agriculture news in marathi agrowon agralekh on soybean area, productions and rate in Maharashtra | Agrowon

‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा

विजय सुकळकर
बुधवार, 25 ऑगस्ट 2021

सोयाबीनचे दर सध्या वधारून असले तरी दर पाडण्याचे उद्योग देशात आतापासूनच सुरू झाले आहेत. 

मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन) लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे २०१३-१४, २०१८-१९ आणि २०२१-२२ या वर्षांत सोयाबीन लागवड क्षेत्रात अनुक्रमे ५ लाख हेक्टर, ३.५ लाख हेक्टर आणि ३ लाख हेक्टर अशी घसघशीत वाढ झाली आहे. दशकभरापूर्वी जेमतेम ३० लाख हेक्टरपर्यंत असलेले सोयाबीन क्षेत्र या वर्षी ४४ लाख हेक्टरच्याही वर गेले आहे. ऐन पेरणीच्या हंगामात सोयाबीन दरातील तेजी, या वर्षीचे चांगले पाऊसमान, राज्यात सोयाबीनचे मुख्य स्पर्धक पीक बीटी कापसातील कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, कापसाचे वाण तसेच बियाणे (एचटीबीटी) पातळीवरील गोंधळ, घटती उत्पादकता आणि वाढता उत्पादन खर्च आदी कारणांमुळे राज्यात कापसासह इतर खरीप पिकांच्या लागवड क्षेत्रात घट होऊन सोयाबीनचा पेरा वाढत आहे. सोयाबीन कमी कालावधीचे पीक असल्याने त्या क्षेत्रात दुबार पीक घेता येते. तसेच सोयाबीनची लागवड ते काढणी अशी बहुतांश कामे यंत्राच्या साह्याने होत असल्यामुळे देखील या पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येतो. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले असले तरी देशपातळीवर मात्र यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात थोडी घट दिसून येते. त्यातच महाराष्ट्र, मध्य प्रदेश सह इतरही सोयाबीन उत्पादक राज्यांत जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी, महापुराने सोयाबीनचे नुकसान देखील झालेले आहे. उर्वरित क्षेत्रावरील सोयाबीन मात्र या वर्षी आतापर्यंत तरी जोमदार आलेले आहे. सोयाबीनचे उत्पादन हाती येण्यास अजून दीडएक महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे राज्यात आणि देशपातळीवर सोयाबीन उत्पादनाचा नेमका अंदाज बांधणे, सध्या तरी अवघड आहे. 

मागील हंगामात अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसाने सोयाबीनचे उत्पादन घटले होते. दर्जाही खालावला होता. त्यामुळे देशात एकंदरीतच सोयाबीनची उपलब्धता कमी आहे. सोयातेल तसेच पशुखाद्य उद्योगांकडूनही सोयाबीन, सोयापेंडची खरेदी सुरू आहे. त्यामुळे सोयाबीनची मागणी सातत्याने वाढतेय. जागतिक पातळीवरही यंदा सोयाबीन, सोयापेंड तेजीत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर मागील एक-दीड महिन्यापासून विक्रमी पातळीवर (प्रतिक्विंटल ९ ते १० हजारांच्या वर) पोहोचले आहेत. असे असले तरी मागील हंगामात शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले त्या वेळी त्यांना मात्र जेमतेम चार हजार रुपये प्रतिक्विंटल (हमीभाव ३८८० रुपये प्रतिक्विंटल) असाच दर मिळाला आहे. त्यामुळे सध्याच्या सोयाबीनच्या वाढीव दराचा फायदा हा उत्पादक शेतकऱ्यांना होत नसून व्यापाऱ्यांनाच होतोय, हे लक्षात घेतले पाहिजेत. सोयाबीन तेलासह, पशुखाद्यास मोठी मागणी आहे.

खाद्यतेलात आपण स्वयंपूर्ण नसल्याने मोठ्या प्रमाणात (६५ टक्के) त्याची आयात करतो. आयात केलेले बहुतांश खाद्यतेल जीएम तेलबियांपासून बनविलेले असते. असे असताना आपल्या देशातील सोयाबीन उत्पादकांना मात्र प्रोत्साहन मिळताना दिसत नाही. यावर्षी सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल केवळ ५० रुपये वाढ करून तो ३९५० रुपये केला आहे. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे सोयाबीनचे दर सध्या वधारून असले तरी दर पाडण्याचे उद्योग देशात सुरू झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकार पातळीवरील संबंधित मंत्रालयांनी १५ लाख टन सोयाबीन आयातीचे नुसते संकेत दाखविले असता देशात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल दीड-दोन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यातच सध्या जोमदार असलेल्या सोयाबीनच्या पिकाला काढणीपर्यंत अनुकूल हवामान लाभले तर या वर्षी विक्रमी उत्पादन होऊ शकते. या सर्व पार्श्‍वभूमीवर या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती आल्यावर दर काय राहतील, हे पाहणे अधिक औत्सुक्याचे ठरणार आहे. 


इतर संपादकीय
या देवी सर्वभूतेषु...देशभर सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. आश्‍विन शुद्ध...
पाऊस वाढतोय, झटका घोंगडी! जमिनीत ५० टक्के हवा आणि ५० टक्के ओलावा असलेल्या...
धरणे भरली, आता सिंचनाचे बघा!नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दोन...
अतिवृष्टीच्या धोक्यातून मुक्ती! गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे...
विज्ञान-तंत्रज्ञानाला घेऊ द्या मोकळा श्...आज दिनांक ७ ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिवस म्हणून...
अर्थवाहिन्या सुरू कराकोरोना पहिल्या-दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर...
विचार कसा चिरडणार?शांततापूर्वक मार्गाने आंदोलने करून इंग्रजांना...
रक्तपातपूर्ण अट्टहास कुणासाठी?उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शांततामय...
महावितरणचा कारभार दिव्याखालीच अंधारकृषिपंपाच्या वीजवापर थकबाकीशिवाय सार्वजनिक...
कथनी से करनी भलीदेशातील शेतकऱ्यांची प्रत्येक छोटी-मोठी गरज ही...
शेतीपंप वीजवापर ः वस्तुस्थिती अन्...राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने वीज विषयक...
हा तर ओला दुष्काळच!सोलापूर जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीच्या...
भारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...
सोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर...
खरे थकबाकीदार ‘सरकार’च  वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...
देवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...
‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...
हतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...
दूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...
शर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...