दर घसरणीचा मोफत दूध वाटून निषेध

परभणी ः येथे किसान सभेतर्फे गुरुवारी (ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुकट दूधवाटप करण्यात आले.
परभणी ः येथे किसान सभेतर्फे गुरुवारी (ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुकट दूधवाटप करण्यात आले.

पुणे : राज्यात १६ ते १७ रुपयांपर्यंत दूधदर खाली आल्याने शेतकरी अत्यंत अस्वस्थ आहे. लाखगंगा गावातील सर्वच दूध उत्पादकांसह ग्रामपंचायतीने न परवडणाऱ्या दराबाबत मोफत दूधवाटप आंदोलनाची घोषणा करताच, त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळण्यास प्रारंभ झाला. गुरुवारी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. किसान सभेने आंदोलनात आघाडी घेतली होती. 

पारनेरला सरकारचा निषेध  नगर ः सरकार दुधाला दर देत नसल्याचा निषेध करत पारनेर येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोफत दूध वाटप केले. या वेळी कार्यालयासमोर निषेध सभा घेऊन कार्यकर्त्यांनी सरकारच्या दूध दराविषयीच्या भूमिकेचा निषेध केला.  सरकार दुधाला दर देत नसल्याने दूध उत्पादक त्रस्त आहेत. गुरुवारपासून (ता. ३) औरंगाबादमधील लाखगंगा गावातून मोफत दूध वाटप आंदोलनाला सुरवात झाली. त्यात सहभागी होत पारनेर येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे पारनेर तहसील कार्यालयासमोर सकाळी कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे, जिल्हा उपाध्यक्ष, अशोक आंधळे, तालुका अध्यक्ष रोहन आंधळे, गुलाबराव डेरे, पांडुरंग जाधव, पांडुरंग पडवळ, मंजाबापू वाडेकर, नंदन भोर, तुषार औटी, धीरज महांडुळे, सचीन नगरे, विष्णू दाते, सुरेंद्र माने, अरुण गवळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी मोफत दूध पाजून ‘फुकट घ्या’ असे सांगत घोषणाबाजी केली. लाखगंगा (जि. औरंगाबाद) येथे बोलताना अजित नवले आणि गुलाबराव डेरे

कऱ्हाडमध्ये दुधाचा सत्याग्रह  कऱ्हाड, जि. सातारा ः दुधाचा महापूर आला आहे, असे सांगून दर पाडले गेले आहेत. त्या विरोधात ३ ते ९ मेपर्यंत गावा-गावात शहरामध्ये फुकट दूध वाटून दूध उत्पादकांसाठी राज्यभर एकाच वेळी दुधाचा सत्याग्रह करण्याची भूमिका घेत किसान सभेच्या वतीने गुरुवारी कऱ्हाड (जि. सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर मोफत दूधवाटप दुधाचा सत्याग्रह आंदोलन केले. डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. येथील तहसील कार्यालयासमोर आज झालेल्या आंदोलनात माणिक अवघडे, अशोक यादव, जे. एस. पाटील, सुनील कणसे, उदय थोरात, कुमार चिंचकर, अमोल जाधव, अरुण देशमुख, आनंदा मुळगावकर, महेश पाटील आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. श्री. अवघडे यांनी सध्या दुधाचा प्रश्न तीव्र झाला आहे. दुधाचा महापूर आला असे सांगितले जात असले, तरी एक टॅंकर विकत घेऊन त्याचे तीन टॅंकर दूध करून विकले जाते ही कूटनीती आहे. त्या संदर्भात लुटता कशाला, बेशरमपणे फुकटच घेऊन जा अशी राज्यव्यापी मोहीम घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत आजपासून ९ मेपर्यंत गावा-गावात शहरामध्ये फुकट दूध वाटून दूध उत्पादकांसाठी राज्यभर एकाच वेळी दुधाचा सत्याग्रह करण्यात येत असल्याचे सांगितले. 

परभणीत फुकट दूधवाटप  परभणी : शासकीय दूध खरेदी केंद्रावर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या लुटीच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. ३) फुकट दूधवाटप करण्यात आले. दुधाला प्रतिलिटर ७० रुपये दर जाहीर करावा. बाजारातील दर आणि शासकीय दरातील फरक भावांतर योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. दूध खरेदी केंद्रावरील लूट थांबवून शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत रोखीने पेमेंट अदा करण्यात यावे. सर्व दूध उत्पादकांना कृषी विभागामार्फत पुरेश प्रमाणात सकस चारा बियाणे, बेने लागवडीसाठी ठोंब, तसेच अन्य निविष्ठा पुरविण्यात याव्यात या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुकट दूधवाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विलास बाबर, लिंबाजी कचरे, बालासाहेब आळने, राजेभाऊ राठोड, सुरेश काळदाते, भगवान टेकाळे, लक्ष्मण फुरनवाड, हनुमान मोगले, प्रल्हाद भरोसे, अशोक मोगले, भगवान खुपसे, कैलाश बीटकर, शिवाजी पांचाळ, शेख अब्दुल आदींसह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

संतप्त शेतकऱ्यांनी दूध ओतले रस्त्यावर भंडारा ः दुधाचे दरात झालेल्या घसरणीचा निषेध म्हणून दुग्धोत्पादकांनी रस्त्यावर दूध फेकत त्यासोबतच मोफत वितरण केले. तुमसर ते गोंदिया राज्य मार्गावरील देव्हाडा बुज. चौकात हे आंदोलन करण्यात आले. पूर्व विदर्भात भंडारा जिल्हा दुग्धोत्पादनात आघाडीवर आहे. परंतु, गाईच्या दुधाला १५ तर म्हशीच्या दुधाला २० रुपयांचा दर मिळत असल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत.

कोल्हापुरात मोफत दूधवाटप कोल्हापूर : दुधाला कमी भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. ३) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. लुटताय कशाला फुकटच घ्या, अशी भावना वयक्त करत हे दूधवाटप करण्यात आले. 

सांगलीत मोफत दूधवाटप सांगली : म्हैस आणि गायीच्या दूधदरात राज्य सरकारकडून वाढ करण्याबाबत कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ आज किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. लोकांना मोफत दूध वाटून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com