आमच्या कष्टाचं मोल वाटत नाही का? लाखगंगातील दूध उत्पादकांचा सवाल

आमच्या कष्टाचं मोल वाटत नाही का?
आमच्या कष्टाचं मोल वाटत नाही का?

औरंगाबाद : जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या लाखगंगा या १८५ उंबऱ्यांच्या गावात तब्बल १२८ कुटुंबाचा चरितार्थचं दुधावर अवलंबून आहे. ६२३ गायी या कुटुंबांमध्ये असून, गावातील पाच दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून जवळपास साडेचार हजार लिटर दूध या पाचही केंद्राच्या माध्यमातून संकलीत केलं जातं. दरातले चढ उतार अंगवळणी पडलेले. परंतु, गेल्या अकरा महिन्यांपासून दूध दरात होत असलेली घसरणं थांबायचे नाव घेत नाहीयं. खर्च आणि उत्पन्नाच्या ताळमेळात येथील कौटुंबिक आणि व्यावसायिक अर्थकारण कोसळू लागले अाहे. काही महिन्यांपूर्वी दुभत्या गायींनी गजबजलेले असणारे गोठे आता ओस पडू लागले आहेत.   

खर्चाचं अन्‌ उत्पन्नाचं गणितच जुळंना... लाखगंगा गावातील तज्ज्ञ दूध उत्पादक शेतकरी व जवळपास अकरा वर्षांपासून या गावातील दुभत्या जनावरांची उत्पादकांकडे पैसे असो-नसो पशुचिकित्सा करण्याचे काम करणाऱ्या पशुवैद्यक डॉ. नवनाथ गायकवाड यांनी गावातील धवलक्रांतीचा प्रवास जवळून पाहिला. त्यांनी मांडलेलं जनावराच्या खर्चाचं व दुधाच्या उत्पादनाचं व त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचं साध सरळ गणित असं... अकरा वर्षांच्या सेवेत लाखगंगाच नव्हे, तर पंचक्रोशीतील दूध उत्पादकांचा रहाटगाडा जवळून अनुभवतोय. दुधाला खर्चाला परवडणारे दर मिळायचे त्या वेळी दुभत्या जनावरांची प्रचंड काळजी करणारा उत्पादक आता इच्छा असूनही त्यालाच काही मिळत नसल्याने हतबल आहे. जनावरांच्या सकस आहारात कमतरता आली आहे. कितीही उधारी झाली तरी जनावरांची काळजी घेण्यासाठी तो धडपडतो. अंगावर झालेले पैसे प्रसंगी पोटाला चिमटा देऊन फेडतो. पणं आता त्याचं खर्चाचं अन्‌ उत्पन्नाचं गणितचं जुळंना. - डॉ. नवनाथ गायकवाड, लाखगंगासह पंचक्रोशीत सेवा देणारे पशुचिकीत्सक

  • जवळपास दोन ते वीसपर्यंत तर काहींकडे यापेक्षा जास्त दुभती संकरित जनावरं.
  • प्रत्येक जनावरं साधारणत: सरासरी दहा लिटर दूध देते.
  • दुधाला १५ ते १८ रुपयांपर्यंतचे दर 
  • सरासरी सतरा रुपयांचे दर पकडले तर १७० रुपये उत्पन्न
  • ५० रुपये चारा खर्च, ५० रुपये खाद्य खर्च व किमान २० रुपये औषध खर्च
  • या सर्वांमध्ये कुटुंबातील दोघांची मजुरी पकडली तर उत्पन्न कमी अन खर्च जास्त असं गणित.
  • एक गाय किमान ४० पाट्या म्हणजे साधारणत: ३०० किलो शेण देते तेवढंच शिल्लक राहतं.   
  • मुलंही हतबल झाली...

    चाऱ्याची सोय करतांना नाकीनऊ येतात. दुध कितीही दर्जेदार घाला वर्षभरापासून पडलेले दर उठण्याचे नावं घेईना. त्यामुळं चार दुभत्या गायींपैकी एक दोन विकल्या. परवडत नाही, पणं हाती पैसा खेळता रहावा म्हणून सारं गणीत जुळविण्याचा प्रयत्न केला. पण आता जमाना म्हणून हा व्यवहार सांभाळणारी मुलंही हतबल झाली.  - बाबासाहेब किसन पडोळ,

    जिवाची घालमेल होते..  

