उत्पन्न दुप्पट करताना पर्यावरण हानी नको : स्वामिनाथन

पुणे ः बायफच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी केले. डावीकडून गिरीश सोहनी, डॉ. के. एम. एल. पाठक, डॉ. माधव चितळे, डॉ. स्वामिनाथन, किशोर चौकर, डॉ. सुहास वाणी. डॉ. नारायण हेगडे.
पुणे ः बायफच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी केले. डावीकडून गिरीश सोहनी, डॉ. के. एम. एल. पाठक, डॉ. माधव चितळे, डॉ. स्वामिनाथन, किशोर चौकर, डॉ. सुहास वाणी. डॉ. नारायण हेगडे.

पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्प्ट करण्याचे धोरण राबविले जात असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, असा इशारा हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी दिला.

‘देशाच्या ग्रामविकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनाची दिशा’ या विषयावर बायफ (भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन)ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. बायफचे उपाध्यक्षपद भूषविणाऱ्या डॉ. स्वामिनाथन यांनी संस्थेच्या ५० वर्षांच्या वाटचालीविषयी आनंद व्यक्त करीत पुढील कामकाजाविषयी दिशादायक मते व्यक्त केली.

‘पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले आहे. पीक उत्पादकता आणि एकात्मिक शेतीतून उत्पन्न वाढू शकते. परंतु, दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

उत्पादकता वाढीत परिस्थितीय विज्ञान, अर्थशास्त्र आणि हवामानबदल हे तीन घटक आव्हानात्मक ठरतील. मात्र, आधुनिक युगाकडे नजर टाकता पीक विज्ञानापेक्षाही पशुविज्ञानाचा विस्तार वेगाने होत आहे. अर्थात, शेतीसंरचनेपासून पशुधन बाजूला गेल्यामुळे पशुधनाचे योग्य पोषण हेदेखील एक आव्हान आहे, असेही डॉ. स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले.

बायफचे विश्वस्त डॉ. नारायण हेगडे यांनी या वेळी बायफच्या कार्याची माहिती देताना ‘ग्रामविकास आणि दारिद्र्य निर्मूलनातील आदर्श कामकाज म्हणून बायफचा उल्लेख केला आहे. आता शेतकरी उत्पन्न दुप्पट करण्याचे आव्हान डोळ्यांसमोर ठेवून आपण झटले पाहिजे,’ असे ते म्हणाले.

‘शेतकऱ्यांच्या दारात जाऊन सेवा देण्याची बायफची संकल्पना देशातील इतर संस्थांनीदेखील स्वीकारली. शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्थितीवर मात करण्यासाठी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देणे अत्यावश्यकत ठरते. या तत्त्वाचा स्वीकार केलेल्या भागात आत्महत्यादेखील कमी आहेत,’ असे मत बायफचे अध्यक्ष गिरीश सोहनी यांनी व्यक्त केले.

बायफचे विश्वस्त किशोर चौकर, कुलगुरू डॉ. के. एम. एल. पाठक, कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, इक्रिसॅटचे संचालक डॉ. सुहास वाणी, जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, बायफचे उपाध्यक्ष डॉ. अशोक पांडे व भरत काकडे यांनीही आपली मते या वेळी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com