कंद ’शर्करा’ योग

राज्यात ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये शर्कराकंदाचे उत्पादन मिळते. अशावेळी शर्कराकंद गाळपासाठी कारखान्यांना पुढे काही काळ मिळू शकतो.
agrowon editorial
agrowon editorial

उसाचा वाढता उत्पादन खर्च, मिळणारे कमी उत्पादन आणि कमी दर यामुळे हे नगदीपीकही शेतकऱ्यांना आता फारसे किफायतशीर ठरताना दिसत नाही. त्यातच राज्यात पाण्याच्या वाढत्या दुर्भिक्षाने तर या पिकावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दुसरीकडे साखर उत्पादनाचा वाढता खर्च आणि साखरेला उठाव आणि दर कमीच असल्यामुळे बहुतांश कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. साखरेला पर्यायी अजून एक पीक आहे शर्कराकंद (शुगरबीट). आज जगाला लागणाऱ्या स्फटिक साखरेच्या सुमारे ३० टक्के साखर ही शर्कराकंदापासून मिळविली जाते. जगातील जवळपास ५० देशांत शर्कराकंदाचे उत्पादन घेऊन त्यापासून साखर बनवतात. रशिया, जर्मनी, अमेरिका, टर्की, युक्रेन, इंग्लड, चीन आदी प्रमुख देशांचा त्यात उल्लेख करता येईल. आपल्या देशात मात्र मागील पाच ते सहा दशकांपासून शर्कराकंद हे पीक प्रायोगिक अवस्थेच्या पुढे जात नाही. साखर कारखाने अथवा इतर कोणाच्या तरी प्रोत्साहनातून राज्यात शर्कराकंदाची लागवड होते. काही कारखाने यावर प्रक्रिया (शर्कराकंदाचा रस काढून तो उसाच्या रसात मिसळणे) करण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयोग अजूनही चालूच आहेत; परंतु उसाच्या तुलनेत अनेक चांगली गुणवैशिष्ट्ये असलेले हे पीक उसाला पर्यायी तर सोडाच; पण पूरकही ठरू शकलेले नाही. 

उच्च दर्जाच्या शुद्ध वाणांचा अभाव, लागवड तंत्राबाबत अत्यंत कमी प्रसार-प्रचार, मिळणारा कमी दर आणि कारखाना पातळीवर प्रक्रियेसाठी येत असलेल्या अडचणी यामुळे शर्कराकंद हे पीक राज्यात अजूनही रुजलेले नाही. मात्र ऊस, साखर याबाबत कुठेही चर्चा होते तेव्हा शर्कराकंदाचा विषय हमखास निघतोच. व्हीएसआय (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेमध्ये शर्कराकंद पुन्हा एकदा चर्चेत आले. या परिषदेमध्ये अमेरिकेच्या एका शर्कराकंद अभ्यासकाने या पिकावर प्रकाश टाकला. एवढेच नव्हे तर त्यांनी अमेरिकेतील उच्च दर्जाच्या जातींचा जर्मप्लाझम व्हीएसआयला देण्याची तयारीही दर्शविली. हाच धागा पकडून राज्यातील दुष्काळी स्थिती विचारात घेता, शर्कराकंद लागवडीच्या चाचण्या पुन्हा सुरू कराव्यात; तसेच विदेशी वाणांचा पैदास कार्यक्रम स्थानिक पातळीवर हाती घेण्याच्या सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्या आहेत.

उसाच्या तुलनेत शर्कराकंदाचा कालावधी खूप कमी आहे. उसाच्या मानाने या पिकाला पाणीही फारच कमी लागते आणि या पिकावर खर्चही कमीच होतो. शर्कराकंदापासून साखरेबरोबर इथेनॉलही करता येते. क्षारपड जमिनीत शर्कराकंद चांगले येते. शर्कराकंदाच्या प्रक्रियेतून जो चोथा निघतो, तो जनावरांसाठी उत्तम खाद्य आहे. या पिकाच्या पाल्यामध्येही १५ टक्के प्रथिने असून, तोही जनावरांसाठी पोषक मानला जातो. राज्यातील पाण्याचे वाढते दुर्भिक्ष पाहता, हे पीक शेतकऱ्यांना आश्वासक ठरू शकते. दुग्धशर्करा योग म्हणजे आपल्या देशातील वातावरणात तग धरणारी वाणं देण्यास अमेरिकेतील शास्त्रज्ञ तयार आहेत. अशावेळी व्हीएसआयने उच्च दर्जाचे शुद्ध शर्कराकंद वाण विकसित करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत. साखर कारखान्यांनी शर्कराकंद रसाबरोबर चोथाही जनावरांना खाद्य म्हणून कामी येईल, असे डिफ्युजर बसवून घ्यावेत. केंद्र-राज्य शासनाने कंदाच्या वजनावर नाही, तर त्यातील साखरेच्या प्रमाणावर दराचे सूत्र ठरवायला हवे. उसाप्रमाणेच निश्चित बाजारपेठ आणि किफायतशीर दर शर्कराकंदाला मिळाल्यास राज्यात या पिकाचे क्षेत्र वाढू शकते. 

राज्यात ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये शर्कराकंदाचे उत्पादन मिळते. अशावेळी शर्कराकंद गाळपासाठी कारखान्यांना पुढे काही काळ मिळू शकतो. यातून साखर उत्पादनात वाढ होऊन हे पीक उद्योलाही फायदेशीर ठरू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com