    दोन एकर शेती. या शेतीत चरितार्थ भागत नव्हतं, म्हणून २०१२-१३ मध्ये पाच संकरीत गायी घेतल्या. ५० ते ५५ लिटर दूध संकलन केंद्रावर घालायचो. दोन वर्षे हे सारं बरं चाललं. १८ ते २२ रुपयांपुढे दुधाचे दर कधी गेले नाही. आता दूध २८ लिटरवर आलयं. महिन्याला चार पोते ढेप आजच्या दराने ४८०० रुपयांची, ३०० रुपयांचा किमान चारा लागतो. अडीच किलोमीटरवर दुचाकीला एक ट्रॉली जोडून हिरवा चारा आणावा लागतो. दर नसल्यानं हातात येणारं चलनं थांबलयं. कुटुंबात चार लोक त्यांचा चरितार्थ भागवून जनावरांचं संगोपन करतांना जिवाची घालमेल होते आहे.  - रामेश्वर कानिफनाथ पडोळ

    दावणं झाली खाली....  

    कुटुंबात सहा सदस्य. बारा एकर शेती. शेती तशी जिरायतीच. जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळलो. १३ गायी होत्या. ७० ते ८० लिटर दुध जायचे. २ वर्षात खासकरून यंदा पडलेल्या दूध दरानं मला उमेदीन सुरू केलेला दूध व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेत तब्बल बारा गायी विकाव्या लागल्या. बारा एकरांत जेमतेम तीन लाखांचं उत्पन्न होतं. दोन मुलं व दोन मुली शिकतात. त्यांच्या शिक्षणावर किमान दीड ते दोन लाख खर्च होतो. शेती आतबट्याची झाल्यानं दुधाचा पूरक उद्योग निवडला. तोही बुडाला, अंगावर कर्ज झालयं, आता काय करावं हा प्रश्न आहे.  - बाळासाहेब यादव मोरे

    ..तर असं झालं असतं का?  

    आम्हा दोघा भावात वीस एकर शेती. त्यापैकी पाच एकरचं बागायती. शेतीला जोड म्हणून दुभती जनावरं वाढवत वाढवतं वीसवर नेली. त्यापैकी दहा दुभती, तर दहा खाली आहेत. त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय व्हावी म्हणून सव्वा एकरात घास लावला. घरातील पाच जणं रात्रंदिवस जनावरे सांभाळण्याचे काम करतो. महिन्याला वीस हजारांचा चारा, पंधरा हजाराचं खाद्य व चार हजार औषधपाण्यावर खर्च व्हतातं. वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या दुधाच्या व्यवसायात पाच डेअऱ्यांना दुध घातलं. दोनचं वर्ष फक्‍त ३० रुपयांपर्यंतचा दर मिळाला. तेव्हा खाद्याचे दर ७०० रुपये पोतं व्हते. यंदा तर दूध सतरा रुपयांवर आलं अन्‌ खाद्याचं पोत हजारावर गेलं. दुभत्या गायी वाढवितांना दोन वर्षांपूर्वी खासगी बॅंकेचं घेतलेलं तीन लाखाचं कर्ज फक्‍त नवंजूनं करू शकलो. कर्ज फेडणंच काय जनावरांना गोठाही बांधणं शक्‍य झालं नाही. दर परवडणारे असते तर असं झालं असतं का? - गोकूळ आणि बाळू भाऊसाहेब बनकर

