ओझर विमानतळावर कार्गो विमानाची चाचणी यशस्वी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : तब्बल ११० टन क्षमता असलेले बोइंग ७४७-२०० या जेट कार्गो विमानाची यशस्वी चाचणी ओझर विमानतळावर घेण्यात आली. यापुढे मोठे एअर कार्गो विमान येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच ओझर हे कार्गो वाहतुकीसाठी मुंबईजवळचे सर्वोत्तम ठिकाण असल्याचा संदेशही जगभरात या निमित्ताने जाणार आहे. नाशिक हे कृषी उद्योगाचे हब असून, शेतमाल जगभरात पाठविण्यासाठीही कार्गो विमानसेवा उपयुक्त ठरणार आहे.

ओझर येथे एचएएलच्या मालकीचे विमानतळ आहे. लढाऊ विमानांची चाचणी घेण्यासाठी विकसित असलेले हे विमानतळ काही वर्षांपासून प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी खुले करून देण्यात आले आहे. ओझर येथेच विमानतळालगत एचएएल आणि कॉनकॉर यांनी संयुक्तरीत्या हॅलकॉन कंपनीची स्थापना करून २०११ पासून कार्गो व्यवसाय सुरू केला. ओझर ते दुबई ही शेळ्यांची निर्यात वगळता अन्य मालाची थेट निर्यात अद्याप येथून झालेली नाही. यापूर्वी एक रशियन कार्गो विमान २०१२ मध्ये ओझर विमानतळावर आले होते. मात्र, व्यावसायिक स्तरावरील सर्वांत मोठे कार्गो विमान अद्याप येथे आले नव्हते.

रविवारी, २७ मे रोजी बोइंग ७४७-२०० हे जम्बो जेट कार्गो विमान अफगाणिस्तानातील काबूलहून निघाले आणि अवघ्या तीन तासांत म्हणजेच दुपारी बाराला ते ओझरमध्ये दाखल झाले. या विमानाची तब्बल ११० टन क्षमता आहे. दुबईच्या जीएसएस सोल्युशन या आंतरराष्ट्रीय कंपनीचे हे विमान आहे. अमेरिकन कॅप्टन ख्रिस्तोफर फॉक्स या पायलटसह एकूण सात कर्मचारी या विमानासोबत आले आहेत. 

कार्गोसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा आदींची चाचपणी घेतली जाणार आहे. या सर्वांची निवासव्यवस्था, तसेच विमानतळावरील पायाभूत सुविधा हे सारे जोखण्यात आले आहे. हे विमान सोमवारी, २८ मे रोजी सकाळी सात वाजता पुन्हा काबूलच्या दिशेने झेपावणार आहे. कार्गो विमानाच्या यशस्वी लँडिंगबाबत कंपनीचे संचालक मनोज अजवणी यांनी समाधान व्यक्त केले. या विमानाच्या आणखी आठ-नऊ चाचण्या ओझरमध्ये घेतल्या जाणार असल्याचे अमिगो एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक साजीद खान यांनी सांगितले. खान यांनीच यासाठी प्रयत्न केले आहेत. व्यावसायिक मोठे कार्गो विमान ओझरला आल्याने हा संदेश पूर्ण जगभरात जाईल आणि यापुढे अन्य कार्गो विमानेही ओझरला येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा आशावाद निर्यातदार हेमंत सानप यांनी  व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com