सर्जनशीलतेला सलाम!

फवारणीसाठीचा रोबोट आणि विनाकोंबडी अंडी उबविणी यंत्र या दोन्हींची निर्मिती विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून झाली आहे. भविष्यात शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या अशा सर्जनशीलतेला आणि त्यातून झालेल्या नवनिर्मितीला सलाम!
संपादकीय
संपादकीय

व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी करताना राज्यातील सुमारे ५० शेतकरी-शेतमजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते. मृतात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजुरांची संख्या अधिक होती. त्यानंतर शेतकऱ्यांना होणारी विषबाधा टाळण्यासाठी बोगस कीडनाशकांवर प्रतिबंद लावण्यापासून ते ड्रोनद्वारे फवारणीपर्यंत अशा अनेक घोषणा राज्य शासनाने केल्या. परंतु आजही राज्यात बोगस, भेसळयुक्त कीडनाशकेच नाही तर बियाणे-खतेसुद्धा सर्रासपणे विकली जातात. तर ड्रोनद्वारे कीडनाशक फवारणीचे घोषणेच्या पलीकडे काहीही झालेले नाही. अशा वेळी यवतमाळ येथील केवळ १४ वर्षांच्या अनिकेत काकडे या विद्यार्थ्याने फवारणीसाठी रोबोटचा (स्वयंचलित यंत्र) पर्याय शोधून काढला आहे. हे रोबोट फवारणी यंत्र ॲँड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून ऑपरेट होते, चार्जेबल बॅटरीवर चालू शकते. केवळ २५ हजार रुपयांमध्ये तयार केलेल्या या मिनी रोबोटचे लवकरच प्रात्यक्षिक होणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील धीरज दाईंडडे या महाविद्यालयीन युवकाने कल्पकतेचा वापर करीत अनोखे असे ‘विनाकोंबडी अंडी उबविणी यंत्र’ विकसित केले आहे. जुने फ्रिज, बल्ब, छोटा फॅन असे साहित्य वापरून केवळ सात हजार रुपयांमध्ये हे यंत्र त्यांनी बनविले आहे. यात एकावेळी ५० अंडी उबविण्यासाठी ठेवता येतात. या अंडी उबविणे यंत्राद्वारे २० दिवसांत दहा हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळविण्याचा एक नावीण्यपूर्ण मार्गच या युवकाने शोधला आहे. सध्या बाजारात मोठी आणि महागडी अंडी उबविणी यंत्र असताना छोटे, परसबागेत कुक्कुटपालन करणारे शेतकरी यांना हे यंत्र फारच उपयुक्त ठरू शकते. या दोन्ही विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि त्यातून झालेल्या नवनिर्मितीला सलाम! 

गरज ही शोधाची जननी असते, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. मागील दोन दशकांमध्ये देशात शेतीचे यांत्रिकीकरण वाढले आहे. परंतु शेतीत वापरात असलेली बहुतांश यंत्रे अवजारे आपण आपल्या गरजेतून निर्माण केली नाहीत, तर ती बाहेरून आयात केली आहेत. त्यामुळेच मशागतीपासून ते काढणी-प्रक्रियेपर्यंतची अनेक यंत्रे-अवजारे शेतकऱ्यांना फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत. म्हणूनच अजूनही शेतकरी उत्कृष्ट आणि उपयुक्त यंत्राच्या शोधात आहेत. एकीकडे असे चित्र असताना राज्यात अनेक शेतकरी आणि काही विद्यार्थीदेखील गरजेपोटी वेगवेगळी यंत्रे-अवजारे, नवनवीन वाण विकसित करीत आहेत. अशा संशोधनातून विकसित तंत्रज्ञानाचा वापर सर्वदूर होत आहे. परंतु देशातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे असे संशोधन पुढे पेटंट आणि त्यांचे व्यापारीकरण या पातळीवर बेदखल राहिल्याने प्रत्यक्ष संशोधकांना त्याचे अपेक्षित लाभ मिळताना दिसत नाहीत. दुर्दैवी बाब म्हणजे एखादी व्यक्ती, संस्था नाहीतर उद्योग समूह असे शेतकरी, विद्यार्थ्यी पातळीवर झालेले संशोधन चोरून नाव आणि पैसाही कमावत आहेत. हे थांबायला हवे.

शेतकरी आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नवनिर्मितीला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील संशोधन संस्थांनी नियमित राज्य, विभागनिहाय ‘क्रिएटिव्ह ॲँड इनोव्हेशन कॉन्फरन्स’ घ्यायला हव्यात. अशा परिषदेमध्ये आपल्या परिसरातील सर्व नवसंशोधन, नवीन यंत्र-तंत्र यांचा समावेश होईल, याची खात्री संबंधित विभागांनी घ्यायला हवी. नवसंशोधकांना आपल्या नवनिर्मितीबाबत सादरीकरण करण्याची संधी मिळायला हवी. यात शेतकरी तसेच समाज उपयुक्त संशोधन आढळून आल्यास त्याच्या पुढील प्रवासाबाबत नवसंशोधकाला नीट मार्गदर्शन व्हायला हवे. देशात शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या नवसंशोधनाबाबत नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ करावी लागेल. शेतकरी असो अथवा विद्यार्थी त्यांनी केलेल्या प्रत्येक नवसंशोधनाचे पेटंट हे त्यांनाच मिळायलाच हवे. त्याचे व्यापारीकरण योग्य पद्धतीने होईल, याची काळजी शासन, संस्थांनी घ्यायला हवी. असे झाले तरच नवसंशोधनला गती मिळून ते शेतकरी, समाजोपयोगी ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com