अचूक आकडेवारीचा काळ

माहितीशिवाय आकडेवारी (डाटा) असू शकते; परंतु आकडेवारीशिवाय माहिती असूच शकत नाही, हे विधान अमेरिकेतील एका थोर संगणकतज्ज्ञाचे आहे. यातून आकडेवारी आणि माहिती हे कसे एक दुसऱ्याशी संबंधित आहेत, हे स्पष्ट होते.
agrowon editorial
agrowon editorial

आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत मायक्रोसॉप्टचे सहसंचालक बिल गेट्स यांनी भारतीय शेतीतील मूळ समस्येलाच हात घातला आहे. सध्या हवामान बदलाचा कहर संपूर्ण जग अनुभवतेय. परंतु, त्याचे सर्वाधिक चटके आपल्या देशाला बसत आहेत. अशा वेळी बदलत्या हवामानाच्या आव्हानांवर अचूक सांख्यिकी, योग्य माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे मात करता येऊ शकते. असे मत बिल गेट्स यांनी व्यक्त केले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्यांचे उत्पन्न २० टक्कांनी वाढेल, असा विश्वासही त्यांना वाटतो. आपल्या देशातील धोरणकर्ते, राज्यकर्ते यांना अचूक आकडेवारी, योग्य माहिती यांचे नियोजनात, देशाच्या विकासातील महत्त्व अजूनही कळालेले नाही. त्या वेळी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल बिल गेट्स यांचे आभारच मानायला पाहिजेत.

आपल्याकडे माहितीशिवाय आकडेवारी (डाटा) असू शकते; परंतु आकडेवारीशिवाय माहिती असूच शकत नाही, हे विधान अमेरिकेतील एका थोर संगणकतज्ज्ञांचे आहे. यातून आकडेवारी आणि माहिती हे कसे एक दुसऱ्याशी संबंधित आहेत, तसेच त्यांचे एकूणच नियोजनातील महत्त्व स्पष्ट होते. असे असताना आपल्या देशात शेतीच्या बाबतीत अचूक आकडेवारीचा फारच गोंधळ पाहावयास मिळतो. शेतीचे एकूण क्षेत्र, हंगाम आणि पीकनिहाय लागवड क्षेत्र, प्रत्यक्ष उत्पादनक्षम क्षेत्र, पिकांचे उत्पादन, फळबागांखालील क्षेत्र, नवीन झालेली फळबाग लागवड, जुन्या काढलेल्या बागा, बारमाही सिंचन क्षेत्र, हंगामी बागायती क्षेत्र याबाबतची अद्ययावत आकडेवारी पुढे येतच नाही. त्यामुळे उत्पादनाचे, दराचे अंदाजही चुकतात. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. एवढेच नव्हे तर शासनाचे शेतीबाबतचे नियोजन, ध्येयधोरणेही चुकतात. अधिक गंभीर बाब म्हणजे मागील काही वर्षांपासून सांख्यिकी विभागाकडून येणारी आकडेवारी, माहिती शासनाच्या सोयीची नसेल तर ती दाबली जाते. 

चुकीच्या आकडेवारीसोबतच अयोग्य माहितीचा फटकाही शेतकऱ्यांना सातत्याने बसत आला आहे. हवामान बदल चरम सीमेवर आहे. जागतिक व्यापाराचा परिणाम अनेक शेतीमालांच्या देशांतर्गत दरावरही होत आहे. अशा वेळी हवामान तसेच जागतिक बाजारपेठांची योग्य माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. या वर्षी चांगल्या पावसाच्या अंदाजाबरोबर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सातत्याने चक्रीवादळे निर्माण होतील, त्यातून देशांच्या बऱ्याच भागात पावसाळा लांबेल हेही शेतकऱ्यांना सांगितले असते. तर शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या थोड्या लांबवून यातून आपले पीक वाचविले असते किंवा नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने इतरही काही खबरदाऱ्या घेतल्या असत्या. परंतु तसे झाले नाही आणि केवळ अचूक माहितीअभावी शेतीचे झालेले नुकसान आज सर्वांसमोर आहे. जसे हवामानाचे तसेच बाजारपेठेचेही आहे. कुठल्या शेतीमालास, नेमक्या कोणत्या वेळी, कोणत्या बाजारपेठेत दर चांगले मिळतात, याची माहितीही शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यातून देशांतर्गत तसेच जागतिक बाजारातील अनेक शेतीमालास चढा दर शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. 

खरे तर माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हवामान असो, की जागतिक बाजार याची योग्य माहिती शेतकऱ्यांना देणे अवघड नाही. परंतु, त्यावर देशातील शासन-प्रशासनाकडून कामच होत नाही. काही प्रमाणात काम झाले तरी ते शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळेत पोचत नाही. येथून पुढील काळ हा अचूक आकडेवारीचाच आहे. ज्याच्या हाती अधिक आणि अचूक आकडेवारी तोच जगावर राज करू शकतो. असे असताना शेतीसह सर्वच विभाग, क्षेत्रातील अचूक आकडेवारी शासन प्रशासनाने गोळा करण्याचे काम तत्काळ हाती घ्यायला हवे. जमा होत असलेल्या आकडेवारीचे सातत्याने विश्लेषणही होणे गरजेचे आहे. अचूक आकडेवारीच्या योग्य विश्‍लेषणातून पुढे आलेली माहिती सातत्याने सर्वांसमोर मांडायला हवी. यातूनच शेतकऱ्यांसह शासनालाही विकासाची योग्य दिशा सापडेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com