संघर्ष येथील संपणार कधी?

शेतीसाठी वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांची आजपर्यंत पूर्तता होऊ नये, इतक्या अवघड या बाबी आहेत का? तर मुळीच नाही. परंतु, या सुविधा शेतकऱ्यांना पुरविण्याची राजकीय इच्छाशक्ती आत्तापर्यंत कोणत्याही राज्यकर्त्यांनी दाखवलीच नाही.
agrowon editorial
agrowon editorial

शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा लागणारा संघर्ष पाहता ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असेच त्याचे वर्णन करावे लागेल. शेतीसाठीचे प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक सेवासुविधा तर दूरच, मात्र अगदी मूलभूत सुविधा पण राज्यातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके तर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन सहा दशके उलटली आहेत. असे असताना शेतीमध्ये प्रगत मानल्या जाणाऱ्या या राज्यात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांअभावी अनेक शेतकऱ्यांच्या वाट्याला जीवघेणा संघर्ष येतोय.

पवनार जिल्हा वर्धा येथील धाम नदीवरील पुलाचे काम ठप्प असल्याने नदीपलीकडे शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांना लहान बोटीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खरे तर ग्रामीण भागात अनेक गावांना जोडणारे पक्के रस्ते नाहीत. कच्च्या रस्त्यावरील नदी-नाल्यावर पूल नाहीत. अनेक गावांतील शेतरस्त्यांची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आला की गावांचा संपर्क तुटतो. नदी-नाल्यांवरील पुलाअभावी शेतकरी, शेतमजूर तसेच त्यांचे पशुधन पुरात वाहून गेल्याच्या अनेक घटना घडतात. शेतरस्त्याअभावी शेतात यंत्रे-अवजारे नेता येत नाहीत, शेतीची कामे खोळंबतात, शेतमाल शेतातून घरी आणणे तसेच त्यांची बाजारपेठेत विक्री करण्यास अडचणी येतात. अर्थात मोठी जीवित-वित्त हानी केवळ पक्क्या रस्त्याअभावी होते. 

मागील पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने सध्यातरी बहुतांश भागात तेवढी पाणीटंचाई भासत नाही. परंतु अनेक भागात तलाव, धरणांमध्ये पाणी असूनसुद्धा आवर्तने वेळेवर सोडले जात नसल्याने रब्बी तसेच उन्हाळी पिके धोक्यात आहेत. कमी पाऊसमान काळात तर दुष्काळाने राज्यातील शेती अन् शेतकरी होरपळून निघतात. दिवसेंदिवस पाण्याचे वाढते दुर्भिक्ष पाहता येथून पुढे शेतीला पाणी अभावानेच मिळणार आहे. पाण्यासाठी जो अधिक पैसा मोजेल, त्यालाच पाणी मिळेल, यात शेतकरी मागे पडतील. अनेक भागांत तर ‘पाणी आहे पण वीज नाही अन् वीज आहे पण पाणी नाही’ अशा अवस्थेमुळे शेती सिंचन होत नाही.

विजेच्या बाबतीत बोलायचे झाले तर दिवसा कायमस्वरूपी आठ तास पण पूर्ण दाबाने वीज मिळावी, एवढीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. परंतु, सध्या शेतीसाठी आठवडाभर दिवसा आठ तास तर आठवडाभर रात्री आठ तास वीज दिली जाते. दिवसा असो की रात्री आठ तास वीज फक्त नावालाच आहे, प्रत्यक्षात चार ते पाच तासच वीज शेतकऱ्यांना मिळते. रात्रीच्या सिंचनात अनेक शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले झाले आहेत. त्यात काहींना प्राण गमवावे लागले तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. हल्ली मुंबई, पुण्यातील ‘नाइट लाइफ’ची चर्चा सर्वत्र सुरू आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या वाट्याला दररोजच येत असलेल्या अत्यंत धोकादायक ‘नाइट लाइफ’बाबत कोणी बोलतच नाही.

 खरे तर शेतीसाठी वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांची आजपर्यंत पूर्तता होऊ नये, इतक्या अवघड या बाबी आहेत का? तर मुळीच नाही. परंतु, या मूलभूत सुविधा शेतकऱ्यांना पुरविण्याची राजकीय इच्छाशक्ती आत्तापर्यंत कोणत्याही राज्यकर्त्यांनी दाखविलीच नाही. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीद्वारे आपापल्या भागातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी अनुक्रमे खासदार, आमदार यांना शेतीसाठीच्या या मूलभूत समस्यांची कितपत जाण आहे आणि त्या सोडविण्यासाठी ते कितपत प्रामाणिक प्रयत्न करतील, हाही संशोधनाचा विषय ठरू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com