सोयाबीन विक्री करा जरा जपूनच

उत्पादकांनी कुठल्याही अफवेला, प्रसिद्धी फंड्याला बळी न पडता बाजाराचा, तेथील दराचा नीट अभ्यास करूनच सोयाबीनची विक्री करावी.
agrowon editorial
agrowon editorial

मागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर चांगलेच चर्चेत आहे. अतिवृष्टीने झालेले नुकसान असो, सोयाबीनच्या दराने १० हजारांचा टप्पा ओलांडला असो, सोयापेंड आयातीचा निर्णय असो, की खाद्यतेलाच्या आयात शुल्कात केलेली कपात असो चर्चा मात्र सोयाबीनभोवतीच फिरतेय. त्याला कारणेही तशीच आहेत. देशातील एकूण खरीप लागवड क्षेत्रापैकी जवळपास १२ टक्के क्षेत्र एकट्या सोयाबीन पिकाखाली आहे. देशात गेल्या हंगामात १२० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. या वर्षी सोयाबीन क्षेत्रात वाढ झालेली असल्याचेच अंदाज आहेत. देशात या वर्षी ९५ ते १२९ लाख टन सोयाबीन उत्पादनांचे अंदाज वर्तविण्यात आलेले आहेत. अर्थात, सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजातील तफावतही मोठी आहे. प्रत्येकाने आपल्या सोयीने सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केल्याचे यावरून स्पष्ट होते. सोयाबीनच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास ७५ टक्के उत्पादन मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत होते. या देशातील बहुसंख्य अशा जिरायती आणि अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह देशभरातील इतर बाजार समित्यांमध्ये या वर्षीच्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. अर्थात, लवकर पेरलेले आणि काही ‘अर्ली व्हरायटीं’चे सोयाबीन काढणीला आल्याने बाजारातील आवक थोडी कमीच आहे. नेमक्या अशावेळी बाजारात सोयाबीनला कुठे प्रतिक्विंटल १० हजार तर कुठे ११ हजार रुपये दरांच्या पावत्यांचा सोशल मीडियावर धुमाकूळ चालू आहे. काही जण तर जुन्या सोयाबीनला मिळालेल्या अधिकच्या दराची पावती या वर्षीच्या सोयाबीनवर ठेवून त्याचे फोटो व्हायरल करीत आहेत. नव्या सोयाबीनला काही ठिकाणी १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असला, तरी काहींनी मुहूर्तावर काढलेला हा दर आहे, तर काहींनी फार कमी मालास दिलेला हा दर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दरवाढीच्या पोस्ट हा सर्व व्यापाऱ्यांचा प्रसिद्धी फंडा आहे. बाजारात सोयाबीनची आवक वाढावी, यासाठी ते हे सर्व उद्योग करीत आहेत. 

या वर्षीचा सोयाबीनचा हमीभाव ३९५० रुपये प्रतिक्विंटल आहे आणि बाजारात सोयाबीनला ओलाव्याच्या प्रमाणानुसार ६५०० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. अर्थात हमीभावापेक्षा अधिक दर सोयाबीनला मिळतोय, ही बाब चांगली आहे. सोयाबीनची आवक पुढे ऑक्टोबरमध्ये वाढली की काही काळापुरता (एक ते दीड महिना) दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील कमी शिल्लक साठा, जागतिक पातळीवरून भारतीय सोयाबीनची वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातील अधिकचे टिकून असलेले दर, नैसर्गिक आपत्तीने कमी उत्पादनाचा अंदाज आदी कारणांमुळे जास्त आवकेचा एक-दीड महिन्यांचा काळ सोडला तर पुढे सोयाबीनला तर चांगलेच (प्रतिक्विंटल सात ते आठ हजारांच्यावर) राहतील, असा अंदाज यातील जाणकार व्यक्त करतात. मागील काही वर्षांतील  बाजाराचा ट्रेंडही तसाच आहे. यातील अजून एक जमेची बाजू म्हणजे सोयापेंड आयातीचा निर्णय असो की खाद्यतेलाच्या निर्यात शुल्कात केलेली घट असो, या दोन्ही निर्णयांचा सध्या तरी सोयाबीन दरावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. या सर्व बाबींचा विचार करून आणि शेतकऱ्यांनी बाजाराचा नीट अभ्यास करूनच सोयाबीनची विक्री करावी. अनेक शेतकऱ्यांना रब्बी हंगाम, पुढे येणारे सणवार यासाठी पैसा हवा असतो, अशा शेतकऱ्यांनी गरजेपुरते सोयाबीन विकून उर्वरित राखून ठेवायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com