agriculture news in marathi agrowon agralekh on thunder and hail strom in Maharashtra state | Agrowon

पुन्हा अस्मानी घात

विजय सुकळकर
मंगळवार, 3 मार्च 2020

अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत मोठ्या आशेने शेतकरी पिके घेत असतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांना अनेक स्वप्ने पूर्ण करायची असतात; परंतु अवकाळी पाऊस या स्वप्नांवरच सातत्याने पाणी फेरण्याचे काम करीत आहे.

मागील खरीप हंगामात अतिवृष्टी, महापुराने शेतीचे अतोनात नुकसान केले, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविण्याचे काम केले. यातून शेतकरी कसाबसा सावरत असताना चालू वर्षाच्या सुरवातीलाच विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस अन् गारपिटीने रब्बी हंगामातील वाढीच्या अवस्थेतील पिके तसेच फळे-भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले. त्यातूनही वाचलेली रब्बीची पिके आता काढणीला आलेली आहेत, बऱ्याच ठिकाणी रब्बी ज्वारी, हरभऱ्याची काढणी सुरू आहे. अशावेळी पुन्हा नाशिक, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांसह विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा बसला आहे. यातून हरभरा, गहू, मका, कांदा, टोमॅटो या पिकांना जमीनदोस्त केले तर द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्रा, मोसंबी, केळी या फळपिकांचा बहर झडकून काढला आहे. 

शेती हा व्यवसाय मुळातच जोखीमयुक्त आहे, त्यात हवामान बदलाच्या सध्याच्या काळात हा व्यवसाय अधिकच जोखमीचा ठरतोय. भयंकर अशा अनिश्चिततेच्या काळात शेतमाल घरात येऊन पडेपर्यंत त्याचे कुठे, कधी, कसे आणि किती नुकसान होईल, हे सांगताच येत नाही. शेतकऱ्यांच्या अशा अचानक होणाऱ्या नुकसानीत त्यांना दिलासा द्यायचा असेल तर तत्काळ मदत त्यांच्या पदरी पडायला हवी, परंतु तसे होताना दिसत नाही. मागील खरीपात महापूर तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आता वादळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. आपदग्रस्तांना लवकरच मदतीची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत विधानसभेत चर्चा करुन भऱपाई देण्यासाठीचा योग्य तो निर्णय होईल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे. नैसर्गिक आपत्तीत मंत्रीस्तरावरुन पाहणी-पंचनाम्याचे आदेश होतात; परंतु प्रत्यक्षात या कामांची नीट अंमलबजावणीच होत नाही, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे नुकसानग्रस्त भागात जिल्ह्याधिकाऱ्यांनी आपली यंत्रणा तत्काळ कामाला लावायला हवी.

राज्यभरातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे वास्तववादी पंचनामे करायला हवेत. राज्य शासनाने पुढील सर्व प्रक्रिया जलद करुन आपदग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर मदत कशी होईल, हे पाहावे. 
नैसर्गिक आपत्तींमध्ये पाहणी-पंचनाम्यात ड्रोन कॅमेरे, जीपीएस आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शासन-प्रशासन पातळीवर आजवर खूप गप्पा झाल्या. प्रत्यक्षात मात्र हे तंत्र वापरले जात नाही. या तंत्राचा वापर पाहणी पंचनाम्यांमध्ये केल्यास गावपातळीवरील महसूल, कृषी विभागांच्या कर्मचाऱ्यांचे कष्ट वाचतील, शिवाय हे काम गतिमान, अचूक आणि पारदर्शी होईल. नैसर्गिक आपत्ती वाढत असताना पीकविमा संरक्षणाची व्याप्ती वाढवून नुकसान झाल्यास हमखास भरपाईची शाश्वती शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. मात्र नेमके याच्या उलटे घडताना दिसते. केंद्र सरकारने पीकविमा योजनेत अलिकडे केलेल्या बदलांतून शेतकऱ्यांची जोखीम वाढवताना स्वतची जबाबदारी कमी केली आहे. पुढील दहा वर्षांचा अचूक हवामान अंदाज देण्याचा दावा करणाऱ्या हवामान खात्याला पुढील दोन दिवसांत कुठे, किती पाऊस पडेल, निश्‍चित कुठे गारपीट होईल, हे स्पष्टपणे सांगता आलेले नाही, ही चिंतेचीच बाब म्हणावी लागेल.


इतर संपादकीय
कुलगुरु निवडीत नको तडजोडमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे (जि.अहमदनगर...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
पावसाच्या बदलत्या पॅटर्नचा अभ्यास कधी?‘‘दोन एकरातील सोयाबीन काढणीला आले असून पंधरा...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
किसान रेल्वे धावो सुसाट तुमची उमटलेली पाऊले नेहमी आत्मविश्वासपूरक आणि...
कोरोनाचे विदारक वास्तवभारतात ३० जानेवारी २०२० ला केवळ एक कोरोनाबाधित...
एका शोकांतिकेचे पुनरावर्तनदेशात एप्रिलपासून उन्हाळ कांद्याचा आवक हंगाम सुरू...
हा तर विश्वासघात!खरे तर जून ते सप्टेंबर या काळात कांद्याचे दर थोडे...
`अॅक्शन प्लॅन’ करेल काम!  मागील महिनाभरापासून विदर्भातील संत्रा उत्पादक...
कायदा कठोर अन् अंमलबजावणी हवी प्रभावी...शेतकऱ्यांना बनावट कीडनाशकांपासून संरक्षण...
अभियाने उदंड झाली, अंमलबजावणीचे काय?देशात शेतमाल खरेदीची अद्यापपर्यंत नीट घडी बसलीच...
आव्हान रोजगारवृद्धीचे!वाढती लोकसंख्या, अर्थव्यवस्थेचा अस्थिर वृद्धीदर,...
परतीच्या मॉन्सूनचा बदलता पॅटर्नदरवर्षी जून महिन्यात आपण ज्या मॉन्सूनची मोठ्या...
अनुकरणीय उपक्रमखरीप हंगाम आता संपत आला आहे. राज्यातील अनेक...
आश्वासक रब्बी हंगामखरे तर सप्टेंबर महिना लागला की महाराष्ट्रातील...
कार्यपालिकेचा वाढता वरचष्मासंसदीय लोकशाहीत कायदेमंडळ (संसद), कार्यकारी मंडळ...