लाटेविरुद्धचा यशस्वी प्रवास

कष्टात सातत्य, कुटुंबातील सर्वांची साथ आणि मुख्य म्हणजे शेतीतल्या पैशाचे योग्य नियोजन केले, तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्यावर मात करून यश गाठता येते, हेच व्यवहारे दांपत्याने दाखवून दिले आहे.
संपादकीय.
संपादकीय.

मागील अडीच ते तीन दशकांच्या शेतीवर दृष्टिक्षेप टाकला, तर १०० हून अधिक एकर जमीन असणाऱ्या जमीनदाराकडे आज १० ते १५ एकर शेती उरली आहे. ५० ते १०० एकरपर्यंत शेती असणारे अल्प-अत्यल्प भूधारक झाले आहेत. तर ५० एकरांखाली जमीन धारणा असलेले शेतकरी आज भूमिहीन झालेले आहेत. यात काही अपवादही असतील, परंतु वडिलोपार्जित शेतीच्या होत असलेल्या वाटण्या, विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात होत असलेले जमिनीचे अधिग्रहन तसेच अनेक कारणांनी तोट्यात जात असलेली शेती शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी विकावी लागत असल्याने या देशात, राज्यात अल्प-अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीनांचीच संख्या वाढताना दिसते आहे. महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक आपत्ती असो की शासनाची ध्येयधोरणे शेती-शेतकऱ्यांबाबत अलीकडे चांगले काही ऐकूच येत नाही. शेतकऱ्यांची तरुण मुले शेतीत उतरायला तयार नाहीत. सध्या शेती कसत असलेला मोठा शेतकरी वर्ग त्यांना पर्यायी उपजीविकेचे साधन मिळाल्यास शेतीला रामराम ठोकण्यास तयार आहे. शेती परवडतच नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अशा एकंदरीतच शेतीबाबतच्या नकारात्मक वातावरणात नांदेड जिल्ह्यातील मारोती व पारुबाई व्यवहारे या भूमिहीन दांपत्याने शेती विकत घेऊन त्यात एकात्मिक शेतीचे आदर्श मॉडेल उभे केले आहे. त्यांची यशोगाथा २३ ऑक्टोबर २०१९ च्या  अग्रोवनच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. कष्टात सातत्य, कुटुंबातील सर्वांची साथ आणि मुख्य म्हणजे शेतीतल्या पैशाचे योग्य नियोजन केले तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्यावर मात करून यश गाठता येते, हेच व्यवहारे दांपत्याने दाखवून दिले आहे. 

आजच्या प्रचंड महागाईच्या काळात, कौटुंबिक गरजा वाढलेल्या असताना मोलमजुरी करून, फळे-भाजीपाला विकून पैसा शिल्लक टाकणे, ही साधी गोष्ट राहिलेली नाही. त्यातही कष्टातून जमा केलेला पैसा तोट्याच्या शेतीत गुंतविणारे शोधूनही सापडणार नाहीत. परंतु व्यवहारे दांपत्याने घर खर्च, मुलाबाळांचे शिक्षण, लग्नकार्य या जबाबदाऱ्या पार पाडून शिल्लक पैशातून जमीन खरेदी केली. हळूहळू ती वाढविली. जिरायती शेतीला सिंचनाची सोय केली. पारंपरिक पिकांऐवजी आंबा, हळद, भाजीपाला अशा नगदी पैसे देणाऱ्या पिकांचीच ते शेती करतात. शेती जिरायती असो की बागायती वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीतून उत्पन्नाची काहीही हमी राहिलेली नाही. म्हणून त्यांनी शेतीला दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन, वासरांचे संगोपन आणि विक्री, पिठाची गिरणी, मिरची कांडप अशा शाश्‍वत मिळकतीच्या व्यवसायांची जोड दिली आहे. त्यामुळे शेतीत अथवा एखाद्या व्यवसायात फटका बसला तर त्याची उणीव दुसऱ्या व्यवसायातून भरून निघते आणि शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवत नाही.

दिवाळीदरम्यान सोशल मीडियावर ‘पैशाचे योग्य नियोजन म्हणजेच खरे लक्ष्मीपूजन’ अशी पोस्ट फिरत होती. त्यात पैशाच्या नियोजनाबाबतच्या काही टिप्सही देण्यात आल्या होत्या. व्यवहारे दांपत्याने शेतीतील पैशातून उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण केलेत. ते स्रोत आटणार नाहीत, याची काळजी घेतली आहे आणि याबाबतचे त्यांचे नियोजन कमालीचे म्हणावे लागेल. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, कष्टकऱ्यांनी त्यांच्या अत्यंत प्रेरणादायी अशा यशोगाथेपासून योग्य तो धडा घ्यायला हवा. शेतीत अनंत अडचणी आहेत, अस्मानी, सुलतानी संकटांचा सामना आहे. परंतु योग्य दिशा पडकून मेहनत केली त्यात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com