अर्थवाहिन्या सुरू करा

शहरांतील श्रीमंत लोकांची आवश्यक आणि आरामदायी वस्तूंची खरेदी जशी मॉलमध्ये एकाच ठिकाणी होते, त्याचप्रमाणे गोरगरिबांची जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आठवडे बाजारात होते.
agrowon editorial
agrowon editorial

कोरोना पहिल्या-दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने बंद केलेले आठवडी बाजार राज्याच्या बहुतांश भागात अजूनही सुरू झालेले नाहीत. आता कोरोनाचा संसर्ग शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा बऱ्यापैकी कमी झाला आहे. अनलॉक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत जवळपास सर्वच दुकाने, हॉटेल्स हे आधीच सुरू झालेले आहेत. चार दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या असून, आजपासून मंदिरेही उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु अनेक ठिकाणचे आठवडे बाजार मात्र अजूनही बंदच आहेत. आठवडे बाजार बंद असल्याने ग्रामीण अर्थचक्र ठप्प झाले आहे. त्यामुळे आठवडे बाजार सुरू करावेत म्हणून विविध जिल्ह्यांमधून मागणी होतेय. अशावेळी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन आठवडे बाजार लवकरच सुरू करायला हवेत. 

राज्यातील आठवडे बाजारात केवळ धान्य-भाजीपाल्याचीच खरेदी-विक्री होत नाही तर तेथे गोरगरिबांच्या संसाराला लागणाऱ्या सुई-दोऱ्यापासून ते कपडे-लत्ते, भांडे-कुंडे, चपला-बुटांसह इतरही आवश्यक वस्तू-उत्पादने-सेवा मिळण्याचे खात्रीच ठिकाण आहे. शहरांतील श्रीमंत लोकांची आवश्यक आणि आरामदायी वस्तूंची खरेदी जशी मॉल्समध्ये एकाच ठिकाणी होते, त्याचप्रमाणे गोरगरिबांची जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आठवडे बाजारात होते. काही ठिकाणी आठवडे बाजारातच जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात तर अनेक ठिकाणी जनावरांचे बाजार आता वेगळे भरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आठवडी बाजारात शेतकरी आपल्या जवळचे धान्य तसेच इतर शेतीमालाची तसेच शेळी-मेंढी-कोंबड्या-गाय-म्हैस-बैल यांची विक्री करून तेथूनच इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करतात. बहुतांश आठवडी बाजारात शेतकरी अथवा उत्पादक ते ग्राहक असा थेट व्यवहार होतो. मध्यस्थ, दलालांशिवाय होणाऱ्या व्यवहारामुळे विकणारा आणि खरेदी करणाऱ्या अशा दोन्ही घटकांचा फायदा होतो. अनेक आठवडी बाजारांत पारंपरिक बलुतेदार पद्धतीतील चांभार, लोहार, सुतार, कुंभार, न्हावी अजूनही बसून आपली सेवा-उत्पादने विकत असल्याचे पाहावयास मिळते.   

राज्यात तालुक्याच्या ठिकाणांसह मोठ्या गावांत आठवडी बाजार भरतात. परिसरातील आठवडी बाजारांचे वार वेगवेगळे असल्याने शेतकरी-व्यापारी तसेच ग्राहकांना सुद्धा आपल्या सोयीने आठवडे बाजाराला हजेरी लावता येते. शेतकरी-शेतमजूर तर आठवडाभर काम केल्यानंतर एक दिवस जवळच्या आठवडी बाजारासाठी राखून ठेवतात. आठवडे बाजारातील बहुतांश सेवा-उत्पादन तुलनात्मक स्वस्त असतात. आठवडी बाजारात महिलांचा सहभाग अधिक दिसून येतो. एकदा बाजार केला म्हणजे पुढे आठवडाभर पोटापाण्यासह इतर आवश्यक बाबींसाठी कुठे जायची गरज त्यांना भासत नाही.

शहर परिसरातही आठवडे बाजार वाढत आहेत. देशी-गावरान धान्य आणि ताजी फळे-भाजीपाला खरेदीसाठी शहरी ग्राहकही जवळच्या आठवडी बाजारात जातोय. एकंदरीतच काय तर आठवडे बाजार हे ग्रामीण अर्थवाहिन्या असून, त्या अधिक काळ बंद राहणे परवडणारे नाही. खरे तर कोरोना महामारीत बंद केलेले आठवडे बाजार पहिल्या अनलॉक टप्प्यातच सुरू करणे गरजेचे होते. आठवडे बाजार सुरू करण्याच्या निर्णयास मुळातच खूप विलंब होत आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरी असो अथवा ग्रामीण भाग अनेक आठवडे बाजाराला जागा उपलब्ध नाहीत. ते कुठे तरी नदी-नाल्याच्या काठ, रस्त्याच्या कडेला नाहीतर मंदिर परिसरात भरतात. आठवडे बाजाराचे एकंदरीत महत्त्व, त्यातील अर्थकारण पाहता त्यांना सुनियोजित जागा आणि व्यापार-व्यवहाराच्या दृष्टीने प्राथमिक सेवासुविधा स्थानिक प्रशासनाने उपलब्ध करून द्यायला हव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com