    सरकारने मध्यस्थी करावी  

    १९९८ पासून दूध संकलन केंद्र चालवितो. खेळता पैसा हाती राहणारा हा उद्योग शेतकऱ्यांना सहाय्यक ठरत असल्याने तो टिकावा म्हणून सतत धडपड असतो. शेतकऱ्यांना अडचणीत मदत करण्यासाठी प्रसंगी विविध बॅंकांचे उंबरठे झिजवून त्यांना कर्जरूपी मदतही करतो. परंतु, वर्षभरापासून पडलेले दर, उत्पादकांच्या खात्यातून होणाऱ्या विविध कपाती त्यांचे कंबरडे मोडणाऱ्या ठरताहेत. सरकारने यामध्ये मध्यस्थी करावी. दुग्धव्यवसायावर जगणं अवलंबून असणाऱ्यांना दराच्या संकटातून वाचवावं. अन्यथा हा उद्योग करण्यास कुणी धजावणार नाही.  - राजेंद्र तुरकने, अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी, लाखगंगा

    ...पण सारं बिघडलं

    गावातं पहिली संकरीत गाय घेणारा मी पहिला व्यक्‍ती. सहा एकर जिरायती शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देतांना पाच गायीपर्यंत त्या वाढविल्या. परंतु, २० रुपये किलो पेंढी झाली असतांना १४ वा १८ रुपयांच्या दराने दूध विकणं परवडणारं नाही. दर वाढतील या आशेनं जवळपास आठ महिने या गायी सांभाळल्याही. परंतु सारं गणितं अवघड होउन बसल्यानं दोन महिन्यांपूर्वी तीन गायी विकल्या. कुटुंबात चार लोक. दोन मुली आहेत. चरितार्थ चालविण्यासाठी दुग्ध व्यवसायाकडून मोठी आशा होती. पणं सारं बिघडलं. सरकारबी, काही लक्ष घालेना. त्यामुळं आम्ही आता फुकटचं दूध घालण्याचा निर्णय ग्रामसभेतून घेतलां. पाहू आता तरी सरकारं आम्हाला वाचविण्यासाठी दूध दराच्या प्रश्नात लक्ष घालतं का ते.  - विलास बाळासाहेब मोरे, माजी उपसरपंच

    कुणीच बोलायला तयार नाही...  

    पहिलं दूध संकलनं केंद्र तीस वर्षांपूर्वी गावात सुरू केलं. त्या वेळी दुग्ध व्यवसाय आमच्या बहुतांश जिरायती गावातील शेतकऱ्यांना तारलं असं वाटलं होतं. ६५ लिटरपासून सुरू झालेलं दूध संकलन आता २४०० ते २५०० लिटरवर पोचलं. परंतु, दरातील घसरणीबरोबराच दूध उत्पादकांच्या अडचणीतही मोठी वाढ झाली आहे. जवळपास अकरा महिन्यांपासून दूध दरातील घसरण आठ ते दहा रुपयांवर पोचली आहे. त्यात पेमेंटही वेळेवर होत नसल्याने अडचणीत भर पडली. दरातील चढ उतार नवीन नाहीत. दर घसरणीच्या अशाच एकवेळच्या संकटात एकदा शरद पवारांनी हस्तक्षेप करून सरकारने स्वत: संकलन करून दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र ना सत्ताधारी ना विरोधक यावर कुणीच काही बोलायला तयार नाहीत.  - अण्णासाहेब मोरे

    कष्टाचं मोल वाटत नाही का?  

    दुधावरचं आमच्या कुटुंबाचा चरितार्थ. इतकी काबाडकष्ट करूनही सरकारला आमच्या कष्टाचं मोल वाटतं नाही का? दर मिळाले नाही तर आम्ही दुधाचं उत्पादन घेण्यासाठी जनावरं सांभाळायची कशी. जे दर सरकार जाहीर करतं ते मिळतं नसतील तर काय म्हणावं.

    - शुभांगी रेवणनाथ पडोळ

    खर्चाचं गणित जुळंना  

    सरकार म्हणतं पूरक उद्योग म्हणून दुग्धव्यवसाय करा, कसा करावां. व्यवसायात खर्चाचं गणित जुळंना म्हणून दावणीच्या तीन गायी अन दोन कालवडी विकल्या. दुधाला किमान तीस रुपये प्रतिलिटर दर दिला तर हा व्यवसाय थोडा परवडलं.

    - रंजना बाळासाहेब पडोळ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com