पीकविमा परतावाप्रश्नी परभणीत शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको

परभणी ः विमा परताव्यांच्या प्रश्नी बुधवारी (ता. 16) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खानापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  (छायाचित्र ः योगेश गौतम)
परभणी ः विमा परताव्यांच्या प्रश्नी बुधवारी (ता. 16) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खानापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (छायाचित्र ः योगेश गौतम)

परभणी (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील सोयाबीनसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झालेले असताना संपूर्ण जोखीमेसह विमा परतावा देणे अपेक्षित होते. परंतु अत्यंत तुटपुंजा विमा परतावा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवक काॅग यांच्या शेतकरी संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता. 16) सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गतवर्षीच्या खरीप हंगात जिल्ह्यात उद्धवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनसह अन्य खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. परंतु रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीने शेतकऱ्यांना तुटपुंजा विमा परतावा मंजूर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. या प्रकरणी विमा कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रुपये तसेच कापूस, मूग, उडीद तसेच अन्य पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी, बोंड अळी नुकसानीचे हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, दुष्काळ जाहीर करण्याचे निकष रद्द करण्यात यावेत, कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी खानापूर फाटा, झरी (ता. परभणी), कोक (ता. जिंतूर), पाथरी, पालम आदी ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.

या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजन क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, डिंगाबर पवार, केशव आरमळ, शेख जाफर, युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागसेन भेरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक काही काळ खोळंबली                                                     होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com