संसर्गजन्य रोगांचा विळखा

सध्या मानवामध्ये नवनवीन रोगांचा प्रसार झपाट्याने होतोय. गंभीर बाब म्हणजे यातील बहुतांश रोगांचा मानवामध्ये प्रसार पाळीव तसेच वन्यप्राण्यांद्वारे रोगकारक सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून होतोय.
संपादकीय
संपादकीय

राज्यात आरोग्यसेवेच्या दृष्टीने मानवी आरोग्य लक्षात घेता आदिवासी आणि ग्रामीण भागातील जनसामान्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. याची पहिली पायरी १०८ च्या रुग्णवाहिका सेवेने सिद्ध केली आहे. मात्र, रोग नियंत्रणापेक्षा प्रतिबंध या बाबींवर भर देणे अधिक अपेक्षित आहे. रोग प्रसार मानवामध्ये दिसून आला तरी त्याचे उगमस्थान प्राण्यात असू शकते, याची काहींना जाण आहे तर अनेकांना ती नाही. मात्र, उत्पादकतेसाठी सांभाळले जाणारे पशू म्हणजे पाळीव प्राणी रोग प्रसाराचे स्रोत ठरू नयेत, यासाठीचे प्रयत्न भविष्यात वाढवावेच लागणार आहेत. मानवी आरोग्य सेवा पशुजन्य आजारांना अनभिज्ञ आणि पशुरोग निदान सुविधा मानवी आरोग्य यंत्रणेपासून दूर राहिल्यास त्याचे मोठे नुकसान मानवास सहन करावे लागते. मात्र भारतीय पातळीवरील वैद्यक संशोधन परिषद आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ यांच्या समन्वयातून संसर्गजन्य रोग नियंत्रण केंद्र (सेंटर फॉर वन हेल्थ) स्थापण्याचा नवा अध्याय नागपूरच्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठास लाभला आहे. या केंद्राद्वारे वैद्यक शास्त्रातील संशोधक मानव आणि प्राणी यात सरमिसळ होणारे संसर्गजन्य रोग संशोधन शिफारशीतून नियंत्रित करू शकतील. महत्त्वाची बाब अशी की पुण्याच्या भारतीय विषाणू शास्त्र संस्थेच्या अधिपत्याखाली या केंद्राची वाटचाल सुरू राहणार आहे. 

राज्यातील पशुवैद्यक विद्यापीठात वन्यजीव सुटका आणि संगोपन केंद्र स्थापन्याचा गोरेगाव येथील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत सामूहिक शास्त्र विषयासंबंधाने संशोधनास चालना मिळणार आहे. यात विद्यापीठातील उपलब्ध मनुष्यबळास राष्ट्रीय संस्थेतील संशोधन सुविधांचे पाठबळ तर नवनवीन क्षेत्रांत संशोधन करून मानवी स्वास्थ सुलभीकरणाच्या संधी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना उपलब्ध होणार आहेत. सध्या मानवामध्ये नवनवीन रोगांचा प्रसार झपाट्याने होतोय. नवीन रोगप्रसाराचे हे सत्र जगभर सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे यातील बहुतांश रोगांचा मानवामध्ये प्रसार पाळीव तसेच वन्यप्राण्यांद्वारे रोगकारक सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून होतोय. विषाणू, जिवाणू, कवक, परजीवी आदी अनेक सूक्ष्मजीव मानवाला विविध रोगांस कारणीभूत असून, त्यापैकी ६५ टक्क्यांहून अधिक रोगांचा प्रसार पक्षी-प्राण्यांद्वारे मानवास होतो. इबोला हा जगभर थैमान घालत असलेला विषाणूजन्य रोग तसेच सॅलमोनेलॉसीस या जिवाणूच्या लागणीमुळे तापेपासून ते पचनसंस्थेचे अनेक घातक आजार मानवाला होतात. या दोन्ही रोगांचा प्रसार पक्षी-प्राण्यांद्वारेच मानवास होतो. फ्लू अर्थात तापेचे बहुतांश स्ट्रेन्स हे झुनोटिक अर्थात प्राण्यांद्वारे मानवात रोगास कारणीभूत आहेत. कुत्रा, घोडा, गाढव तसेच गाय, बैल, म्हैस आदी पाळीव प्राण्यांचा संपर्कात शेतकऱ्यांसह अनेक जण सातत्याने येत असतात. झुनोटिक रोगांचा प्रसार मानवामध्ये हवेद्वारे, चावा घेतल्याने अथवा लाळेद्वारे होतो. प्राण्यांच्या संपर्कात सातत्याने असलेल्या अनेक जणांना प्राण्यांद्वारे प्रसारीत होत असलेल्या रोगांबाबत माहितीदेखील नाही. सेंटर फॉर वन हेल्थच्या माध्यमातून अशा सर्वांमध्ये प्राण्यांद्वारे मानवास होणारे विविध रोग, तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय याबाबत प्रबोधनाचे काम आधी व्हायला पाहिजे. त्यानंतर जगामध्ये सांसर्गिक रोगांचा वरचश्मा निर्माण करणारे जिवाणू आणि विषाणूंना नियंत्रणात आणण्याचे आव्हान नवनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या संशोधकांना पेलावे लागेल आणि आपल्या संशोधनाचा कृती आराखडा सतत यशस्वी वाटचालीत राहील, याची सिद्धता द्यावी लागेल. तरच प्राण्यांपासून होणाऱ्या सांसर्गिक घातक आजारांच्या विळख्यातून मानवाची सुटका होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com