कुलगुरु निवडीत नको तडजोड

कुलगुरुपदासाठी विद्वत्ता, अनुभव आणि अष्टपैलू नेतृत्व यांच्या निकषांत तडजोड करुन चालणार नाही. असे झाले तर यांत कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि राज्यातील शेतकरी यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते.
agrowon editorial
agrowon editorial

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे (जि.अहमदनगर, महाराष्ट्र) कुलगुरु डॉ. विश्वनाथा यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे नव्या कुलगुरुचा शोध सुरु आहे. परंतू कुलगुरुपदी एका विशिष्ट उमेदवाराची वर्णी लावण्यासाठी अनुभवाचे निकष बदलण्याच्या हालचाली थेट राजभवनातून सुरु आहेत. या उमेदवाराने जोरदार ‘फिल्डींग’ लावलेली असल्याचे कळते. अशावेळी राज्यपाल तसेच कुलगुरु निवड समिती आता नेमकी काय भुमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

सुमारे दशकभरापूर्वी विद्यापीठ कुलगुरु पदासाठी प्रोफेसर पदाचा आठ वर्षांचा अनुभव, असा निकष होता. त्यावेळी याच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी १२० हून अधिक अर्ज आले होते. एवढ्या उमेदवारांच्या मुलाखती घेणे शक्य नसल्याने निवड समितीने मेरीटनुसार काही उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविले. इतर उमेदवारांनी यावर आक्षेप नोंदविला. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व उमेदवारांना मुलाखतीला बोलवावे लागले. त्यातून मग एकाची कुलगुरुपदी निवड झाली. या प्रक्रियेत दोन ते तीन महिन्यांचा कालावधी गेला, त्यात निवड समितीलाही बराच मनस्ताप झाला. हे सर्व टाळण्यासाठी तत्कालिन राज्यपालांनी कुलगुरु निवडीची प्रक्रिया शास्त्रशुद्ध करण्यासाठी तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील व डॉ. सुधीरकुमार गोयल यांना सुधारीत नियम निकष तयार करावयास सांगितले. त्यांनी त्यावेळच्या आजी-माजी कुलगुरुंशी चर्चा करुन योग्य निकष तयार केले. त्यानुसार कुलगुरु पदासाठी प्रशासकीय व तंत्र क्षेत्रातील आठ वर्षांचा अनुभव बंधनकारक केला. या आठवर्षांपैकी पाच वर्षांचा अनुभव हा विद्यापीठातील अधिष्ठाता, संचालक वा समकक्ष पदाचा असणे गरजेचे आहे. राज्यात काही काळ कृषी विद्यापीठातील भरत्या, नियुक्त्या, बढत्या बंदच होत्या. त्यामुळे या पात्रतेचे राज्यातील उमेदवार कुलगुरु पदासाठी भेटत नसल्याने बाहेरच्या राज्यातील उमेदवारांची वर्णी कुलगुरुपदी लागत होती. म्हणून अनुभवाचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात आला. आता या पात्रतेतही महात्मा फुले कृषी विद्यापीठातील काही उमेदवार बसत नसल्यामुळे अनुभवाचा कार्यकाळ पाचऐवजी तीन वर्षे करण्यासाठी एक लॉबी सक्रीय झाली आहे.

कुलगुरु पद हे मान-सन्मान, प्रतिष्ठेचे आहे. त्याचबरोबर या पदावर कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार अशा तिन्ही आघाड्यांवर विद्यापीठाने उल्लेखनिय काम करण्याची जबाबदारी पण आहे. या पदावरील व्यक्तीस विद्यापीठांतर्गत विविध मंडळे, परिषदा यातील तसेच राष्‍ट्रीय-आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रीत कार्यक्रम राबविण्याचा देखील अनुभव हवा. याबाबतचे ज्ञान आणि कौशल्य प्रदीर्घ अनुभवातूनच प्राप्त होते. कुलगुरु निवडीत वाढता राजकीय हस्तक्षेप, त्यातून निकषांत होत असलेल्या वारंवार बदलांमुळे अपेक्षित अनुभव आणि पात्रतेच्या उमेदवारांची निवड या पदावर होताना दिसत नाही. मागील काही वर्षांपासून तर कृषी विद्यापीठे हे शैक्षणिक केंद्रांऐवजी राजकारण्यांचे अड्डे बनलेले आपण पाहतोय. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षणातील अत्यंत सुमार कामगिरीमुळे अधिस्विकृती गमावण्याची वेळ त्यांच्यावर आलेली होती. हे सर्व गंभीर आहे. त्यामुळेच कुलगुरुपदासाठी विद्वत्ता, अनुभव आणि अष्टपैलू नेतृत्व यांच्या निकषांत तडजोड करुन चालणार नाही. असे झाले तर यांत कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि राज्यातील शेतकरी यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करुन निवड समिती तसेच राज्यपाल येथून पुढे याबाबतच्या मूळ निकषांनुसार खरोखरच पात्र उमेदवारांची कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुपदी निवड करतील, हीच अपेक्षा!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com