बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
अॅग्रो विशेष
माती जीवंत ठेवा
आज देशात जमिनीच्या वाढत्या धुपीएवढी गंभीर समस्या शेतीच्या बाबतीत दुसरी कोणती नाही. असे असताना याची दखल फारशी कोणीही घेत नाहीत, हे अधिक दुर्दैवी आहे.
आज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व कृषी संस्थे’द्वारा
(एफएओ) आजचा दिवस ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘माती जीवंत ठेवा, जैवविविधतेचे रक्षण करा’ असा यावर्षीचा संकल्प असून, याबाबत जाणीव जागृती करण्याचे आवाहन या दिनानिमित्त सर्वांनी करण्यात येते. माती हे शेतीसाठीचे, पीक उत्पादनासाठीचे अत्यंत मूलभूत असे जिवंत माध्यम आहे. ९० टक्के जीवजंतू हे मातीतच राहतात. महत्त्वाचे म्हणजे मातीतील सूक्ष्मजीव पृथ्वीतलावरील सर्व सजीव सृष्टीला जगविण्यासाठी अविरत कार्यरत असतात. मानवासह इतरही सजीवांना लागणारे जवळपास ९५ टक्के अन्न मातीतूनच येते अथवा निर्माण केले जाते. एवढेच नव्हे, तर मानवाला होत असलेल्या विविध संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी वापरण्यात येणारी बहुतांश प्रतिजैविके ही मातीतील सूक्ष्मजीवांपासूनच निर्माण केली जातात. यावरून माती मानवच नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी किती महत्त्वाची आहे, हे आपल्या लक्षात यायला हवे. असे असताना खासकरून आपल्या देशात मातीबाबत मात्र कोणीच गंभीर असल्याचे दिसत नाही.
माती कोणत्या कारखान्यात तयार होत नसून, ती नैसर्गिकरीत्याच निर्माण होत असते. एक इंच मातीचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. असे असताना वादळ-वारे, पाऊस-पाणी-पूर यामुळे दरवर्षी लाखो एकर जमिनीची धूप होऊन त्या नष्ट होत आहेत. नाही तर पीक लागवडीसाठी अयोग्य ठरताहेत. पावसाळ्यात नद्या गाळाने भरून वाहत समुद्राला मिळत आहेत. याची सर्वाधिक झळ शेतकऱ्यांना बसत आहे. आज देशात जमिनीच्या वाढत्या धुपीएवढी गंभीर समस्या दुसरी कोणती नाही. असे असताना याची दखल फारसे कोणीही घेत नाहीत, हे अधिक दुदैवी आहे.
शेत जमिनीवरील विविध प्रकारच्या आक्रमणांनी लागवड क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध जमिनीतून अधिकाधिक उत्पादन काढण्याची स्पर्धा लागली आहे. एका वर्षात एकाच शेतात दुबार-तिबार पिके घेतली जात आहेत. खरे तर यांत गैर काहीच नाही. परंतु उत्पादनवाढीसाठी पाणी आणि रासायनिक खतांचा अतिरेकी वापर होतोय. त्यातच पशुधनाच्या घटत चाललेल्या संख्येने शेणखत, सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला आहे. तणनाशके, रासायनिक कीडनाशके यांचा वापर वाढला आहे. अनेक उद्योगाचे सांडपाणी-टाकाऊ पदार्थ परिसरातील जमिनीत अथवा नदी-नाल्यात सोडले जाते. त्यामुळे माती-पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे पीक काढणीनंतरचे अवशेष तसेच शेतातील इतर काडीकचरा सर्रासपणे जाळून टाकण्याची प्रथा अजूनही बहुतांश भागात आहे. या सर्व प्रकारांमुळे मातीतील सूक्ष्मजीव कमी होत असून माती मृतवत होत आहे.
माती जीवंत तसेच जैवविविधताही टिकवून ठेवायची असेल तर प्रथमतः जमिनीची होणारी धूप थांबविण्याबाबतचा देशभर व्यापक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम शासनाने राबवायला हवा. या कार्यक्रमात थेट शेतकऱ्यांना सहभागी करुन त्यांच्या शेतातून एकही मातीचा कण बाहेर गेला नाही पाहिजेत, असे उपचार त्यांना द्यायला हवेत. वनक्षेत्रासह इतर पडीक जमिनीतूनही माती वाहून जाऊ नये म्हणून वृक्ष लागवडीसह गवताळ कुरणांच्या विकासाची मोहीम शासनाने हाती घ्यायला हवी. शेत जमिनीतील मातीचे प्रदूषण कमी करून पोत सुधारण्यासाठी पाणी आणि रासायनिक खते, कीडनाशकांचा प्रमाणबद्धच वापर होईल, हे पाहावे लागेल. शिवाय शेतात सेंद्रिय, जैविक, हिरवळीच्या खतांच्या वापराबाबत प्रबोधन करावे लागेल. पिकांचे अवशेष जाळून न टाकता ते शेतात कुजवून खत करण्याबाबत देखील प्रबोधन व्हायला पाहिजे. यापासून जैवइंधन निर्माण करण्याचे तंत्रही आता विकसित झाल्यामुळे असे प्रकल्प देशभर उभे राहायला हवेत. उद्योगाचे सांडपाणी असो की इतर रासायनिक टाकाऊ पदार्थ हे प्रक्रिया केल्याशिवाय बाहेर पडणार नाहीत, ही काळजीही घ्यावी लागेल.
- 1 of 655
- ››