डाळिंब प्रक्रिया उद्योगासाठी शेतकरी गट, कंपन्यांना प्राधान्य

सोलापूरातील द्राक्ष, डाळिंब प्रदर्शनात मार्गदर्शन करताना सहकारमंत्री सुभाष देशमुख
सोलापूरातील द्राक्ष, डाळिंब प्रदर्शनात मार्गदर्शन करताना सहकारमंत्री सुभाष देशमुख
सोलापूर : सोलापूरच्या डाळिंबाला जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे डाळिंबाचे महत्त्व वाढले आहे. पण डाळिंबाच्या किमतीतील चढ-उतार पाहता, डाळिंबावर प्रक्रिया महत्त्वाची आहे. त्यासाठी शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्यांनी पुढे यावे, त्यासाठी आवश्‍यक ती सगळी मदत पणन विभाग द्यायला तयार आहे, असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी (ता. १६) येथे सांगितले. सोलापूरच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उजनीतील पाण्याच्या शुद्धीकरणासह उजनीच्या पाणी नियोजनावरही आपण योग्य ती कार्यवाही करू, असेही त्यांनी सांगितले.
‘अॅग्रोवन’च्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाला शनिवारी पणनमंत्री देशमुख यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले, प्रगतिशील शेतकरी रमेश कचरे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मंत्री देशमुख यांनी प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन प्रत्येक उत्पादनाची माहिती घेतली. ट्रॅक्‍टर, ब्लोअर, ड्रीप इरिगेशन यासारख्या उत्पादनातील नवीन तंत्रज्ञानाबाबतही आवर्जून विचारणा केली.
 
पणनमंत्री देशमुख म्हणाले, की शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून सरकार काम करते आहे. गेल्या वर्षी तुरीची उच्चांकी ७५ लाख टन खरेदी केली. यंदाही उडीद, मुगाला हमीभाव देणार आहोत, तसा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय होईल. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी त्याची विक्री न करता, थोडे दिवस थांबावे आणि तूर्तास शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा. नाशवंत शेतमालालाही भाव देण्यासह प्रक्रिया करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी समितीही नेमली आहे. 
 
प्रगतिशील शेतकरी कचरे म्हणाले, की दरवर्षी उजनी धरण शंभर टक्के भरते, पण काही दिवसातच ते पुन्हा मायनसमध्ये जाते. उजनीच्या पाण्याचे नियोजन झाल्यास कोणताही दुष्काळ आपल्याला झळ पोचवू शकणार नाही. 
 
सहयोगी संपादक श्री. दिवाणजी यांनी उजनीच्या पाण्याच्या नियोजनसह शुद्ध पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. श्री. दिवाणजी म्हणाले, की उजनीचे पाणी खूपच खराब झाले आहे. सुमारे ५० लाख लोकसंख्येला या पाण्याचा पुरवठा होतो, याचा विचार करून त्याच्या शुद्धीकरणासह वाटपाचे नियोजन व्हावे.

उजनी धरणाच्या पाण्याच्या नियोजनासह त्याच्या वाटपावरही शासन स्तरावर योग्य तो निर्णय घेऊ. धरणातील पाण्याच्या प्रदूषणाचा विषय आहे. त्याबाबतही काय करता येईल हे पाहू, पण नदी आणि धरणातील पाण्याचे नियोजन होण्यासाठी भीमा-सीना नदीवर बॅरेजस उभारण्यासाठी प्रयत्न करू, असेही मंत्री देशमुख म्हणाले.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना आणली आहे. त्यासाठी मुदत वाढवली आहे. आणखी आठ दिवसांत राहिलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज भरावेत, पैसे जमा करण्यासाठी बॅंका आणि सहकार खात्याला त्यावर आणखी काम करायचे आहे, त्यामुळे तातडीने अर्ज भरावेत, कोणत्याही स्थितीत दिवाळीपूर्वी सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होतील, असेही मंत्री देशमुख म्हणाले. 
 
यावेळी ‘अॅग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी सुदर्शन सुतार यांनी सूत्रसंचालन केले. युनिट मॅनेजर किसन दाडगे यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com