‘गोल्डनबीन’ला झळाळी

जागतिक पातळीवर सोयाबीनचे घटते उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे सध्या सोयाबीनला विक्रमी दर मिळतोय. असे असले तरी जवळच्या सोयाबीनचा सर्वांगाने नीट विचार करून शेतकऱ्यांनी त्याची विक्री करायला हवी.
agrowon editorial
agrowon editorial

विदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर बाजार  समितीमध्ये सोयाबीनला ६५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर सध्या मिळत आहे. २०२०-२१ या हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव ३८८० रुपये प्रतिक्विंटल आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये म्हणजे ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी राज्यभरातील शेतकऱ्यांना ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल म्हणजे हमीभावाच्या आसपासच दर मिळाला आहे. मागील हंगामात सोयाबीन काढणीच्या वेळी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पाऊस होता. देशात अतिवृष्टीने सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणी करताना भिजले. असे सोयाबीन शेतकरी बियाण्यासाठी अथवा नंतर विक्रीसाठी सुद्धा साठवून ठेवू शकत नव्हते. भिजलेले सोयाबीन शेतकऱ्यांना त्वरित विकावे लागले असून, त्यास तर हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. ज्यांचे सोयाबीन भिजले नाही, अशाही अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे सोयाबीन तेंव्हाच कमी दरात विकावे लागले. फार थोड्या शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी बियाणे म्हणून सोयाबीन ठेवले आहे. हे शेतकरीही मागील एक-दीड महिन्यापासून सोयाबीनला चढा दर मिळत आहे म्हणून त्याची विक्री करीत आहेत. राज्यात या वर्षी उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढलेला होता. परंतु त्यावर रोगाचा प्रसार झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही उत्पादन लागणार नाही, असेच चित्र आहे. अर्थात, सध्याच्या वाढीव दराचा लाभ फार कमी शेतकऱ्यांना मिळतोय, हे लक्षात घेतले पाहिजे. 

भारताबरोबर अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील या देशांमध्ये सुद्धा प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीन उत्पादन घटले आहे. चीनमध्ये सोयाबीन उत्पादनात वाढ झाली असली तरी जागतिक बाजारातून चीनने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करून ठेवली आहे. सोयाबीनचा वापर हा खाद्यतेल, इतर प्रक्रियायुक्त मानवी खाद्यपदार्थांसह कोंबडी, वराह यांचे खाद्य म्हणून होतो. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाची दुसरी लाट जगभर पसरली असली तरी मांसापासून निर्मित पदार्थांची मागणी जागतिक पातळीवरून कमी होताना दिसत नाही. या सर्वांच्या परिणामस्वरूप भारतासह जागतिक बाजारात सोयाबीनची मागणी टिकून आहे. सोयापेंडची निर्यातही भारतातून वाढली आहे. त्यामुळेच सध्या देशात सोयाबीनचे दर वधारत आहेत. सोयाबीनचे पुढील पीक यायला अजून सहा महिने बाकी असून, बाजारातील मागणी अशीच कायम राहिली तर दर अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत  नाही. 

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी खरीप हंगामात देखील सोयाबीन बियाण्याची टंचाई भासणार आहे. अशावेळी सध्या बाजारातील न भिजलेले, चांगल्या दर्जाचे सोयाबीन व्यापारी ६५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करून तेच सोयाबीन बियाणे म्हणून ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलने विकून नफा कमावू शकतात. परंतु अयोग्य पद्धतीने हाताळण्यात आलेले असे सोयाबीन पुढे उगवत नसल्याच्या तक्रारी येतात. सोयाबीन उगवले नाही तर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागते. त्यांचा उत्पादन खर्च वाढतो. अपेक्षित उत्पादन मिळाले नाही तर सोयाबीनची शेती तोट्याची ठरते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चांगले दर्जेदार सोयाबीन आहे, त्यांनी ते विक्री न करता बियाणे म्हणून स्वतःच्या शेतात वापरायला हवे. जास्तीचे सोयाबीन असेल तर मे-जूनमध्ये इतर शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विक्री केली तर ते अधिक फायदेशीर ठरू शकते. या सर्व बाबींचा नीट विचार करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करायला हवी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com