉकडाउन, तर यवतमाळ, वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत अंशतः लॉकडाउन असे निर्णय घ्यावे लागले आहेत. मुंबई, पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्राच्या इतर भागांत सुद्धा कोरोना संसर्ग वाढत असल्याने ‘लॉकडाउन की कडक निर्बंध’ अशा द्विधा मनःस्थितीत तेथील स्थानिक प्रशासन आहे. लॉकडाउन हे कोणालाही परवडणारे नाही. मागील लॉकडाउनच्या दुष्परिणामातून अजूनही आपण सावरलो नाही. लॉकडाउनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हातावर पोट असणाऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली होती. शेतीसह पूरक व्यवसायाचेही खूप मोठे नुकसान झाले. शेतीमालास कोणी घ्यायला तयार नव्हते. शेतीमालाचे दरही कोसळले होते. संपूर्ण शैक्षणिक वर्ष तर ऑनलाइन-ऑफलाइनच्या खेळातच बुडून गेले. देशाचे अर्थचक्रच थांबल्याने जीडीपीत घसरण झाली. या धक्क्यातून आपण सावरत असतानाच पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी राज्याची अवस्था आता झाली आहे.   

खरे तर मागच्या लॉकडाउनमध्ये जूनपासून हळूहळू शिथिलता येत गेली तेव्हापासूनच ‘आता कोरोना संपला’ अशाच आविर्भावात बहुतांश जण वागू लागले. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नोव्हेंबरमध्ये उसळलेली बाजारातील गर्दी अजूनही कमी झालेली नाही. लॉकडाउन कमी करताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना होत्या. परंतु सार्वजनिक ठिकाणीसुद्धा मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणे, लग्नसोहळे इतर समारंभात विनाकारण गर्दी करणे अशाप्रकारे नियमांना सर्रासपणे फाटा देण्याचे काम सुरू आहे. लॉकडाउन हा सुद्धा कोरोनाला पूर्णपणे प्रतिबंध करण्याचा रामबाण उपाय नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जिथे लॉकडाउनचा निर्णय अजून झाला नाही तिथे कडक निर्बंधात सर्व व्यवहार चालू ठेवण्यावर भर द्यायला हवा. कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे सर्वांनी पालन करायला हवे. तसे न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा, हाच कोरोनाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रभावी उपाय आहे. देशात कोरोनावर प्रभावी औषध अजूनही नसले तरी प्रतिबंधात्मक लस मात्र उपलब्ध झाली आहे. सध्या देशात टप्प्याटप्याने लसीकरण सुरू असले, तरी ही मोहीम अधिक व्यापक करून ती सर्वांपर्यंत लवकरच पोहोचवावी लागेल. लसीकरणानंतरही कोरोना रोखण्यासाठीचे नियम-निर्बंध पाळायचे आहेत, हेही विसरून चालणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com