मराठवाड्यातील तीन मंडलांत अतिवृष्टीची नोंद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडलांपैकी केवळ तीन मंडलांत गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली. एकूण ७६ पैकी नऊ तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक होता.

अपवाद वगळता यंदा सार्वत्रिक पावसाचा अभाव जाणवला, तो गुरुवारी सकाळपर्यंतच्या पावसाच्या नोंदीवरूनही स्पष्ट झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडलांपैकी केवळ २० मंडलांत पावसाची हजेरी लागली. त्यामध्ये केवळ ५ मंडलांत दमदार पावसाची नोंद झाली, तर उर्वरीत १५ मंडलांत मध्यम ते तुरळक पाऊस पडला.

औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ औरंगाबाद तालुक्‍यात पावसाचा जोर होता. कन्नड, खुल्ताबाद, सोयगाव, फुलंब्री तालुक्‍यासह गंगापूर तालुक्‍यातील बहुतांश मंडलांकडे पावसाने पाठ फिरवत आपल्या लहरीपणाचा परिचय दिला.

सार्वत्रिकरीत्या न पडणाऱ्या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली नसून अनेक भागातील विहिरींची स्थिती जैसे थे अशीच आहे. विशेष म्हणजे बुधवारी ७ ने ९ वाजेदरम्यान औरंगाबाद शहरातील रस्ते व सखल भाग जलमय झाला असताना लगतच्या चौका मंडलात मात्र बहुतांश गावांत तुरळक पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यात सरासरी २७.४० मिलिमीटर, जालना तालुक्‍यात ११.६३ मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्‍यात २६.३३ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्‍यात २२ मिलिमीटर, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात २१.६७  मिलिमीटर, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्‍यात ४१.८० मिलिमीटर, वाशी तालुक्‍यात १९ मिलिमीटर, भूम तालुक्‍यात १३.४० मिलिमीटर, लोहारा तालुक्‍यात १३.३३ मिलिमीटर, उमरगा तालुक्‍यात ११.८० मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्‍यात २१.१३ मिलिमीटर पाऊस झाला.

दरम्यान, मराठवाड्यातील पाच तालुक्‍यांत अजूनही सरासरी अपेक्षित पावसाचा टक्‍का ५० च्या आत आहे. यामध्ये औरंगाबाद, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक तर नांदेड जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. डोंगराळ भागात वसलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्‍यात अपेक्षित पावसाचा टक्‍का केवळ ४०.७४ इतका आहे. हिमायतनगर तालुक्‍यात ४७.३० टक्‍के, देगलूर तालुक्‍यात ४५.८० टक्‍के पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्‍यात ४३.३६ टक्‍के तर औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्‍यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ४७.८० टक्‍केच पाऊस पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com