जित्राबांचं जगणं मुश्‍कील...माणसांचं दूरच..!!!

जित्राबांचं जगणं मुश्‍कील...माणसांचं दूरच..!!!
जित्राबांचं जगणं मुश्‍कील...माणसांचं दूरच..!!!

सांगली ः गायीच्या दुधाला दर मिळत नाय.... जित्राबं इकताबी इनाती..... प्रपंचाचा मेळ लागंना.... दुधाच्या दरावर जित्राबांचं जगणं मुश्‍कील झालंय... माणसांचं जगणं दूरच, अशी व्यथा विभूतवाडी येथील पशुपालक हताश होऊन व्यक्त करत आहेत.  सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जिरायती शेती पिकली जाते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता आली नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. हळूहळू तो झपाट्याने वाढत गेला. त्यामुळे या पट्ट्यातील पशुपालक समृद्ध झाला. दुधाला दर मिळू लागल्याने दुष्काळी पट्ट्यासह सांगली जिल्ह्याच्या सधन भागातही जित्राबांची संख्या वाढत गेली. गेल्या काही दिवसांपासून गायीच्या दुधाचे दर कमी होऊ लागले आणि जित्राब साभाळण मुश्‍कील होऊ लागले.

यामुळे पशुपालकांच्या मधून संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्याचे आश्‍वासन देणारे सरकार आता गांधारीची भूमिका घेत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत  आहेत. 

पशुखाद्य, चाऱ्याचे दर, औषधे आणि मजुरी याच्या दरात प्रचंड वाढ झालेली असताना दुधाच्या दरवाढीबाबत सरकार अजिबात गंभीर नाही. शासकीय दूध खरेदी दर (गाय) २७ रुपये असताना दूध संघ सरासरी २२ रुपये लिटरने खरेदी करताहेत, त्याला सरकारने मूक संमती दिलीय. लिटरमागे पाच रुपये या हिशेबाने जिल्ह्यात रोज ४ लाख ११ हजार लिटर या प्रमाणात २२ लाख रुपयांची वाटमारी केली जातेय. 

अतिरिक्त दूध उत्पादनाने संघ अडचणीत असल्याचे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांवर त्याचे ओझे का, या प्रश्‍नाचे उत्तर ना संघाकडे आहे, ना सरकारकडे. त्याचे उत्तर मागायला पुन्हा एकदा दूध ओतण्याचा आणि शहरी ग्राहकांची कोंडी करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

गायीच्या दूध दरात रोज २२ लाखांची ‘वाटमारी’  जिल्ह्यात सरासरी ११ लाख लिटर दुधाचे संकलन होते. मात्र, उन्हामुळे दूध संकलनात घट झाली आहे. दुधाला कोणता संघ किती दर देतो, याचे आकडे शासकीय दूध डेअरीला देणे बंधनकारक आहे, मात्र बहुतांश दूध संघांनी दुधाच्या दराची लपवणूक केली असल्याचे शासकीय दूध डेअरीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र, असे असताना शासकीय दूध डेअरीने कमी दर देणाऱ्या संघावर कारवाई करण्यासाठी अद्यापही पावले उचलली नसल्याचे चित्र आहे. 

‘दावणीला एक म्हैस आणि एक गाय आहे. मागील दोन महिने गायीच्या दुधाला अपेक्षित दर मिळत होते. त्यामुळे आणखी एक गाय विकत घेतली. त्यानंतर दुधाचे दर कमी झाले. आता करायचे काय, असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे गाय विकताही येईना झाली आहे.  - सौ. अनिता पाटील, सुलतानगादे, ता. खानापूर.

‘मुळात आमच्या भागात जिरायती शेती पिकवली जाते. केवळ शेतीवर आमचं उदरनिर्वाह शक्‍य नाही. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार केला. त्यासाठी कर्ज काढून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. आज १५ वर्षे झाली हा व्यवसाय सुरू आहे. सुरवातीच्या काळात दुग्ध व्यवसायामुळं भरभराटी झाली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून गायीच्या दुधाचे दर कमी झाले आहेत. दिवसेंदिवस खाद्यांचे दर वाढू लागले आहेत. आणि दुधाचे दर कमी होऊ लागले आहेत. यामुळे ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्‍न पडला आहे. जित्राबं साभाळणं मुश्‍कील झालय. सरकारने दुधाचे दर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - दादा पावणे, विभूतवाडी, ता. आटपाडी.

