सालगडी पाहिजेत!

मालकापेक्षा सालगड्याला शेतीच्या कामाची काळजी अधिक होती, तेवढीच काळजी सालदाराच्या पूर्ण कुटुंबाची मालकही वाहत होते.
agrowon editorial
agrowon editorial

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जाहिरात फिरत होती. एका शेतकऱ्याने शेतीत काम करण्यासाठी ‘सालगडी पाहिजे’ अशी जाहिरात दिली होती. त्यात वर्षभरासाठी चांगले वेतन, शेतात राहण्याची सोय, सालगड्याच्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाईल आदी ऑफर दिलेल्या होत्या. यावरून सालगडी मिळविणे सध्या किती अवघड झाले आहे, याचा अंदाज यायला हवा. कृषी संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन सालगडी ठेवण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा जवळ आल्याने सालगड्याची शोधाशोध सर्वत्र सुरू आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव परिसरात सालगड्यासाठी लाखावर रक्कम मोजली तरी कोणीही धजावत नाहीत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यातून सालगडी आणावे लागत आहेत. मागील तीन दशकांपासून सालगडी राहण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. त्याची कारणे अनेक आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे होत आहेत. प्रति शेतकरी जमीन धारणक्षेत्रच कमी झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना सालगडी ठेवण्याची गरज वाटत नाही. त्यातच शेतीचे यांत्रिकीकरण खूप वाढले आहे. शेतीशिवाय इतर ठिकाणी मिळणारे काम, शेतीच्या तुलनेत अशा मजुरीचे वाढते दर आणि शेतीतील कामांत गुत्ते, ठोक्यात मिळणारी जास्त मजुरी यामुळे वर्षभर एकाच शेतकऱ्याकडे ठरावीक रकमेत सालगडी म्हणून अडकून पडणे हे अनेकांना पटेनासे झाले आहे.

काळाच्या ओघात शेतीमध्ये अनेक स्थित्यंतरे येत आहेत. त्याचबरोबर शेतीतील काही परंपरा, प्रथाही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सालदारीवरून महिनेवारी, आठवडावारी आणि आता तर रोजंदारीवर मजुरीचे दिवस आलेले आहेत. रोजंदारी पद्धतीत शेतकऱ्यांना अगोदरच्या दिवशी सायंकाळी मजुरांना सांगावे लागते. मजुरांच्या सोईचे काम असेल तर रोजंदारी ठरते. त्याच कामाकरिता कोणी अधिक पैसे देत असेल तर मजुरांचा मोर्चा तिकडे वळतो. यामुळे ऐन कामाच्या गडबडीच्या काळात मजूर मिळत नाहीत, शेतकऱ्यांची कामे खोळंबतात, असे अनेक प्रकार घडत आहेत. गुत्ते किंवा ठोक्‍याने काम घेण्याची वृत्ती वाढली आहे. यात कमी वेळात काम उरकायचे यावर मजुरांचा भर असतो. कामाच्या दर्जाविषयी त्यांना फारसे घेणेदेणे नसते. मालक आणि मजुरांचा संबंध केवळ काम आणि पैशापुरता असतो. अनेक ठिकाणी शेतीत काम करायला कोणीही तयार होत नसल्याने तसेच वाढलेल्या मजुरीला कंटाळून शेतीस रामराम ठोकण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. अशा नकारात्मक परिस्थितीत आजही नैसर्गिक आपत्तीने हैराण असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर मजुरी न घेता काम करणारे मजूर पाहावयास मिळतात, तर मालकाच्या शेतीत अख्खी हयात घातलेल्या वृद्ध सालगड्याची काळजी वाहणारे मालकही आहेत. सालदारीत मिळणारे धनधान्यच नव्हे, तर मालक आणि गडी यांचा एकमेकांवरील विश्‍वासावर हा वार्षिक करार होत होता. मशागत, पेरणीपासून सर्वच शेतीकामात आघाडीबरोबर कामही नंबर एक व्हायला हवे, ही सालदाराची जिद्द असायची. मालकापेक्षा सालगड्याला शेतीच्या कामाची काळजी अधिक होती, तेवढीच काळजी सालदाराच्या पूर्ण कुटुंबाची मालकही वाहत होते. एकमेकांवरील संकटे, सुखदुःखात दोन्ही कुटुंबे धाऊन जात असत. आज सालगड्याचे प्रमाण कमी झाले तरी जेथे सालगडी आहेत, तेथे हा ऋणानुबंध कायम आहे. बदलत्या परिस्थितीत एकमेकांची काळजी वाहणारी ही चांगली संस्कृती नष्ट होता कामा नये. शेतकरी आणि सालगडी हा ऋणानुबंध टिकायला हवा. कोरोना लॉकडाउनमध्ये शहरांत मोलमजुरी करणाऱ्यांना आपल्या गावी परतावे लागत आहे, हे आपण वर्षभरापासून पाहतोय. शहरातून गावात परतलेल्या या मजुरांना मात्र शेतीत काम मिळून त्यांचा उदरनिर्वाह भागत आहे. अशावेळी भविष्यातही शाश्‍वत रोजगाराचे माध्यम म्हणून मजूर, सालगड्यांनी शेतीकडे पाहावे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com