‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा

सोयाबीनचे दर सध्या वधारून असले तरी दर पाडण्याचे उद्योग देशात आतापासूनच सुरू झाले आहेत.
agrowon editorial
agrowon editorial

मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन) लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे २०१३-१४, २०१८-१९ आणि २०२१-२२ या वर्षांत सोयाबीन लागवड क्षेत्रात अनुक्रमे ५ लाख हेक्टर, ३.५ लाख हेक्टर आणि ३ लाख हेक्टर अशी घसघशीत वाढ झाली आहे. दशकभरापूर्वी जेमतेम ३० लाख हेक्टरपर्यंत असलेले सोयाबीन क्षेत्र या वर्षी ४४ लाख हेक्टरच्याही वर गेले आहे. ऐन पेरणीच्या हंगामात सोयाबीन दरातील तेजी, या वर्षीचे चांगले पाऊसमान, राज्यात सोयाबीनचे मुख्य स्पर्धक पीक बीटी कापसातील कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, कापसाचे वाण तसेच बियाणे (एचटीबीटी) पातळीवरील गोंधळ, घटती उत्पादकता आणि वाढता उत्पादन खर्च आदी कारणांमुळे राज्यात कापसासह इतर खरीप पिकांच्या लागवड क्षेत्रात घट होऊन सोयाबीनचा पेरा वाढत आहे. सोयाबीन कमी कालावधीचे पीक असल्याने त्या क्षेत्रात दुबार पीक घेता येते. तसेच सोयाबीनची लागवड ते काढणी अशी बहुतांश कामे यंत्राच्या साह्याने होत असल्यामुळे देखील या पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येतो. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले असले तरी देशपातळीवर मात्र यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात थोडी घट दिसून येते. त्यातच महाराष्ट्र, मध्य प्रदेश सह इतरही सोयाबीन उत्पादक राज्यांत जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी, महापुराने सोयाबीनचे नुकसान देखील झालेले आहे. उर्वरित क्षेत्रावरील सोयाबीन मात्र या वर्षी आतापर्यंत तरी जोमदार आलेले आहे. सोयाबीनचे उत्पादन हाती येण्यास अजून दीडएक महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे राज्यात आणि देशपातळीवर सोयाबीन उत्पादनाचा नेमका अंदाज बांधणे, सध्या तरी अवघड आहे. 

मागील हंगामात अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसाने सोयाबीनचे उत्पादन घटले होते. दर्जाही खालावला होता. त्यामुळे देशात एकंदरीतच सोयाबीनची उपलब्धता कमी आहे. सोयातेल तसेच पशुखाद्य उद्योगांकडूनही सोयाबीन, सोयापेंडची खरेदी सुरू आहे. त्यामुळे सोयाबीनची मागणी सातत्याने वाढतेय. जागतिक पातळीवरही यंदा सोयाबीन, सोयापेंड तेजीत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर मागील एक-दीड महिन्यापासून विक्रमी पातळीवर (प्रतिक्विंटल ९ ते १० हजारांच्या वर) पोहोचले आहेत. असे असले तरी मागील हंगामात शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले त्या वेळी त्यांना मात्र जेमतेम चार हजार रुपये प्रतिक्विंटल (हमीभाव ३८८० रुपये प्रतिक्विंटल) असाच दर मिळाला आहे. त्यामुळे सध्याच्या सोयाबीनच्या वाढीव दराचा फायदा हा उत्पादक शेतकऱ्यांना होत नसून व्यापाऱ्यांनाच होतोय, हे लक्षात घेतले पाहिजेत. सोयाबीन तेलासह, पशुखाद्यास मोठी मागणी आहे.

खाद्यतेलात आपण स्वयंपूर्ण नसल्याने मोठ्या प्रमाणात (६५ टक्के) त्याची आयात करतो. आयात केलेले बहुतांश खाद्यतेल जीएम तेलबियांपासून बनविलेले असते. असे असताना आपल्या देशातील सोयाबीन उत्पादकांना मात्र प्रोत्साहन मिळताना दिसत नाही. यावर्षी सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल केवळ ५० रुपये वाढ करून तो ३९५० रुपये केला आहे. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे सोयाबीनचे दर सध्या वधारून असले तरी दर पाडण्याचे उद्योग देशात सुरू झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकार पातळीवरील संबंधित मंत्रालयांनी १५ लाख टन सोयाबीन आयातीचे नुसते संकेत दाखविले असता देशात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल दीड-दोन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यातच सध्या जोमदार असलेल्या सोयाबीनच्या पिकाला काढणीपर्यंत अनुकूल हवामान लाभले तर या वर्षी विक्रमी उत्पादन होऊ शकते. या सर्व पार्श्‍वभूमीवर या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती आल्यावर दर काय राहतील, हे पाहणे अधिक औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com