जीवनमरणाचा प्रश्‍न निकाली काढा

अनेक वेळा बिनविषारी साप चावून केवळ घाबरून गेल्याने, अथवा अघोरी उपाय केल्याने कित्येक जणांना जीव गमवावा लागला आहे.
agrowon editorial
agrowon editorial

मागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या चांगल्या वाढलेल्या शेतात झाडाला साप लपेटून बसलेला एक फोटो आणि त्यासोबत फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला समाज माध्यमातून फिरताना दिसतो. खरंच खरिपातील पिके वाढलेली असताना त्यात फवारणीसह इतरही आंतरमशागतीची कामे करताना सर्पदंशाच्या घटना वाढलेल्या असतात. रब्बी हंगामातही लोड शेडिंगमुळे गहू, हरभऱ्याला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते, त्या वेळी देखील सर्पदंश आणि त्यात होत असलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूच्या घटना पुढे येत असतात.

पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यांत मागील तीन वर्षांत सर्पदंशाच्या नऊ हजार घटना घडल्या असून, त्यात मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. सर्पदंश आणि त्यात प्रामुख्याने शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू ही गंभीर समस्या विदर्भातच नाही, तर महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर आहे. वन्यजीव संरक्षण सुरक्षा कायद्यात सापाचा समावेश आहे. त्यामुळे सापाला मारता किंवा पकडता येत नाही. वाघासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी अथवा शेतमजूर जखमी झाला, मृत्यू पावला, तर कुटुंबास आर्थिक मदतीची तरतूद आहे. परंतु साप चावून मृत्यू ओढवल्यास कसलीही मदत शासनाकडून मिळत नाही, ही बाब खटकणारी आहे. आता कुणी म्हणेल वाघ अथवा इतर वन्यप्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करतात, तसा हल्ला साप करीत नाही. सापाच्या संपर्कात शेतकरी आला तरच तो चावतो. असे असले तरी साप चावून होणारा मृत्यू हा अपघातच आहे ना! ‘हिट अन् रण’ प्रकरणात मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबास शासनाने दोन लाख रुपये मदत नुकतीच जाहीर केली आहे. सर्पदंशात अपघाती मृत्यू झाल्यास किमान तेवढी तरी मदत शेतकरी अथवा शेतमजुराच्या कुटुंबास व्हायला हवी.

साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, हे मान्य आहे. साप पिकांना नुकसानकारक उंदीर-घुशीसह इतरही किडेकिटूक खाऊन शेतकऱ्यांना पीक संरक्षणात हातभारच लावतो. जैवसाखळीतील साप हा एक महत्त्वाचा घटक आहे. या साखळीतील सर्व घटकांचे संतुलन असायलाच हवे. महत्त्वाचे म्हणजे नाग, घोणस, फुरसे, मण्यार अशा काही सापांच्या विषारी जाती सोडल्या, तर इतर बहुतांश जाती बिनविषारी आहेत. अनेक वेळा बिनविषारी साप चावून केवळ घाबरून गेल्याने अथवा अघोरी उपाय केल्याने कित्येक जणांना जीव गमवावा लागला आहे. काही वेळा विषारी साप चावल्यानंतर त्यासंबंधी उपचारासाठीचे इंजेक्शन तसेच इतर पूरक औषधे ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसल्याने देखील अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

साप हा शेतकऱ्यांचा मित्र कसा, हे पटवून देण्यापासून ते त्यापासून बचाव तसेच अपघाताने साप (विषारी-बिनविषारी) चावला, तरी त्यानंतरचे प्रथमोपचार, पुढील उपचार याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधनाची गरज आहे. सर्पमित्रांसह राज्य शासनाने याकरिता पुढाकार घ्यायला हवा. तसेच तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयांत विषारी साप चावल्यानंतरच्या उपचारासंबंधी सर्व अद्ययावत सोयीसुविधा असायला हव्यात. साप चावून होणाऱ्या मृत्यूकरिता राज्यातील सर्व शेतकरी त्यांचे शेतात काम करणारे कुटुंबीय याकरिता वेगळा विमा उतरविता येईल का, यावरही राज्य शासनाने विचार करायला हवा. पीकविम्यासोबत पण थोडाफार हप्ता वाढवून आणि वाढीव हप्ता रक्कम सरकारने भरून शेतकऱ्यांना अशाप्रकारचे संरक्षण देता येऊ शकते. शेतकऱ्यांचे अपघाती मृत्यू थांबविण्यासाठीचे, मृत्यू झालाच तर कुटुंबाला मदत करण्याचे अनेक पर्याय आहेत. गरज आहे ती यावर गांभीर्याने विचार करून प्रबळ इच्छाशक्ती दाखवून ते राबविण्याची!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com