इतर जिल्ह्यांतील धान्यामुळे अकोल्यात गोदामे तुडुंब

अकोला ः तूर साठवणुकीच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना जाब विचारताना अामदार सावरकर, शेजारी खासदार धोत्रे व इतर.
अकोला ः तूर साठवणुकीच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना जाब विचारताना अामदार सावरकर, शेजारी खासदार धोत्रे व इतर.

अकोला  : एक दिवसाने तूर खरेदी बंद होत असतानाच जिल्ह्यात या मुद्द्यावरून राजकीय गरमागरमीला सुरवात झाली अाहे. जिल्ह्यातील गोदामे रिकामी नसल्याने शेतकऱ्यांकडील तूर, हरभरा हमीभावाने खरेदीला प्रचंड अडचणी तयार झाल्या असून, अकोला जिल्ह्यातील गोदामे शेजारील जिल्ह्यात खरेदी झालेल्या धान्याने भरली असल्याची माहिती उजेडात आली अाहे. यावरून जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी जिल्हा विपणन अधिकारी व वखार महामंडळाच्या व्यवस्थापकांना सोमवारी (ता. १४) धारेवर धरले. 

अकोला जिल्ह्यात तूर अाणि हरभरा खरेदीचा मुद्दा सध्या तापला अाहे. ७० टक्के शेतकऱ्यांकडील सव्वादोन लाख क्विंटल तूर आणि ९० टक्के शेतकऱ्यांकडील पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदीअभावी पडून अाहे. याबाबत जिल्ह्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यांसह इतर भागातील शेतकऱ्यांनी खासदार व आमदारांना जाब विचारला. त्यामुळे सोमवारी खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हा विपणन अधिकारी राजेश तराळे आणि वखार मंडळाचे व्यवस्थापक ढवळे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीला आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांची उपस्थिती होती. 

या वेळीही अधिकाऱ्यांनी गोदामे रिकामी नसल्याने तूर, हरभरा खरेदी बंद असल्याची माहिती दिली. एकीकडे जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची तूर व ९० टक्के शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदीच झाला नाही, तरी गोदामे भरली कशी, असा प्रश्‍न आमदार सावरकरांनी उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती. जिल्ह्याच्या हातावर तुरी देऊन शेजारी जिल्ह्यातील धान्याने गोदामे भरली असल्याने आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

अकोला जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गाेदामांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, शेगाव, खामगाव या तालुक्यातून  एक लाख १५ हजार क्विंटल तूर साठवण्यात आली. वाशीम जिल्ह्यातील ७५ हजार क्विंटल तूर तर अमरावती जिल्ह्यातील १० हजार क्विंटल तूर अकोल्यातील गोदामांमध्ये ठेवण्यात आल्याने गोदामे भरली आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

सहकारमंत्र्यांना तोडगा काढण्याची विनंती खासदार आणि आमदारांसोबत अधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी फोन करून जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीबाबत माहिती घेतली. त्यांना आमदार सावरकर आणि भारसकाळे यांनी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत अवगत करून या पेचात मार्ग काढण्याची विनंती केली आहे. जिल्ह्यातील तूर व हरभरा साठवण्यासाठी खासदार संजय धोत्रे यांनी महाबीजची दोन गोदामे उपलब्ध करून दिली. अकोट आणि दर्यापूर येथील गोदामांमध्ये २० हजार क्विंटल धान्य साठविता येणार आहे. हे गोदाम वापरूनही तूर, हरभरा साठवणुकीचा प्रश्‍न कायम राहणार आहे. 

लोकप्रतिनिधींचे पोलिस अधीक्षकांना निवेदन अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शासनामार्फत होणारी तूर व हरभरा खरेदी करताना झालेली अार्थिक छळवणूक व पिळवणूक याबाबत संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खासदार संजय धोत्रे, अामदार प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, रणधीर सावरकर, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी केली अाहे. वखार महामंडळाचे अधिकारी व बाहेरील खरेदी केलेली तूर वाहतूकदार यांच्यात अार्थिक साटेलोटे असण्याची शक्यता अाहे. या रॅकेटमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अार्थिक व मानसिक छळ झाल्याने या प्रकरणाचा छडा लावणे गरजेचे झाले अाहे. या प्रकरणाची अार्थिक गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी या लोकप्रतिनिधींनी निवेदनातून केली अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com