बिटकॉइन स्कीम फसवणूक प्रकरण ईडीकडे देण्याचा विचार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यात गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पाँझी स्कीम सुरू करून गुंतवणूकदारांना आकर्षित व्याज देण्याचे अामिष दाखवले. या अामिषाला बळी पडून लाखो गुंतवणूकदारांनी कोट्यवधीची गुंतवणूक करताच ही स्कीम बंद करून नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी नांदेड आणि पुणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर क्राइम मार्फत केला जात असला, तरी घोटाळ्याची व्याप्ती विचारात घेता, हा तपास ईडीकडे देण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.

गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पाँझी स्कीम सुरू करून अमित भारद्वाज व त्यांच्या प्रतिनिधींनी मुंबई, पुणे, नांदेड, कोल्हापूरसह राज्यातील लाखो गुंतवणूकदारांची सुमारे २ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याप्रकरणी विधानसभेत अ‍ॅड. राहुल कुल, संग्राम थोपटे, शरद सोनवणे आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले, गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पाँझी स्कीम सुरू करून अमित एम. कुमार भारद्वाज, अमोलकुमार थोंबाळे, बालाजी पांचाळ, राजू मोतेवार यांनी नांदेड येथील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाणे, नांदेड येथे फसवणुकीसह ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यामध्ये अमोलकुमार थोंबाळे यास अटक करण्यात आली. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. यातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज हा परदेशात राहत असून, त्याच्या विरुद्ध 'लुकआउट' नोटीस काढली जात आहे. तसेच पुणे येथील दत्तवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह एमपीआयडी कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आकाश संचेती यास अटक करण्यात आली आहे. नोटबंदीच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक देशात नोटबंदी लागू झाल्यानंतर पाँझी स्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली. व्याज दर जास्त देण्याचे अामिष दाखवल्यामुळे नागरिक बिटकॉइन स्कीम गुंतवणुकीकडे आकर्षित झाले. सिंगापूर येथे बसून अमित भारद्वाज हा नियंत्रण करीत होता. अभासी करन्सी बाजारात एजंटांनी नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. १० टक्के परतावा देण्याचा करार केला. स्वत:ची करन्सी निर्माण केली, परंतु या करन्सीला नगण्य मूल्य प्राप्त झाले. या गुन्ह्याचा तपास सर्वत्र सुरू असलातरी सायबर क्राइमसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. राज्य सरकार जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेल्या एकूण ३५ सायबर क्राइमची मदत घेत आहे. दोघांसाठी अटक वॉरंट काढण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने बीटकॉिनसारख्या क्रिप्टो करन्सीला मान्यता दिलेली नाही. परंतु ही करन्सी चलन बेकायदेशीर असल्याचेदेखील घोषित केलेले नाही. रिझर्व्ह बँकेने नागरिकांनी अशा करन्सीमध्ये गुंतवणूक न करण्यासंबंधी वेळोवेळी परिपत्रक काढले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ईडीकडे तपास देण्याचा विचार केला जाईल, असे रणजित पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com