हा तर ओला दुष्काळच!

दुर्दैवाची बाब म्हणजे दुष्काळ कोरडा असो की ओला, ‘दुष्काळ’ या शब्दप्रयोगाचीच शासन-प्रशासनाला ॲलर्जी आहे.
agrowon editorial
agrowon editorial

सोलापूर जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर पीकविमा कंपन्यांनी योग्य ती कारवाई करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आदेश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष-डाळिंब बागांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी हे आदेश दिले आहेत.

सप्टेंबर महिना लागल्यापासून सुरू असलेल्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागांत सोयाबीन, कापूस, मका, भुईमूग, हळद या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसे पाहिले तर जून ते सप्टेंबर या काळात प्रत्येक महिन्यातच अतिवृष्टी, महापुराने शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे काही भागांत पाहणी-पंचनामे झाले, तर काही भागांत तेही झाले नाही. पाहणी-पंचनाम्यानंतर पुढे काय झाले तेही गुलदस्तातच आहे. नुकसानग्रस्त बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पिकांचा विमा उतरविला आहे. विमा कंपनी, कृषी विभागाच्या सूचनेनुसार १७ सप्टेंबरपर्यंत साडेआठ लाख नुकसानीच्या तक्रारी-पूर्वसूचना दाखल झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे विमा कंपनीला नुकसानीच्या सूचना देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲपपासून ते विमा उतरविलेल्या बॅंकेपर्यंत सहा पर्याय देण्यात आले होते. परंतु यापैकी एकाही पर्यायात नुकसान होऊन पूर्वसूचना दाखल करू न शकणारे अनेक शेतकरी आहेत. त्यातच गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नुकसानग्रस्त शेतकरी आणि त्यांचे क्षेत्र वाढलेले आहे. या प्रत्येक शेतकऱ्याला विमा भरपाई मिळायला हवी. काही शेतकऱ्यांनी नुकसान होऊन भरपाई मिळत नसल्याने या वर्षी पीकविमा भरलेला नाही. अशा शेतकऱ्यांनाही शासनाकडून मदत मिळायला हवी.

राज्यात या वर्षी पावसाने सरासरी गाठली असली तरी तो सुरुवातीपासून फारच असमान बरसत आला आहे. मुख्य म्हणजे मागील काही वर्षांपासून एका भागात कमी कालावधीत कोसळधार पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यात चार महिन्यांत किमान चार-पाच वेळा तरी विविध भागांत ढगफुटीच्या पावसाचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे.  गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यात काही सर्कलमध्ये एकाच रात्री ११० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. अशा भागांतील शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे दुष्काळ कोरडा असो की ओला, ‘दुष्काळ’ या शब्दप्रयोगाचीच शासन-प्रशासनाला ॲलर्जी आहे. सरासरीपेक्षा १० टक्क्यांहून कमी पावसाला ‘अवर्षण काल’ (ड्राय स्पेल) तर १० टक्क्यांहून अधिक पावसाला अतिवृष्टी किंवा अत्यंत जास्त पाऊस (एक्सेस रेन) असे त्यांच्याकडून संबोधले जाते. शब्दप्रयोग बदलल्याने ओल्या अथवा कोरड्या दुष्काळाची तीव्रता कमी अधिक होत नाही, हे खरे तर शासन-प्रशासनाने लक्षात घ्यायला पाहिजे.

राज्यात मागील चार-पाच वर्षांपासून होत असलेली अतिवृष्टी, सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांत पडणारा पाऊस, त्यात होत असलेले पिकांचे अतोनात नुकसान हे पाहून ओल्या दुष्काळाची नव्याने स्पष्ट व्याख्या करायला हवी. त्याचे निकष हवामान तसेच कृषी तज्ज्ञांनी मिळून ठरवायला हवेत. ठरलेल्या निकषांनुसार ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठीची यंत्रणा (गावनिहाय पावसाचे मोजमाप, नुकसानीची पाहणी) उभी करायला हवी. मदतीचे जुने-पुराने निकषही बदलून शेतकऱ्यांना दिलासादायक मदत मिळेल, याची काळजी घ्यायला हवी. शेवटी या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी होईल, हेही पाहायला हवे. असे झाले तरच राज्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळात खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com