‘दावणीला एक म्हैस आणि दोन गायी हुत्या. काय सांगू आता.... चारा महागायीमुळं जित्राब सांभाळणं कठीण झालंय. त्यामुळे एक गाय मित्राला पाळायला दिलीया. दुधाचे दर कमी असल्यानं आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. तरीदेखील संकटावर मात करतोय.’ - श्रीनाथ साळुंखे, खरसुंडी, ता. आटपाडी.

‘गेल्या ३० वर्षांपासून दूध संकलन करतोय. यातून शेती घेतली. चार जित्राबं दावणीला बांधली. कुटुंबाची प्रगती झाली. मुलांच शिक्षण झालं. शेतकऱ्यांना दररोज ताजा पैसा दूध व्यवसायातून मिळतो. आता दुधाचे दर फारच कमी झाले आहेत. त्यामुळे पशुपालकांनी जित्राबांची संख्या कमी केली आहे. मुळात पहिले शासन दूध पावडर तयार करण्यासाठी अनुदान देत होते. यामुळे दुधाचे दर चांगले होते. याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच झाला आहे. मात्र, सध्याचे शासनाकडून दूध संघाला कोणत्याही प्रकारचे अनुदान देत नाहीत. याचा फटका दूध संघालाही बसला असून पशुपालक संकटात आले आहेत. दुधाच्या दरावर जित्राबांच जगणं मुश्‍कील झालंय... माणसांचं दूरच, अशी स्थिती निर्माण झाली आहे.  - दशरथ मोरे, दिघंची, ता. आटपाडी.

तुटपुंज्या पैशावर प्रपंच कसा चालवायचा?

‘तशी आमची परिस्थिती बेताचीच. दूध व्यवसायावर मुलांचं शिक्षण सुरू आहे. मात्र, दुधाचे दर कमी झाल्याने मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करायचं असा प्रश्‍न समोर आला आहे. महिन्याला ८ हजार रुपये फायद्यातील तोटा नसून नुकसान आहे. दुधातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावर प्रपंच चालवत आहे. पैसे पुरत नाहीत, त्यामुळे माझे पती सुभाष मिसाळ आणि मी मोलमजुरी करू लागलो आहे.’ - सौ. वैशाली मिसाळ, दिघंची, ता. आटपाडी.

‘‘दूध उत्पादकाला प्रतिलिटर २७ रुपये दर मिळायलाच हवा. त्याशिवाय पशुपालक शेतकरी जगणार नाही. कर्नाटक सरकार प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान देत आहे. महाराष्ट्र सरकारनेदेखील अनुदान द्यायला हवे. त्याचप्रमाणे कर्नाटक सरकार शालेय पोषण आहारात दुधाची पावडर १ कोटी १५ लाख विद्यार्थ्यांना प्रतिदिन देतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यायला नको का? तरच दूध उत्पादक मागणीनुसार दर देणे शक्‍य आहे. या संदर्भात कृती समितीदेखील संघाची बैठक घेऊन लवकर चर्चा केली जाणार आहे. बाजारात दूध पावडरीचा दर १२० रुपयांपर्यंत तर बटरचा दर २०० रुपयापर्यंत खाली आला आहे. जो गतवर्षी २५० ते ३०० असा होता. या कमी झालेल्या दरामुळे दुधास जादा दर कसा दिला जाऊ शकतो.’’ - विनायकराव पाटील, माजी अध्यक्ष महानंद दूध व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व वितरक कृती समिती

जिल्ह्यातील दूध संकलन

गायी ४ लाख ११ हजार ७७० लिटर  
म्हैस ३ लाख ९६ हजार ५६६ लिटर

संस्थांकडून दिले जाणारे दर (दर प्रति लिटर रुपये)  

संघाचे नाव म्हैस गाय
राजारामबापू पाटील दूध संघ ३५ २३
फत्तेसिंह नाईक,शिराळा ३६.३० २५
यशवंत शिराळा ३६.३० २५
विटा डेअरी मिरज ३६.३० २१

शासकीय दुधाचे दर

गायीच्या दुधाचा दर ३.५ फॅटला २७ रुपये लिटर  
म्हशीच्या दुधाचा दर ८.५ फॅटला ३६ रुपये प्रतिलिटर
जादा प्रति पॉइंट ३० पैसे   

सद्याचे पशुखाद्यांचे दर

सरकी पेंड ८०० रु.५० (कि.)
शेंगपेंड १४५० रु. ते १५०० (५० कि.)
गोळी पेंड १२०० रु. (६० कि.)
मका अट्टा ८०० रु. (५० कि.)   
गहू अट्टा ९०० रु. (५० कि.)   
कडबा (शाळू) १४०० ते १५०० रु. (शेकडा) 
ऊस ३.५० ते ४ रुपये प्रति किलो  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com